अस्सल मुंबईकर कधीच कुठल्याही बाबतीत मागे नसतात मग ते मदतकार्य असो परंपरांची जपणूक असो किंवा कुठल्याही कामासाठी मेहनत घेणे असो. मग असे हे मुंबईकर सांस्कृतिक कार्यक्रमांचा अथवा कलेचा आस्वाद घेण्यात कसे मागे राहू शकतात आणि मुंबईतच काय अख्ख्या आशिया खंडात सर्वात मोठं मानलं जाणारं “षण्मुखानंद सभागृह” आपल्या हक्काच्या ठिकाणी असताना तर याबाबतीत मागे रहाण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही.
षण्मुखानंद! नावच किती भारदस्त वाटतं. अगदी नावाप्रमाणेच हे भव्य व मंदिरासारखे दिव्य आहे. मंदिरासारखीच आतील बाजू सजविण्यात आलेली आहे. plaster of paris च्या सहाय्याने छत विविध नक्षांंनी सजविण्यात आले आहे तसेच plaster of paris च्या मदतीने अनेक कलात्मक वस्तु बनविण्यात आलेल्या आहेत. सगळे दरवाजे सागवानी लाकडांनी बनलेले आहे. ही वास्तू संंपूर्णत: पिंगट रंगाच्या छटेने चकचकीत केलेली असून वास्तूच्या छतावर असलेल्या गोपुरम मध्ये ही वास्तू अक्षरश: जणू एक पुरातन कालीन मंदिरच असल्याचा भास निर्माण करते. आतील पायवाट संंपूर्णपणे लाल आणि काळ्या मार्बल्सने बनलेली आहे व त्यावर रांगोळीसारख्या वेगवेगळ्या नक्ष्या कोरलेल्या आहेत.
इतिहास :
आता ज्या जागेवर वास्तू उभी आहे त्या जागेचा ताबा ऑक्टोबर १९५४ साली देण्यात आला होता. डिसेंबर १९५४ ते १९५८ सालापर्यंत खुल्या मैदानातच मासिक मैफिली व वार्षिक सणांचे आयोजन येथे होत होत असे. अखेरीस २६ जानेवारी १९५८ रोजी या वास्तूसाठी भूमीपूजन केले. भूमीपूजनाचा सोहळा श्री. सदाशिव कानोजी पाटील (एस.के. पाटील) यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्यावेळी ते केंद्रीय अन्न व कृषी मंत्री होते. वास्तूच्या बांधकामास जानेवारी १९६० साली सुरुवात करण्यात आली. सरतेशेवटी या वास्तूची स्थापना २२ ऑगस्ट १९६३ रोजी करण्यात आली. वास्तूचा उद्घाटन सोहळा डॉ. विजयालक्ष्मी पंडीत (Bombay Governor) यांच्या हस्ते करण्यात आला. पुढे १९९० साली दुर्दैवाने वास्तूमध्ये एक मोठा अपघात घडला. एका शाळेचा समारंभ सुरु असताना एका मुलाच्या हातातील मेणबत्ती खाली पडून आग लागली आणि पुढच्या काही रांंगा, रंगमंच व इतर काही बाबींंचंं अतोनात नुकसान झालं. सरतेशेवटी त्याची डागडुजी करण्यात आली आणि संपूर्ण वास्तूचे नुतनीकरण करण्यात आले. यात संस्थेला आय. एम. कद्री यांच्यासारख्या मातब्बर वास्तूविशारदाने वास्तूस्थापत्यात मोलाची साथ दिली व वास्तूरचनातज्ञ श्री. आर. एन. रायकर यांंनी त्यांना त्यात अमोलिक सहकार्य केलं. पुढे लवकरच ही वास्तू नव्या रुपात दिमाखाने उभी राहिली.
या सभागृहाची आसन क्षमता ३०२० इतकी भव्य आहे. हे सभागृह नाटकांपुरतंं मर्यादित नसून इतर सांस्कृतिक कार्यक्रम व राजकीय सभांसाठी देखील वापरलं जातं. हे आशिया खंडातील सर्वात मोठंं सभागृह आहे असं मानलं जातं. सभागृहाच्या बाहेरच पैसे देऊन वाहनंं उभी करण्यासाठी एक वाहनतळ उपलब्ध आहे. आतल्या बाजूस एक स्वस्त व स्वच्छ उपहारगृह आहे. या उपहारगृहाची खासीयत म्हणजे इथे फक्त शाकाहारी खाद्यवस्तू मिळतात.
सभागृहात एकूण ४ ग्रीन रूम्स असून त्यातील २ तळ मजल्यावर व उर्वरित २ पहिल्या मजल्यावर उपलब्ध आहेत. सभागृहात पहिल्या मजल्यावर विश्रामकक्ष आहेत त्यातील काही अति महत्वाच्या लोकांसाठी आहेत.
मुख्य रंगमंच साधारणत: ३०’ * २०’ इतक्या आकारमानाचा आहे.
वास्तूत विशेष पहाण्यासारखे :
ही वास्तूच पहायला गेलो तर प्रेक्षणीय आहे. तरीही येथील वरच्या मजल्यावर एक कलेशी निगडीत असलेले एक वस्तूसंग्रहालय आहे जिथे विविध कलाकारांच्या प्रतिमा त्यांच्या नावासकट असून काही अर्धाकृती पुतळेही आहेत.
एकंदरीत ही वास्तू खर्या मुंबईकराचं रुप दाखवल्याशिवाय रहात नाही. कारण जसं अस्सल मुंबईकराचं मन मोठं आणि कलेप्रती आसुसलेलं आहे तशीच ही वास्तू कलाप्रेमींसाठी मुंबईकरांच्या मनासारखी भव्यतेने दिमाखात उभी आहे.
संपर्क : ०२२ २४०७८८८८ / ०२२ २४०१४०७१
पत्ता : २९२, कॉ. हरबंसलाल मार्ग, सायन (पू.) मुंंबई – ४०००२२
— आदित्य दि. संभूस (कलाकार, दिग्दर्शक, लेखक)
Leave a Reply