नवीन लेखन...

शापित बालपण

‘ ए पोऱ्या,चार ग्लास घेऊन ये रे. अद्रक थोडे जास्त घालायला सांग रे.’
‘अरे, बाबा दोन कट घेऊन ये.’ किंवा,
‘झाडू फरशी साठी, घरकामासाठी तुझी मुलगी आली तरी चालेल’. हा कामवाली बरोबर चाललेला संवाद. अशा प्रकारचे संवाद दरोज कुठेतरी दिवसभरात कानावर पडतातच आपल्या.

रसवंतीच्या दुकानावर वरील शब्द कानी पडले, आणि चमकून बघितले तर, एक अकरा बारा वर्षाचा कोवळा मुलगा अंगावर मळकट झालेले कपडे,तुटलेली पायातली चप्पल, व्हिटॅमिन्सच्या डेफिसियन्सी मुळे चेहर्‍यावरील पांढरे डाग. असे रूप घेऊन माझ्या नजरेस पडला. ‘बरं साहेब’ म्हणून तो लगबगीने रस काढावयाचा यंत्रा जवळ जाऊन, सराईतपणे दोन हातात चार रसाचे ग्लास घेऊन आला पटकन.

मी माझ्या बालपणात रमले आणि नकळतपणे आपल्या आणि त्या मुलाच्या बालपणाची तुलना करू लागले. आपले किंवा इतर सुखवस्तू घरातील मुलांचे बालपण किती सुखावह असते. सुरुवातीला चार पाच वर्षाचा काळ खूपच लाड होत असतो.त्यानंतरही तोंडातून पडेल तो शब्द झेलला जातो. अतिशय चांगल्या प्रतीचे शिक्षण होईल अशी शाळा निवडली जाते. कपड्यांचे खाण्याचे काय लाड होत असतात! हे असं होतं म्हणूनच असे निरागस बालपण पुन्हा पुन्हा यावे असे वाटून, ‘लहानपण देगा देवा’ तोंडातून सहजपणे बाहेर पडते.

अशी कामं करणारी मुलं, ज्यांना आपण “बालकामगार” अशी संज्ञा देतो. त्यांना निरागसपण नसतेच मुळी. अकाली प्रौढ बनत प्रौढां सारखी कामं करतात ती! त्यातील बोटावर मोजता येण्यासारखी काही मुलं जिद्दीने आपल्या स्वतःच्या मनातील शिकण्याची उर्मी काही प्रमाणात पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. ते सुद्धा स्वतःच्या कमाईवर !

निरागस बालपण त्यांनी का उपभोगू नये ? त्यांना तो अधिकार का नसावा ? का त्यांनी अवेळी कोमजून जावे ? आणि त्यांची ‘बालकामगार’ अशी एक वेगळी कॅटेगरी समाजात कशासाठी तयार व्हावी? या सर्व प्रश्नांचा विचार केल्यास, या सर्व परिस्थितीला केवळ त्यांच्या पालकांनाच दोष देऊन चालणार नाही. त्यांच्याबरोबरच त्यांची आर्थिक परिस्थिती तसेच सामाजिक परिस्थिती ही तेवढीच जबाबदार आहे.

दारिद्र्यरेषेखाली जगत असणारे त्यांचे आई-वडील हेतुपुरस्सर निसर्ग नियमाच्या विरोधात न जाता कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढती ठेवण्यात धन्यता मानतात.मग त्यांच्या समोर एवढी पोटं भरण्याचा प्रश्न आ वासून ऊभा रहातो. दोन वेळा पोटात काही प्रमाणात तरी अन्न जावे हे एकच उद्दिष्ट समोर ठेवत ,आपले मूल दहा वर्षांचे झाले की, हे पालक त्याला कामाला पिटाळतात. तो कोणते काम करतो? कुठे करतो? वगैरे गोष्टींकडे लक्ष देण्याचा विषय पालकांच्या गावीही नसते. मिळेल ते काम करून चार पैसे आले हातात की आपल्या आई बापाला द्यायचे असतात एवढेच त्यांना माहीत असते. तो आपले पोट बाहेर काढतोय यातच पालक धन्यता मानतात. त्याला त्यावेळी स्वतःच्या गरजांचा विचार नसतोच. आर्थिक परिस्थितीमुळे वर उल्लेख केलेल्या वर्गाच्या भावना बधिर होऊन जातात असे म्हणू या आपण….

पण सभोवतीचा इतर समाज तो का डोळ्यावर कातडे ओढून बसतो? आहे रे आणि नाही रे असे दोन टोकाचे वर्ग का निर्माण व्हावेत? आहे रे म्हणणारा समाज आणखी हव्यास करतो आणि कमी पैशात भरपूर काम करणारा चांगला मुलगा मिळतोय म्हटल्यावर नाही म्हणणे अशक्यच असते. पण स्वतःच्या कुटुंबासाठी मुलांसाठी आराम मिळावा म्हणून या आहेरे वर्गाच्या माणसाच्या मनात एक क्षणासाठी सुद्धा कामावर असणाऱ्या मुलाच्या बालपणाचा विचार डोकावू नये? हा केवढा विरोधाभास!

रसवंती असुदे चहाची टपरी किंवा हॉटेलमध्ये, किंवा दुकानांमध्ये किंवा घरकामासाठी या सर्वांबरोबर इतर अनेक ठिकाणी १०ते १८ वर्षे वयोगटातील मुले व मुली काम करताना दिसतात. त्यांच्याकडे बघितल्यानंतर खरोखरच मनात खूप कालवाकालव होते. त्यांना दिशा दाखवणारे कोणीतरी पुढे यावे त्यांच्या किमान मूलभूत गरजा तरी पूर्ण झाल्या पाहिजेत असे वाटत रहाते. असे वाटणारा एखादा समोर येतो, आणि ‘समाजकार्य’ या नावाखाली त्यांना थोडीफार मदत करतो. पण तेवढे पुरेसे आहे का? उलट, या वयोगटातील मुलांना बालकामगार म्हणून कामाला लावले जाणार नाही अशी सर्वांनी शपथ घेतली पाहिजे. एवढेच नव्हे तर प्रत्येक वॉर्ड मधील नागरिकांनी एकत्र येऊन, एखादी सेवा भावी संस्था स्थापन करावी ज्यातून बालकामगारांसाठी त्यांच्या मानसिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उत्कर्षासाठी सढळ हाताने मदत करावी . त्याला व्यवस्थित मार्गाला लावून केवळ त्याचे आयुष्य नव्हे तर त्याचे कुटुंब ताठ उभे राहण्यासाठी मदत करावी.त्या माध्यमातून समाजकार्य केल्या ची कृतार्थ भावना आठवणीत ठेवावी .

शासन स्तरावरही केवळ बालकामगारांसाठी जाणीवपूर्वक उपाययोजना केलेली दिसत नाही.भरीव अशी कोणतीही तरतूद केलेली दिसत नाही.बालसुधारगृह, ज्यूवेनाईल कोर्टस, समुपदेशन केंद्र त्यांचे पुनर्वसन इत्यादी तरतुदी आहेत.पण त्यात बालकामगारां पेक्षा बालगुन्हेगारांना प्राधान्य देऊन केलेल्या योजना जास्त आहेत. प्रौढ कामगारांचे जसे संघटन आहे .ते किमान बहिष्काराच्या मार्गाने जशी संपूर्ण व्यवस्था ठप्प करु शकतात, असेही काही हत्यार या बालकामगारांच्या हातात नाही. त्यामुळे त्यांच्यावर होणारा अन्यायही समोर येऊ शकत नाही. बालकांकडून मजुरीचे काम करून घेऊ नये अशी कायद्यात तरतूद असेल, तरीही त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे होताना दिसत नाही. पण आपण सर्वांनीच जर बालकांना कामावर ठेवायचेच नाही उलट कोणी काम मागावयास आला तर त्याला शक्य तेवढी आर्थिक मदत करून त्याचे समुपदेशन करावे आणि एखाद्या सामाजिक संस्थेकडे त्याला घडवण्याची जबाबदारी देऊन समाजाच्या ऋणातून काही अंशी तरी मुक्त व्हावे. असे केल्यास बालकामगार हा समाजातील वर्ग आपोआपच संपावयास मदत होईल. यात शंका नाही. समाजाच्या सुदृढ मानसिकतेचे हे एक द्योतकच ठरेल…….

© नंदिनी म. देशपांडे.

Avatar
About नंदिनी मधुकर देशपांडे 18 Articles
ललित लिखाणाची खास आवड आहे. मासिकं,दिवाळी अंक, दैनिकातून लेखन करते.'आठवणींचा मोरपिसारा' हा ललित लेख संग्रह प्रकाशित झालेला असून, त्यास प्रथम प्रकाशनाचा पुरस्कार प्राप्त आहे.(२०१६-१७). 'मनमोर'नावाचा ब्लॉग आहे. वाचनाची आवड जोपासणे. शिक्षण. एम.ए. बी.एड. एल.एल.बी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..