संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या कन्या डॉ. अपर्णा मयेकर .पूर्वाश्रमीच्या रेखा डावजेकर यांनी जागवलेल्या आठवणी..
१५ नोव्हेंबर १९१७ ला पुण्याजवळ कोंडुर येथे दत्तात्रेय शंकर डावजेकर ऊर्फ डी. डी. यांचा जन्म झाला. तो दिवस होता दिवाळीतला पाडवा. अतिशय शुभ दिवस. डी. डीं.चे वडील शंकर डावजेकर हे उर्दू, मराठी नाटके व कीर्तनात तबला वाजवीत असत. त्यामुळे डी. डीं.ना लहानपणापासूनच संगीताचे बाळकडू मिळाले. दुर्दैवाने डी. डी. चार वर्षांचे असतानाच त्यांची आई बाळंतपणात दगावली. डी. डी. पुण्याच्या नूतन मराठी हायस्कूलमध्ये शिकले. बुद्धीने अतिशय तल्लख. वर्गात पहिला नंबर कधी सोडला नाही. इंजिनीअर व्हावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती, पण गरिबीमुळे ते जमणे नव्हते. इयत्ता पाचवीत असताना साबणाच्या डबीत त्यांनी रेडिओ बांधला होता. ते सातवीत असताना लंडनला मेकॅनोची स्पर्धा होती. तेथे डी. डीं.च्या सर्किटला पहिले बक्षीस मिळाले. नूतन मराठीमध्ये असताना डी. डीं.च्या वर्गात दादा खरे म्हणून होते. त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील मॅगझिन्स येत असत. ती वाचून डी. डी. नवनवीन काही बनवण्याचा प्रयत्न करीत असत. तबलाही डी. डी. दादांकडूनच शिकले.
त्यावेळी स्वातंत्र्यलढय़ात प्रभातफेऱ्या निघत. या प्रभात फेऱ्यांतल्या गाण्यांना चाली लावून डी. डी. गात असत व इतरांनाही शिकवत असत. यादरम्यान नभोवाणीवरही ते गाण्यांना संगीत देऊ लागले. जलतरंग, दिलरुबा, हार्मोनियम व तबला ही वाद्ये ते लीलया वाजवीत. पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये डी. डीं.चे अॅोपेंडिक्सचे ऑपरेशन झाले तेव्हा ते तिथे रोज दिलरुबा वाजवीत. डॉक्टर मंडळी ते ऐकायला येत असत.
वाल्हे येथील इंदुमती बनसोड यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यावेळेस डी. डी. कोल्हापुरात राहत होते. राजारामपुरीत मालती बंगला येथे ते वास्तव्यास होते. अभिनेत्री बेबी नंदा यांचे पिताश्री मा. विनायक यांच्या प्रफुल्ल पिक्चर्समध्ये ते संगीतकार म्हणून नोकरीस होते. एकदा विनायक त्यांना म्हणाले, ‘अरे दत्ता, आज एक मुलगी गाण्याची ऑडिशन द्यायला येईल.’ नंतर एक सडपातळ, खूप लांब केसवाली आणि दोन वेण्या घातलेली एक मुलगी ऑडिशनला आली. साधारण १३-१४ वर्षांची असावी. डी. डीं.ना वाटले, की एवढी लहान मुलगी काय गाणार? पण जसे तिने गाणे सुरू केले, डी. डी. आश्चर्यातच पडले. अतिशय गोड आवाज, उत्कृष्ट हरकती, तालाची उत्तम समज! तिला कुठे ठेवू अन् कुठे नको असे डी. डीं.ना होऊन गेले. ‘अजून एक गाणं म्हण.. एक चॉकलेट देतो,’ असे करत करत डी. डीं.नी तिच्याकडून सात-आठ गाणी गाऊन घेतली. धावतच ते मा. विनायकांकडे गेले व म्हणाले, ‘ती मागेल तो पगार द्या; पण तिला नोकरीत ठेवून घ्या. फार गुणी मुलगी आहे.’ यावर मा. विनायक हसून म्हणाले, ‘अरे दत्ता, ही लता. माझी पुतणी! दीनानाथ मंगेशकरांची मुलगी!!’ अशा तऱ्हेने स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांची ऑडिशन घेण्याचा मान डी. डीं.ना मिळाला. ‘माझं बाळ’ या चित्रपटात पाचही मंगेशकर भावंडांना प्रथम पाश्र्वगायनाची संधी देण्याचा मानही डी. डीं.नाच मिळाला. तद्वत लतादीदींचे पहिले हिंदी चित्रपटगीत ‘पा लागू करजोरी’ (चित्रपट : ‘आपकी सेवा में’) हेपण डी. डीं.नीच कम्पोज केले होते. अशा तऱ्हेने या स्वरसम्राज्ञीचे पदार्पणाचे मराठी व हिंदी चित्रपटगीत देण्याचा मान डी. डीं.ना मिळाला. वसंतराव देशपांडेंसारख्या दिग्गज गायकाला ‘पेडगावचे शहाणे’मध्ये डी. डीं.नी प्रथम गाणे दिले. पंडित जितेंद्र अभिषेकींनीही पहिले पाश्र्वगायन डी. डीं.कडेच केले होते. ते म्हणजे.. ‘गोमू माहेरला जाते हो नाखवा’!
त्यांनी सुधा मल्होत्राला ‘गोवलकोंडा का कैदी’ या चित्रपटात पहिल्यांदा ब्रेक दिला. त्यांनी अभिनेता प्रेमनाथलाही या चित्रपटात गायला लावले. माणिक दादरकर (माणिक वर्मा) यांची पहिली एच. एम. व्ही. रेकॉर्ड डी. डीं.नीच काढली. पं. हरिप्रसाद चौरासिया व अनिल मोहिले यांनाही पहिला ब्रेक त्यांनीच दिला. कोल्हापुरात असताना डी. डी. आणि लताबाई एकत्र खेळतही असत. लताबाई व आशाबाई यांच्याकडून डी. डीं.ना बरेच काही शिकावयास मिळाले. आणि त्यांनीही डी. डीं.वर मोठय़ा भावाप्रमाणे माया केली. लताबाईंनी ‘आनंदघन’ नावाने संगीत दिले. त्या चित्रपटाचे संगीत संयोजन व पाश्र्वसंगीत डी. डीं.नी केले आहे. मुंबईत आल्यानंतर डी. डी. काही काळ एच. एम. व्ही.मध्ये नोकरीला होते. तेथे जी. एन. जोशी आणि गजानन वाटवेंशी त्यांची ओळख झाली. वाटवेंचे काही कार्यक्रमही डी. डीं.नी वाजवले. ‘थांबते मी रोज येथे’, ‘कुणी बाई गुणगुणले’ ही आशाबाईंची एच. एम. व्ही. रेकॉर्ड, त्याचप्रमाणे ‘गेला कुठे बाई कान्हा’, ‘तुज स्वप्नी पाहिले रे गोपाला’ ही लतादीदींची एच. एम. व्ही. रेकॉर्डही तेव्हाच प्रसिद्ध झाली. ही सर्व गाणी डी. डीं.नीच लिहिली व त्यांना चालीही दिल्या. नंतर सी. रामचंद्रन यांच्याकडे डी. डीं.नी साहाय्यक म्हणून काम केले. रोशनजी व चित्रगुप्त (आजचे संगीतकार आनंद-मिलिंद यांचे वडील) यांच्याकडेही त्यांनी काम केले. त्याबरोबरच स्वतंत्रपणे संगीत दिग्दर्शन देणेही सुरूच होते. पण डी. डीं.ना खरा ब्रेक मिळाला तो ‘रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटापासून! त्याला महाराष्ट्र सरकारचे पारितोषिक मिळाले. हा चित्रपट तवायफच्या जीवनावर होता. गाण्यात तो बाज असावा म्हणून डी. डी. व दिग्दर्शक राजा ठाकूर हे काही दिवस रेडलाइट एरियात जाऊन गाणी ऐकायचे. नंतर ‘तेरे वादे भी सपने दिखाते रहे’ हे गाणे आशाताईंच्या आवाजात रेकॉर्ड झाले व त्यांनासुद्धा उत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला.
मग मात्र डी. डीं.कडे चित्रपटांची रीघ लागली. डी. डीं.चा पाश्र्वसंगीत देण्यात हातखंडा होता. त्यामुळे राजा परांजपेंनी त्यांना ‘पाठलाग’ हा भयपट दिला. फक्त पाच वादकांमध्ये केलेले ‘या डोळ्यांची दोन पाखरे’ हे गाणे प्रचंड गाजले. ‘नको मारूस हाक’ हे गाणेही लोकप्रिय झाले. डी. डीं.ना व आशाताईंना पुरस्कार मिळाले. पुन्हा ‘पडछाया’मध्ये ‘बाई माझी करंगळी मोडली’, ‘उठ शंकरा, सोड समाधी’ ही गाणी गाजली. गजानन जागीरदार, धर्माधिकारी, राजा ठाकूर, यशवंत पेटकर, भालजी पेंढारकर यांच्यासारख्या मातब्बर लोकांबरोबर डी. डीं.नी काम केले. वसंतराव जोगळेकर, राजदत्त यांच्यासमवेतही त्यांनी काम केले. डी. डीं.ना नवनवीन प्रयोग करायला आवडत. ‘काका, मला वाचवा’ या चित्रपटात ‘सा सागर उसळे कैसा’ हे सप्तसुरांचे गाणे डी. डीं.नी ग. दि. माडगूळकरांकडून लिहून घेतले. ‘साऊंड अॅाण्ड म्युझिक’ या चित्रपटातील गाण्यावरून ती कल्पना घेतली होती. ‘आसावल्या मनाला’ या गाण्यात डी. डीं.नी तोडी रागात शुद्ध धैवत लावला होता. ‘रंगल्या रात्री अशा’, ‘पाठलाग’, ‘पडछाया’, ‘पाहू रे किती वाट’, ‘संथ वाहते कृष्णामाई’, ‘धरतीची लेकरे’ यासारखे अनेक चित्रपट डी. डीं.नी केले.
याशिवाय रेडिओच्या अनेक संगीतिका, बालचित्रवाणीचे चित्रपट, अनेक माहितीपटही त्यांनी केले. १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आमचे नेहमी कार्यक्रम होत. एका हुतात्मादिनी ऑगस्ट क्रांती मैदानात मला इंदिरा गांधींच्या शेजारी बसून गाण्याची संधी मिळाली. डी. डी. हे बहुगुणी व्यक्तिमत्त्व होते. ते संगीतकार होते, तसेच कवी आणि लेखकही होते. त्यांनी लिहिलेली ‘सांतानेरीचा अपघात’ ही भयकथा वाचली की अंगावर काटा येतो. ‘विज्ञानयुग’ या मासिकात इलेक्ट्रॉनिक्स या विषयावर त्यांची लेखमाला येत असे. माझा मोठा भाऊ विजय हा इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर आहे. त्याच्या मदतीने त्यांनी अनेक म्युझिकल इन्स्ट्रमेंट्स बनवली. इलेक्ट्रॉनिक तानपुरा, स्वरमंजुषा, सूरपेटी, लेहेरासाथी. त्यात वेगवेगळे ६०० ताल होते. सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे भारतातील पहिला सिंथेसायझर डी. डीं.नी बनवला. त्याला तेव्हा क्लेव्हायोलिन म्हणत. पूर्वी परदेशी सिंथेसायझर अवाढव्य असत. डी. डीं.नी हा सिंथेसायझर सुटसुटीत बनवला. कौतुकाची गोष्ट म्हणजे आर. डी. बर्मनच्या साहाय्यकांनी तो आर. डीं.च्या जवळजवळ ३०० रेकॉर्डिग्जमध्ये वाजवला. डी. डी. उत्कृष्ट टॅप डान्सर होते. त्यावेळची प्रसिद्ध अभिनेत्री बेबी आचरेकर हिच्याबरोबर डी. डीं.नी चित्रपटात टॅप डान्स केला होता. तसेच केवळ तीस सेकंदांत समोरच्या व्यक्तीचे रेखाचित्र डी. डी. काढत असत. आमच्या भीमराववाडीच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावरील चित्र नेहमी डी. डी.च काढत. एकदा एका काळ्या कागदावर तेली खडूंनी केशरी रंगात ‘मंगळावरचा माणूस’ हे चित्र त्यांनी काढले होते. ते ग. दि. माडगूळकरांना एवढे आवडले, की त्यांच्या ‘पंचवटी’ बंगल्यात ते त्यांनी हॉलमध्ये लावले होते. ग. दि. मा. एकदा म्हणाले होते, की- ‘मी लिहिलेल्या काव्यात जर कधी बदल करावयाचा असेल तर तो अधिकार मी फक्त डी. डीं.ना देईन. कारण त्यांना काव्याची जाण आहे.’
डी. डीं.ना परिस्थितीमुळे स्वत:ला फार शिकता आले नाही. त्यामुळे आम्ही भावंडांनी खूप शिकावे असा त्यांचा व आईचा आग्रह असे. त्याप्रमाणे विजय इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर, विनय ऊर्फ पप्या सिव्हिल इंजिनीअर आणि मी डॉक्टर झाले. धाकटी बहीण ललिता (डॉली) हिचे ड्रॉइंग अतिशय सुंदर असल्याने तिने जे. जे. स्कूलमध्ये कलाशिक्षण घेतले. डी. डीं.कडे एवढे कलागुण असूनही त्यांचे म्हणावे तसे चीज झाले नाही. त्यामुळे मी त्यांना ‘शापित योगी’ म्हणते. योगी- कारण ते स्थितप्रज्ञ होते. कौतुक झाले, नाव मिळाले म्हणून गर्व नाही. आणि वाईट परिस्थिती आली म्हणून विषादही नाही. जेव्हापासून मला कळायला लागले- माझे वडील डी. डी. म्हणजे खूप ‘मोठा माणूस’ आहे- मला खूप आश्चर्य वाटायचे. माझ्या मैत्रिणींना खूप उत्सुकता असायची. ‘ए रेखा, एकदा आम्हाला डी. डीं.ना बघायचंय,’ असे त्या म्हणत. मग मी त्यांना घरी घेऊन आले की त्यांचा भ्रमनिरास व्हायचा. वडील नेहमी पांढरा सदरा, पायजमा किंवा पांढरी चड्डी अशा वेशात असायचे. एकदम साधे. डामडौल नाही. भपका नाही. लोकांच्या अपेक्षेत डी. डी. म्हणजे ‘स्टाईलबाज’ माणूस असावा. पण मग सहवासात आल्यावर त्यांचा साधेपणा, ज्ञान, मिश्कील स्वभाव याने ते समोरच्याला जिंकायचे. मला नेहमी म्हणायचे, ‘शेवटच्या क्षणापर्यंत माणसाने काहीतरी शिकत राहावे. काहीतरी नवीन करावे, म्हणजे मेंदू तल्लख राहतो.’ एक गोष्ट आठवते. वयाच्या २४ व्या वर्षी मी रेखा डावजेकरची ‘सौ. अपर्णा मयेकर’ झाले. पण इतक्या वर्षांत मी त्यांना कधीही रागावलेले बघितले नाही.
वसंतराव जोगळेकरांचा ‘शेवटचा मालुसरा’ हा चित्रपट डी. डीं.नी केला. ‘तुझे रूप राणी’ या गाण्यासाठी महेंद्र कपूरना अॅशवार्ड मिळाले. पुढचा ‘हा खेळ सावल्यांचा’ हा चित्रपट डी. डीं.नी साइन केला. त्यासाठी रवींद्र साठेंना घेऊन गाणेही बसवले. आणि अचानक वसंतराव जोगळेकरांकडून फोन आला- ‘डावजेकर, हा चित्रपट मी हृदयनाथला (बाळ) देत आहे.’ आम्ही सगळे नव्र्हस झालो. पण डी. डी. म्हणाले, ‘अरे वा! बाळ गुणी संगीतकार आहे. छान संगीत देईल. माझ्या त्याला शुभेच्छा!’ किती मोठे मन! चित्रपट हातातून गेला याचे दु:ख तर नाहीच; उलट बाळला मनापासून त्यांनी शुभेच्छा दिल्या. म्हणूनच मी डी. डीं.ना योगी म्हणते. अजातशत्रू असणे म्हणजे काय, हे त्यांना पाहून कळावे. आयुष्यात त्यांना बरेच पुरस्कार मिळाले. महाराष्ट्र शासनाचे, सूरसिंगार, लता मंगेशकर पुरस्कार, झी जीवनगौरव पुरस्कार, ग. दि. मा. पुरस्कार, वगैरे वगैरे. पण डी. डी. नेहमी जमिनीवरच!
साधे घसरून पडण्याने माकडहाड दुखावले गेले आणि एका आठवडय़ातच माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ते अनंतात विलीन झाले. कॉलनीतली माणसे म्हणाली, ‘अजून डी. डी. आम्हाला ‘वॉक’ करताना दिसतात.’ डी. डी. नेहमी म्हणायचे, ‘मला पुनर्जन्म नाही.’ कदाचित परमेश्वराला पण त्यांचे सुंदर संगीत कायम ऐकावेसे वाटले असेल.
डॉ. अपर्णा मयेकर
संकलन.संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply