शंकर वासुदेव किर्लोस्कर तथा ‘शं. वा. कि.’ यांचा जन्म ८ ऑक्टोबर १८९१ रोजी झाला. शंकर वासुदेव किर्लोस्कर यांचे वडील सोलापुरातील पहिले पदवीधर डॉक्टर होते. त्यांना यंत्रकलेची अफाट आवड होती. किर्लोस्कर कंपनीने या वेळी कडबा कापण्याचे यंत्र बनविले होते. त्याची जाहिरात बनविण्याचे काम शंकररावांना देण्यात आले. दोन बैलांचे संभाषण. एक बैल या यंत्राने कापलेला कडबा किती स्वच्छ असतो हे सांगताना त्या जाहिरातीत दर्शविले होते. शंकररावांची ही पहिलीच जाहिरात. त्याचे बक्षीस म्हणून त्यांना एक बॉक्स कॅमेरा मिळाला व येथून पुढे शंकररावांनी छायाचित्रणाचे धडेही गिरविले. पुढे शंकररावांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला, नंतर मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांना वरच्या वर्गात प्रवेश मिळाला. तेथेही केवळ दिसते तसे चित्र न काढता, त्यामध्ये कल्पनाशक्तीची भर टाकणे आवश्यक आहे, हे त्यांच्या मनात रुजले व त्यासाठी शंकररावांनी संस्कृत, इंग्रजी भाषेचा अभ्यास केला. वाचन वाढविले व आपल्यातील कलावंत परिपूर्ण केला. दर मंगळवारी ‘केसरी’मध्ये किर्लोस्कर नांगराची जाहिरात येत असे.
शंकररावांनी जाहिरातीची सूत्रे हातात घेतली. हळूहळू कंपनीचा बोलबाला वाढला. उत्पादने वाढली व किर्लोस्करला चिन्हाची गरज भासू लागली आणि आज सर्व परीचित झालेले विशिष्ट वळणाचे ‘किर्लोस्कर’ हे नाव हाताने लिहून ते रजिस्टर करण्यात आले. त्या वेळी विदेशातून किर्लोस्करकडे बरेच टपाल येत असे. एकदा त्यात फोर्ड कंपनीची ‘फोर्ड टाइम्स’ ही पुस्तिका आली. ती पाहताच शंकररावांच्या मनात आले, की आपल्या कारखान्याचे असे मासिक का असू नये? त्याचे नावही त्यांनी निश्चित केले. ‘किर्लोस्कर खबर!’ उत्पादनांच्या जाहिराती, कारखान्यातील घडमोडी. गावातील लोकांच्या कथा-कविता असे स्वरूप होते या मासिकाचे व ते छापायला एक जुना हॅण्डप्रेसही विकत घेतला आणि १९२० साली पहिला ‘किर्लोस्कर खबर’चा अंक प्रकाशित झाला. अन् मराठी साहित्य जगतात लहानशी खळबळ उठली.
१९२९ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी किर्लोस्कर कारखान्यास भेट दिली. त्यांच्या पाहण्यात ‘किर्लोस्कर खबर’ आले व त्यातील ‘खबर’ हा फारसी शब्द त्यांना खटकला, त्यानंतर केवळ ‘किर्लोस्कर’ हे वाङ्मय क्षेत्रात गाजलेले नाव मासिकाला राहिले. पुढे शंकररावांनी त्यामध्ये ललित व वैचारिक लेख समाविष्ट केले. १९३० मध्ये स्त्रियांनी सामाजिक बदलांना सामोरे जावे या हेतूने ‘स्त्री’ मासिकाची स्थापना झाली. तसेच तरुण युवकांना उत्तेजन देण्यासाठी १९३४ मध्ये ‘मनोहर’ हे मासिक सुरू करण्यात आले. हळूहळू ‘किर्लोस्कर’ मासिकाचा व छापखान्याचा विस्तार वाढला. ‘किर्लोस्कर’वाडीचे क्षेत्र त्याला अपुरे पडू लागले. तेव्हा ‘किर्लोस्कर’चे स्थलांतर पुणे येथे १९५९ च्या जून महिन्यात झाले. किर्लोस्कर नावाला केवळ उद्योग जगतापुरते मर्यादित न ठेवता त्याला जनसामान्यांमध्ये लोकप्रिय करण्याचे श्रेय ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’ व ‘मनोहर’ ही मासिके व त्यांचे संपादक शंकर वासुदेव किर्लोस्कर तथा ‘शं. वा. कि.’ यांनाच द्यावे लागेल.
किर्लोस्कर घराण्याच्या औद्योगिक कार्यास शंकररावांनी सामाजिक आणि सांस्कृतिक उत्तरदायित्वाचे अधिष्ठान प्राप्त करून दिले. शंकर वासुदेव किर्लोस्कर यांचे १ जानेवारी १९७५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट