जगातल्या संपूर्ण मानव जातीतल्या संस्कृतीत स्त्रीचे नेमके स्थान काय? वरवर सोपा वाटणाऱ्या या प्रश्नाच्या खोलात जसजसे आपण जाऊ लागतो तसतसे प्रश्नांचे जाळे आम्हाला चारही बाजूनी वेढू लागते. स्त्रीयांची शेकडो रूपे जगभरातल्या सर्वच प्राचीन अतिप्राचीन ग्रंथात व आधुनिक वाडमयात विखूरलेली आढळतात. यातील एक रूप म्हणजे वारागंना, गणिका, वेश्या. अमरकोशात हे सर्व शब्द समानअर्थी मानले गेले आहेत. ‘मेधातिथी’ हे मनूस्मृतीचे प्रचीन भाष्यकार मानले जातात. त्यांनी वेश्यांची दोन रूपे नोंदवली आहेत. पहिली जी संभोगाच्या इच्छेने अनेक पुरूषांवर अनुरक्त होते जिला त्यांनी “पुंश्चली’’ असे नाव दिले आणि दुसरी ती जी साजशृगांर करून पुरूषानां आपल्याकडे आकर्षित करते मात्र हृदयात संभोगाची इच्छा ठेवत नाही पण धन मिळताच संभोगासाठी तत्पर असते. तिला त्यांनी “गणिका” असे नाव दिले. गणिका ही वारागंना आणि वेश्येपेक्षा श्रेष्ठ समजली जाई. प्राचीन काळात वस्तुता कलारूप आणि गुणांनीयुक्त असलेल्या स्त्रीला गणिका असे समजले जात असे. ती राजदरबारात नृत्यगायन करीत असे व तिला वेतनही मिळत असे. अर्थात ही सर्व व्यवस्था पुरूषांनीच केली असल्यामुळे त्यांच्या स्वत:च्या मनोरजंनाची जबाबदारी स्त्रीयावर टाकून ते मोकळे झाले आणि परंपंरेच्या नावा खाली आजही ही व्यवस्था निर्धौकपणे चालू आहे… आज हे सर्व यासाठी आठवले की स्त्रीचे वेश्या हे रूप प्राचिन काळा पासून अधोरेखित झाल्यामुळे साहित्य,नाटक व चित्रपटात त्यांचे चित्रण येणे साहजिकच होते.
व्ही.शांताराम हे सामाजिक वास्तवाचं भान आणि चित्रपट माध्यमाची व्यवस्थित जाण असणारे व्यक्तीमत्व. १९३९ मध्ये प्रभात या सुप्रसिद्ध कंपनीने ‘माणूस’ हा चित्रपट तयार केला. शांताराम बापू हे दिग्दर्शक. काळाचा विचार करता यातील विषय स्फोटक होता. पोलिस हवालदार आणि आणि वेश्या यांच्या संबंधावर ही कथा बेतलेली होती. एकदा वेश्येवस्तीवर पोलिसांची रेड पडते त्यात हवालदार असलेला नायक एका वेश्येची मुक्तता करतो आणि नंतर हळूहळू तो तिच्या प्रेमात पडतो. तिला यातुन बाहेर पडता यावे म्हणून लग्न करायची तयारीही करतो पण तसे काही घडत नाही. समाजाची वेश्येकडे पाहण्याची दृष्टी यावर भाष्य करणारा हा चित्रपट होता. यातील हवालदाराची भूमिका शाहू मोडक यांनी केली. तर मैना या वेश्येची भमिका शांता हुबळीकर यांनी केली. खरे तर सुरूवातीस मैनेच्या भूमिकेसाठी शांता आपटे आणि हवालदाराच्या भूमिकेसाठी संगीतकार वसंत देसाई असे शांताराम बापूच्या डोक्यात होते. पण नंतर हे दोन्ही कलावंत बदलले.
सुरूवातीच्या काळात ‘चित्रपटात स्त्रीयांनी काम करणे हा सांस्कृतिक परंपंरेवर घाला आहे’ असा मानणारा एक वर्ग होता. त्यामुळे सोकॉल्ड उच्च शिक्षित व कुलीन घराण्यातल्या स्त्रिया या पासून लांबच होत्या. पण नंतर हळूहळू परिस्थितीत बराच बदल होत गेला व स्त्रिया देखिल चित्रपटात काम करू लागल्या. शांता हुबळीकर यापैकी एक. ‘माणूस’ मधील त्यांची भूमिका रेड लाईट एरियातील असल्यामुळे आव्हानात्मक म्हणायला हवी. कारण यापूर्वीच्या नायिका आणि ही नायिका यात खूप मोठा फरक होता. शांता आपटे ऐवजी शांता हुबळीकर यांची निवड शांताराम बापूनी का केली असावी ? त्याचे कारण बहूदा त्या दिसायला खूप आकर्षक वेगैरे नव्हत्या यात असावे. कारण ज्या रेड लाईट ऐरियातील या स्त्रीया होत्या किंवा असतात त्यांचा सामाजिक स्तर खालच्या पायरीवरचा असतो. शांता आपटे सारखा उच्चकुलीन देखणा चेहरा या व्यक्तीरेखेशी कदाचित एकरूप झाला नसता. कर्नाटकातील हुबळी या शहराजवळील अदरगुंजी या खेडेगावात शांता हुबळीकर यांचा जन्म झाला. बालपण कष्टाचेच. मात्र गाण्याची बर्यापैकी समज असल्यामुळे नाटक व चित्रपटात त्यानां संधी मिळाली. भालजी पेंढारकर यांच्या “कान्होपात्रा”या चित्रपटात शांताबाईंना सर्वप्रथम संधी मिळाली. यातील भूमिकेमुळेच शांताराम बापूना त्या या भूमिकेसाठी योग्य वाटल्या. हा एक योगायोगच म्हणावा लागेल की संत कान्होपात्रा या पण नायकिनीच्या परंपंरेतील पण नंतर संत पदास पोहचलेल्या स्त्री. शांताबाईंनी मैना ही भूमिका मिळाली तीही वेश्येची. त्यानां प्रभात फिल्म कंपनीत “माझा मुलगा”,”माणूस” या दोन चित्रपटात नायिकेच्या भूमिका मिळाल्या. या दोन्ही चित्रपटातील भूमिकांचं कौतुक झाले. शिवाय त्यांनी गायलेली गाणीही लोकप्रिय झाली. ”माणूस” चित्रपटातील “ आता कशाला उद्याची बात” हे त्यांचे गाणे आजही लोक बऱ्यापैकी आवडीने एकतात.
लाज”,”कुलकलंक”,”मालन”,”घरगृहस्थी”, इत्यादी हिंदी चित्रपटांत देखिल त्यांनी कामे केली. विश्राम बेडेकर दिग्दर्शित ”पहिला पाळणा” मध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केली. १९३९ मध्ये बापूसाहेब गीते यांच्या बरोबर त्यांनी लग्न केले पण लग्ना नंतरही कौटुंबिक परिस्थितीची गाडी रूळावर येत नव्हती म्हणून त्या चित्रपटातुन काम करतच राहिल्या. नंतर वयोमानामुळे त्यानां चरित्र भमिकेकडे वळावे लागले. आजच्या पिढीला त्या काळातील अभिनेत्यांचा अभिनय ओव्हरअक्ट वाटू शकतो. कारण त्यावेळी नाटकीय अभिनयाच्या प्रभावातून चित्रपट मुक्त झाला नव्हता. मला महत्वाचे वाटते ते हे की कायम सामाजिक उपेक्षा सहन करणाऱ्या या समूहाचे चित्रण करण्याचे धाडस निर्माते, दिग्दर्शक व अभिनेत्री शांताबाई यांनी दाखवले आणि त्या पात्राला न्याय ही दिला. अनेकदा चित्रपटाचा नायक त्यातील विषय हाच असतो.
शांताबाई हुबळीकरांचे उत्तर आयुष्य मात्र अत्यंत हालाखित गेले. १९५८ साली प्रदर्शित झालेला फिल्मिस्तान बॅनरचा हिंदीतील “सौभाग्यवती भव” हा त्यांचा शेवटचा चित्रपट.यात पहिल्यांदाच त्या चरित्र अभिनेत्रीच्या भूमिकेत होत्या. नंतर मात्र त्या चित्रपटसृष्टीतील लखलखाटा पासून दूर गेल्या. अनेक वर्षे तर त्या अनाथ आश्रमातच होत्या. नंतर १९८८ मध्ये त्या अज्ञातवासातून बाहेर आल्या खऱ्या पण कौटुंबिक सुख काही पदरी पडले नाही. पती बापूसाहेब गीते १९७७ सालीच निधन पावले होते.इ शेवटी शेवटी त्या पुण्याच्या अनाथ महिला आश्रमात राहिल्या. १७ जुलै १९९२ रोजी त्यांची ही कष्टमय यात्रा अखेर संपली. कधी काळी देशभर प्रसिद्ध असलेल्या शांता हुबळीकरांचा शेवट असा विजनवासात व्हावा हे मात्र खूप खटकते. चित्रपट ही मायावी नगरी आहे असे म्हटले जाते ते कदाचित यामुळेच. आज त्यांचा स्मरण दिवस.
दासू भगत (१७ जुलै २०१७)
आर्टिकल तर नेहमीच आनंदायी असते.आज एकत्र खिजीना सापडला आणि सध्या काय चालू आहे? या प्रश्नाचे उत्तर मिळाले .आनंद वाटला .