राजकारण्यांनी जेव्हापासून शिक्षकांना पदरी नोकरीला ठेवायला सुरुवात केली तेव्हापासून शिक्षकांनी शरणपत्रे लिहून द्यायला सुरुवात केली. पुराणकाळात सुरुवात झाली द्रोणाचार्यांपासून! त्यांना धृतराष्ट्राने आपल्या पुत्रांसाठी – कौरव-पांडवांसाठी गुरु (शिक्षक) म्हणून नेमले. आणि मग द्रोणाचार्य कुरुक्षेत्राच्या युद्धात (कदाचित) मनाविरुद्ध ओढले गेले-राजनिष्ठेचे पालन म्हणून !
आज विविध शिक्षण संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक (मुख्यत्वे, क्वचित विना-वेतन काम करणारे ) संस्थाचालकांसाठी असेच पडतील ती कामे करण्यासाठी (पोटार्थ) राबविले जातात.
मी आणि माझ्या पत्नीनेही एका राजकारणी संस्थाचालकासाठी त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काम केले होते- म्हणजे जीपवरील माईकवर देण्यासाठी घोषणा लिहून देणे टाईप !
आजचा प्रसंग पुरातन पण समर्पक – शिक्षकांची बंडाळी अलगद मोडून काढणारा!
एका तंत्रनिकेतनातील प्राध्यापकांनी संस्थाचालकांना पत्र देऊन विनंती केली- ” आम्हांला सेवा शर्ती लागू करा.”
तेथे एका वर्षासाठी एकरकमी (consolidated) पगार देऊन नेमणूक केली जात असे. एक वर्षानंतर वेतनश्रेणी, भत्ते लागू होत असत.
सदर प्रसंगातील प्राध्यापकांना वाटले की हे सगळं पहिल्या दिवसापासून सुरु व्हायला हवं. कोणीतरी ही काडी पेटविली आणि पत्रलेखन आणि त्यांवर विद्यमान प्राध्यापकांनी सह्या इत्यादी झाले. काही सुबुद्ध आणि अधिक पावसाळे पाहिलेले प्राध्यापक या उचापतींपासून दूर राहिले. काही कुंपणावर बसले. काही उत्साही excite होऊन संस्थाचालकांकडे पत्र देण्यासाठी गेले.
काही दिवस उत्सुकतेत, त्यानंतरचे काही अस्वस्थतेत गेले. पत्राची कोणतीही दखल नव्हती, ना त्यामधील मागण्यांवर काही कार्यवाही ! संस्था शांतपणे,वरकरणी पूर्वीसारखी सुरु होती.
दरम्यान प्राध्यापक एकीला तडे जाऊ लागले. काहीजण पश्चात्ताप दग्ध वगैरे झाले. कुजबुजीचे रूपांतर क्वचित वादांमध्ये ,हमरीतुमरीवर येण्यात झाले. पत्रानंतर काही reminder वगैरे देऊ यात का अशा चर्चांवर रीतसर भडकाभडकी झाली.
एखाद्या प्राध्यापकाचे वर्ष संपत आले की व्यवस्थापन त्याला गुपचूप बोलावून सांगत असे- ” एक पत्र द्या- मला काही माहीत नव्हते. मी पत्रावर चुकून (?) सही केली. माझी काही तक्रार नाही.”
जी व्यक्ती असे पत्र देत असे, त्याला वेतनश्रेणी आणि इतर फायदे सुरु होत. पत्र देण्यास एखाद्याने नकार दिला तर माप्रपुचा !
” त्याचे ” वर्ष उलटून गेल्यावर त्याने काही महिने वाट पाहिली. सगळं ढिम्म ! मग त्याने समन्वयाकडे ( कारखाना आणि महाविद्यालय यामधील सांधा ) चौकशी केली.
“सर, तुम्ही सगळ्यांनी डायरेक्ट साहेबांना पत्र दिले, मग आता काय करणार?” (भोगा आता, असा त्यांचा टोन होता)
“यावर मार्ग?”
त्यांनी एक कोरा कागद पुढे सरकविला आणि म्हणाले – ” मी सांगतो तसे पत्र प्राचार्यांना लिहा. बाकीच्यांनीही दिले आहे ”
पत्र दिल्यावर पुढील महिन्यापासून त्या प्राध्यापकाचा अडलेला मार्ग मोकळा झाला.
पांढरे झेंडे हाती घेऊन उच्चशिक्षितांना कसे शरण आणायचे (खरंतर वठणीवर आणायचे) हे राजकारण्यांना न बोलता जमते.
आजची विनाअनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची अवस्था बहुधा याहून अधिक दारुण असावी.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे.
Leave a Reply