शंकर काशिनाथ गर्गे हे ‘नाट्यछटाकार दिवाकर’ म्हणून अवघ्या मराठी जनमानसांत लोकप्रिय असणारे लेखक होते. त्यांचा जन्म १८ जानेवारी १८८९ रोजी पुणे येथे झाला. वर्डस्वर्थ, ब्राउनिंग, शेक्सपीअर हे त्यांचे आवडते साहित्यिक होते. लॉर्ड टेनिसन यांनी १८४२ मध्ये पहिला ड्रामॅटिक मोनोलॉग लिहिला होता, जो पुढे मॅथ्यू अरनॉल्डने आणि रॉबर्ट ब्राउनिंगने लोकप्रिय केला. त्यापासून स्फूर्ती घेऊन शंकर गर्गे यांनी दिवाकर टोपण नाव घेऊन हा नाट्यप्रकार लिहून मराठीत रूळवला आणि तो ‘दिवाकरांच्या नाट्यछटा’ या नावानेच ओळखला गेला. नाट्यछटा म्हणजे एक छोटेखानी, एकपात्री स्वगतासारखा प्रकार.
आपल्या शेजारी एक किंवा काही पात्रे आहे अशी कल्पना करून नाट्यछटा सादर करणारा त्यांच्याशी संवाद साधत असतो, त्याचे संवाद तो मोठ्याने म्हणत असतो, त्यावर शेजारच्याची प्रतिक्रिया “काय म्हणालात ..”अशी सुरुवात करून स्वतःच म्हणत असतो. त्यामुळे वरपांगी हे स्वगत वाटत असले तरी सुप्त स्वरुपातले संवाद असल्यामुळे नाट्यछटा हा प्रकार अत्यंत नाट्यपूर्ण असतो. नाट्यछटा हा अगदी छोटेखानी नाट्यप्रकार, त्याचा विस्तार आणि त्याचा कालावधी हा मर्यादित स्वरुपाचा असतो, फारफारतर पन्नास-पंचावन्न ओळींचा, पण ह्या मर्यादित अवकाशातही अतिशय वेधक पद्धतीने प्रसंगाचे वर्णन केलेले असते.
दिवाकरांच्या नाट्यछटा ही मराठी साहित्याला मोठी देणगी आहे. अरेरे! ओझ्याखाली बैल मेला!, अशा शुभदिनी रडून कसें चालेल?, अहो, आज गिऱ्हाइकच आलें नाही, एका नटाची आत्महत्या, काय! पेपर्स चोरीस गेले?, कार्ट्या! अजून कसें तुला जगातलें ज्ञान नाही?, कोकिलाबाई गोडबोले, चिंगी महिन्याची झाली नाहीं तोच, पंत मेले – राव चढले, बाळ! या नारळाला धक्का लावूं नकोस बरें!, माझी डायरेक्ट मेथड ही!, मुंबईत मजा गमतीची।, म्हातारा इतुका न | अवघें पाऊणशे वयमान, स्वर्गांतील आत्मे!, हें काय उगीचच?, हें काय सांगायला हवें! – अशा त्यांच्या एकूण ५१ नाट्यछटा लोकप्रिय आहेत. शंकर काशिनाथ गर्गे यांचे १ ऑक्टोबर १९३१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply