जिथे नसावा गलबला, गलका, कोलाहल काही
काळालाही शाप नसावा, लगबग वा घिसाडघाई
मनस्ताप वा कसली चिंता, गोंगाटही नाही
शांततेला मग धीर यावा, नीरवता जिवंत व्हावी ॥
असावी शांततेला एक वात्सल्याची झाक
काळालाही नसावा वेळेचा काही धाक
ऐकू यावी अंतरीची केवळ हळूवार हाक
समाधि लागावी या जगाची न उरे जाग ।।
जिथे विहरावा वारा मुक्त आपुलकीचा आज
जिथे सागरा उधाण यावे चैतन्याचा हो स्पर्श
जिथे व्हावे मोकळे आकाश, विसरुनी सारे पाश
गर्भरेशमी हिरव्यापानी, लेवून लवावी लाज ॥
जिथे नसावी घरांना द्वारे मोकळे व्हावे कोंडले श्वास
संकोचाचे संदर्भ सुटावे आकारुनी यावे अपूर्ण ध्यास
स्वर्गाचा तो तोल ढळूनी, तादात्म्याचे ताल जुळावे
द्वैताचे मग भान हरपूनी, धरिणीमध्ये आभाळ मिळावे ॥
जिथे नसावी जुनी जळमटे, उमेदीला वा भगदाडे
ममत्वाच्या भासाने खुलावी, मनामनाची हळू कवाडे
शांत सनातन शांतीच्या मग कुशीत होऊन अधीन
आसमंतात विरघळत जावे, व्हावे निसर्गाशी तल्लीन ॥
(जगभरच्या वाढत्या कोलाहलात, गर्दीत दुर्मिळ झालेल्या शांततेचा कधी अनिवार ध्यास लागतो. काही नको फक्त आपण व आपली शांतता एवढंच हवं असं वाटू लागतं)
-यतीन सामंत
Leave a Reply