नवीन लेखन...

शनिवारचा सत्संग : ५

देहिनः अस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा |
तथा देहांतर प्राप्तिः धीरः तत्र न मुह्यति ||२:१३||

देहिन:: देहधारि आत्म्याला, अस्मिन् :: यात, देहे :: शरीरामध्ये, कौमारम् :: बालपण, यौवनं :: तारुण्य, जरा :: म्हातारपण, देहान्तर :: देहाचे स्थित्यंतर, धीर: :: धैयवान पुरूष, न मुह्यति :: मोहित होत नाही.

येथे धैर्यवान माणूस म्हणजे, विवेकी, ज्ञानी माणूस असा घ्यावयाचा आहे.

श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचं विवेचन :: ज्या प्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात, बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसर्या देहात प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धैर्यवान माणूस गोंधळून जात नाही. थोडक्यात म्हणजे, जन्मानंतर बालपण, नंतर तरूणपण, नंतर म्हातारपण अशा तीनही अवस्थात तोच आत्मा राहतो. मृत्यूनंतर तो दुसर्‍या शरीरात प्रवेश करून नवीन शरीर धारण करतो.

श्रीस्वामी रामसुखदासजी यांचं विवेचन : ‘शरीर धारण करणार्याच्या शरीरामध्ये’ असं म्हणण्यानं सिध्द होतं की शरीर वेगळं आहे आणि शरीरी (शरीर धारण करणारा…आत्मा, जीव, जीवात्मा) वेगळा आहे. शरीरी द्रष्टा आहे आणि शरीर दृष्य आहे. म्हणून बाल्यावस्था, तारुण्य आणि म्हातारपण हे शरीराला आहे, शरीरीला (आत्म्याला) नाही. शरीराच्या अवस्थातील बदलाविषयी कुणी शोक करीत नाही तर मग शरीराच्या मृत्यूनंतर, आत्मा अेका शरीरातून दुसर्‍या शरीरात जातो त्यासाठी शोक का करावा? ज्ञानी व्यक्तीला सत् आणि असत् याचं पूर्ण ज्ञान असल्यामुळे, आत्म्याच्या स्थानांतराच्या विषयानं तो मोहित होत नाही किंवा त्याला कोणताही संदेह रहात नाही.

श्रीसंत ज्ञानेश्वरांनी दिलेला ओवीबध्द अर्थ : आइके शरीर तरी एक । परी वयसाभेदे (वयपरत्वे) अनेक ।। हे प्रत्यक्षचि देख । प्रमाण तू ।। एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यी ते भ्रंशे ।। परी देहचि हा न नाशे । एकेकासवे ।। तैसी चैतन्याच्या ठायी । इये शरीरांतरे होती जाती पाही ।। ऐसे जाणे तया नाही । व्यामोहदु:ख ।।

लोकमान्य टिळकांनी, गीता रहस्यात केलेलं भाष्य :: देह धारण करणार्‍यास, या देहात ज्याप्रमाणे बालपण, तरूणपण आणि म्हातारपण (प्राप्त होतं) त्या प्रमाणेच (पुढे) दुसरा देह प्राप्त होत असतो. (म्हणून) या बाबतीत ज्ञानी पुरूष मोह पावत नाहीत.

आचार्य विनोबा भावे, गीताअीत सांगतात :: या देही बाल्य तारुण्य जरा वा लाभते जशी । तसा लाभे नवा देह न डगे धीर तो तिथे ।।

विज्ञानीय दृष्टीकोनातून अन्वयार्थ :: विज्ञानीय दृष्टीकोनातून विचार केल्यास असं अनुमान निघतं की, सजीवाच्या तीन नव्हे तर चार अवस्था आहेत.
१. गर्भावस्था २. बाल्यावस्था ३. तारुण्यावस्था आणि ४. वृध्दावस्था

आनुवंशिक तत्व म्हणजे सृजनशील तत्व (जेनेटिक मटेरियल) असल्याशिवाय सजीवांचं शरीर निर्माण होअू शकत नाही. सजीवाच्या जिवंत पेशीत असलेल्या केंद्रकात हे आनुवंशिक तत्व असतं. या अनुवंशिक तत्वाचा संच, गर्भधारणा झाल्यापासून मरेपर्यंत तोच असतो. हाच आत्मा.

गर्भधारणा होते, तीच वेळ अपत्याची जन्मवेळ असते. जन्मापासून मरेपर्यंत, सजीवाच्या अब्जअब्जावधी पेशी मरतात आणि तितक्याच निर्माणही होतात. गर्भावस्थेत आणि बाल्यावस्थेत, मरणार्या पेशींच्या संख्ये पेक्षा निर्माण होणार्‍या पेशींची संख्या जास्त असते. म्हणून शरीराची वाढ झालेली असते. तारुण्यावस्थेत, ही संख्या सारखीच असते म्हणून शरीराची वाढ स्थिर असते तर वृध्दावस्थेत, मरणार्‍या पेशींची संख्या, निर्माण होणार्‍या पेशींच्या संख्येपेक्षा जास्त होअू लागते म्हणून शरीर थकतं. ही संख्या खूपच वाढली तर शरीराचे अवयव काम करीनासे होतात आणि शरीर अचेतन होतं..मरतं.

पूर्वी असा समज होता की, गर्भ, आअीच्या शरीराबाहेर आला आणि नाळ कापली गेली म्हणजे अपत्याचा जन्म झाला. म्हणून गीतेच्या या श्लोकात गर्भावस्थेला स्थान दिलं गेलं नाही. पण आअीच्या गर्भाशयात असतांना देखील, त्याचं नाळेद्वारा, आअीनं घेतलेल्या आहारामुळे, त्याचं पोषण होत असतं याची पुरेपूर कल्पना आपल्या पूर्वज विचारवंतांना होती

शुक्राणू (पित्याकडील आनुवंशिक तत्वाचा अर्धा संच २३ गुणसूत्रं) आणि बीजांडात (मातेकडील आनुवंशिक तत्वाचा अर्धा संच २३ गुणसूत्रं) अशारितीने पित्याच्या पूर्वजांच्या अनेक पिढ्यातील तसेच मातेच्याही पूर्वजांच्या अनेक पिढ्यातील आनुवंशिक तत्व असते. गर्भधारणा झालेल्या गर्भपिंडाच्या आनुवंशिक तत्वात, ४६ गुणसूत्रं, आणि सुमारे ३० हजार जनुकं (पूर्ण संच) असतात आणि तेच,

सजीवांचे आनुवंशिक गुणावगुण पुढच्या पिढीत संक्रमित करतात. मूळ गर्भपेशीचं विभाजन होअून दोन पेशी होतात नंतर दोनाच्या चार, चाराच्या आठ अशा रीतीनं वाढ होअून ३८ आठवड्यात, पूर्ण वाढ झालेलं. सर्व अवयवं आणि इंद्रियं असलेलं मानवाचं बालक जन्माला येतं. त्याची वाढ होत असतांना कुमारावस्था असते,

अपत्य प्रजननक्षम झालं म्हणजे तारुण्यावस्था प्राप्त होते, शरीराची प्रजननक्षमता नाहीशी झाली म्हणजे वृद्धावस्था आली असं मानलं जातं. ही माहिती, शास्त्रज्ञांच्या संशोधनातून, निर्विवादपणं सिध्द झालेली आहे. विज्ञानाची पुस्तकं आणि संगणकीय महाजालावर ती अुपलब्ध आहे, अवश्य वाचावी.

1. गर्भावस्था : म्हणजे लौकिकार्थाने जन्म होण्यापूर्वीची अवस्था. गर्भधारणा होते त्याच क्षणी, शुक्राणू आणि बीजांडाच्या स्वरूपात, गर्भपिंडात आनुवंशिक तत्व म्हणजे चैतन्य…आत्मा आलेला असतो. या अवस्थेत मेंदूत, पंचेन्द्रियांची केन्द्रं तयार झालेली असली तरी त्यात कोणतीही माहिती साठविलेली नसते. पाट्या कोर्‍याच असतात. स्मृतीकेन्द्रात कोणतीच स्मृती साठविलेली नसल्यामुळे या अवस्थेतला काळ आपल्याला मुळीच आठवत नाही. म्हणूनच कदाचित या अवस्थेची दखल, या श्लोकात घेतली नसावी. तरी तो ’मी’ च होतो याची जाणीव असते. या अवस्थेत, गर्भाचं पोषण, दुसर्‍या शरीरानं, म्हणजे मातेच्या शरीरानं घेतलेल्या अन्नावर होत असते. तोंड असलं तरी त्यातून अन्न घेतलं न जाता ते नाळेतूनच घेतलं जाअून पोषण होतं. आअी हा वृक्ष, गर्भ हे फळ आणि बेंबी हा देठ अशी स्थिती असते.

या अवस्थेत, आअीवडिलाकडे (जनक पिढी) असलेले आनुवंशिक तत्व अपत्य पिढीत संक्रमित झालेलं असतं. हाच, आअीवडिलात असलेल्या आनुवंशिक तत्वाचा पुनर्जन्म.

2. बाल्यावस्था : गर्भाशयाबाहेर नाळेशिवाय जगण्याची अवस्था. निसर्गातून मिळणारा आहार घेअून शरीराची वाढ होत असते. ही प्रजननक्षमतेपूर्वीची अवस्था आहे. या अवस्थेत जननेन्द्रियं विकसित झालेली नसल्यामुळे, निसर्गाचा मूळ हेतू…प्रजनन…सृजन साध्य होअू शकत नाही.

3. तारुण्यावस्था : म्हणजे प्रजननक्षम असतांनाची अवस्था. ही अवस्था, नैसर्गिक दृष्ट्या अतिशय महत्वाची आहे. कारण या अवस्थेत, पुरूषात शुक्राणू आणि स्त्रीत बीजांडं तयार झालेली असतात. म्हणजेच, आनुवंशिक तत्व, जनक पिढीकडून अपत्यपिढीत संक्रमित होण्याचा निसर्गाचा हेतू साध्य होण्यासारखा असतो.. अपत्य प्रजननक्षम झाले म्हणजे विवाह होतो आणि पुढची पिढी जन्म घेते. प्रजननक्षमता असेपर्यंत त्या जोडप्याला मुलं होत राहतात. अशा रीतीनं दोन जिवंत शरीरातील आनुवंशिक तत्व तिसर्‍या जिवंत शरीरात प्रवेश करतं. ही क्रिया जिवंतपणीच होते, मेल्यानंतर नाही.

4. वृध्दावस्था : म्हणजे प्रजननक्षमता नाहीशी झालेली अवस्था.

सजीवाचं शरीर अचेतन झालं म्हणजे … त्याचा मृत्यू झाला म्हणजे, त्यात असलेल्या आनुवंशिक तत्वासकट सगळं शरीर पर्यावरणात विलीन होतं. त्यातलं काहीही दुसर्‍या कोणत्याही शरीरात प्रवेश करीत नाही की जन्म घेत नाही. वैज्ञानिकांना हे सत्य चांगले माहित असल्यामुळे ते गोंधळून जात नाहीत.

सजीवाच्या या चारही अवस्थात, आनुवंशिक तत्वाचा तोच संच कायम असतो…. तोच या श्लोकात सांगितलेला….आत्मा.

 

— गजानन वामनाचार्य

शनिवारचा सत्संग :: ५
शनिवार २४ डिसेंबर २०१६

 

सजीवांच्या शरीरातील आनुवंशिक तत्व
आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत
विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवद् गीता  : अध्याय २ : श्लोक १३

 

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..