नवीन लेखन...

शर्मिली राखी

‘यश हेच चलनी नाणे’ ह्या पुस्तकातील दिलीप ठाकूर ह्यांनी लिहिलेला हा लेख


बरोब्बर अकरा वर्षांपूर्वीची म्हणजे २०१२ सालची गोष्ट. लोकसत्ता दिवाळी अंकासाठी सहाय्यक संपादक प्रवीण दीक्षित यांचा फोन आला, एक काळ गाजवलेले काही स्टार नंतर ‘पडद्याआड’ झाले. ते सध्या नेमके काय करताहेत, कुठे आहेत याबाबत अनेकांना कुतूहल आहे. अशीच एक अभिनेत्री म्हणजे राखी! तिची मुलाखत हवीय…

ही अपेक्षा आणि संधी दोन्ही खूप चांगली आहे याची पटकन कल्पना आली, पण पूर्वी ज्या पद्धतीने एखाद्या स्टारच्या घरी अथवा एखाद्याच्या ऑफिसात लॅण्डलाइनवर एक दोनदाही फोन करून मुलाखतीसाठी भेट व्हायची तसे या शतकाच्या सुरुवातीपासूनच दुर्मिळ होत गेले, अगदी अलिकडचे मराठी कलाकारही घरी शक्यतो बोलवत नाहीत हा स्वानुभव असल्याने राखी गुलजारला भेटायचे तर जुन्या स्टाईलने प्रयत्न करायला हवे, यश नक्कीच मिळेल असा विश्वास वाटला. राखीच काय जे कलाकार चित्रपटसृष्टीपासून दूर असतात, त्यांचा मोबाईल नंबर मिळवण्यापासून कष्ट असतात. त्यात यशही आले आणि आज उद्या करता करता एकदाची राखीची झालेली भेट अविस्मरणीय अनुभव ठरली.

रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील तारा गाव झाल्यावर डाव्या बाजूला एक रस्ता लागतो तेथून खूप आत गेल्यावर एका फार्महाऊसवर राखीचा मुक्काम होता. अनेक वर्षे पडद्यावर पाहिलेली राखी आणि आता प्रत्यक्षात समोर असलेली राखी यात कल्पनेपलीकडचा फरक असला तरी मूळचा व्यक्तिमत्वातील गोडवा कायम होता. आता केस पांढरे आणि विरळ होऊ लागले होते. पण बोलणं थेट.

काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या तर, एका कोणत्यातरी सिनेमाच्या शूटिंगसाठी येथे आले असता मला हा सगळा परिसर आपलासा वाटला. बंगालमधील माझ्या जुन्या घराची आठवण देणारा असाच आहे हे लक्षात आले. कालांतराने मी चित्रपटसृष्टीपासून दूर जायचे ठरवले तेव्हा मी येथेच यायचे ठरवले. सुरुवातीला मी येथे एकटीच होते. मग एक कुत्रा आला, मांजर आले, गाय आली, आणखीन काही प्राणी पक्षी आले आणि मग आम्ही सगळे एकमेकांचे साथिदार बनलो. आज मी एकटी आहे, पण एकाकी नाही. अधूनमधून गुलजारजी, मुलगी बोस्की येतात आणि आमच्या छान गप्पा होतात. सगळे जग विसरून आम्ही त्यात रंगून जातो… वगैरे वगैरे बरेच काही.

राखीच्या या मुलाखतीला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर काही वर्षातच ती पुन्हा मुंबईत येऊन राहिली. याच राखीच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील करियरचे हे पन्नासावे वर्ष सुरु आहे. राखी असं म्हणताक्षणीच छानशी गोबरे गाल असलेली, घारे टपोरे बोलके डोळे असलेली आणि पटकन भावना व्यक्त करणारा चेहरा असलेली सत्तरच्या दशकातील एक गोड यशस्वी अभिनेत्री पटकन डोळ्यासमोर यायलाच हवी असे तिचे हिंदी चित्रपटसृष्टीला कॉन्ट्रीब्यूशन नक्कीच आहे.

अष्टपैलू नायिका ते चरित्र भूमिका अशी राखीची पन्नास वर्षांची लक्षवेधक वाटचाल सुरु आहे. तिचा पहिला हिंदी चित्रपट सत्येन बोस दिग्दर्शित ‘जीवन मृत्यू’ (१९७०) रिलीज होऊन अर्धशतक पूर्ण झाले. या चित्रपटात डॅशिंग धर्मेंद्र तिचा हिरो होता. आज जरी ती अभिनयात कार्यरत नसली तरी तिच्या अनेक चित्रपटांची सिंगल स्क्रीन थिएटर्स- दूरदर्शन -व्हिडिओ-चॅनल-ऑनलाईन-ओटीटी अशी सुरु आहे. महत्वाचे म्हणजे, आपण कितीही गुणवान असलो, आपली चित्रपट व्यवसाय आणि माध्यमातून भूमिका साकारण्याची कितीही आणि कशीही क्षमता असो, आपण नेमके कधी थांबायला हवे हे राखीला लक्षात आले. हे अनेक क्षेत्रात फार जणांच्या लक्षात येते. हिंदी चित्रपटसृष्टीतील बदलती कार्यपद्धती आपणास रुचली नाही म्हणून आपण बाजूला व्हायचा निर्णय घेतला असे ती म्हणाली. एकेकाळी सर्व युनिट एकोप्याने काम करीत असे.

‘शर्मिला’तील आज मदहोश हुआ जाये रे या गाण्याच्या शेवटच्या कडव्यात राखीला गरोदर असल्याचे दाखवायचे होते आणि त्या अवस्थेत चालायचे होते, ते तिला सेटवरच्या कामगाराने दाखवले. तसे वातावरण आज राहिलेले नाही असे राखीच्या लक्षात आलं आणि या बदलाशी जुळवून घेण्यापेक्षा आपण आपलं व्यक्तीगत आयुष्य जगावे असे तिच्या मनाला पटले. आणि आपल्या मनाने घेतलेला निर्णय हा कायमच आपल्या हितकारक ठरतो असे राखीच्या बाबतीतही झाले.

राखीने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकण्यापूर्वी ‘बोधू बोरन’ (१९६७) बंगाली चित्रपटात भूमिका साकारली होती, (इतकेच नव्हे तर, तिचे संगीतकार अजय विश्वास यांचा मुलगा अजॉय याच्याशी वयाच्या पंधराव्याच वर्षी केलेले लग्न अजिबात टिकले नाही. ते लग्नाचे वय नव्हतं. १९६३ साली ती विवाहबद्ध झाली आणि १९६५ साली त्यांचा घटस्फोट झाला यात आश्चर्य ते काय? पण तो काळ पालकांच्या इच्छेनुसार लग्न करण्याचा होता ) पण प्रादेशिक चित्रपटापेक्षा हिंदी चित्रपटसृष्टी म्हणजे खूपच मोठी संधी आणि मोठी झेप घेण्यासाठी पूरक.

राखीला पहिला हिंदी चित्रपट मिळाला तोच राजश्री प्रॉडक्सन्ससारख्या प्रतिष्ठित बॅनरचा! निर्माते ताराचंद बडजात्या यांचा हा ‘जीवन मृत्यू’ वेगळ्या पद्धतीने रिलीज केला गेला. आजच्या ग्लोबल युगातील रसिकांना त्यात काही वेगळेपण दिसेल. तोपर्यंत प्रामुख्याने देव आनंद आणि शम्मी कपूर यांचे जुने म्युझिकल हिट चित्रपट मॅटीनी शोला रिलीज होत आणि अशा मॅटीनी शोचा एक हुकमी ऑडियन्स तयार होत गेला. तो काळच वेगळा होता. त्याच व्यावसायिक गणिताचा एखाद्या नवीन चित्रपटासाठी फायदा उठवला तर? तसा ‘जीवन मृत्यू’चे मुंबईत मेन थिएटर अलंकार येथे मॅटीनी शोला हा चित्रपट रिलीज तर केलाच तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटले या चित्रपटाने तेथेच मॅटीनी शोला तब्बल १०२ आठवड्यांचा यशस्वी मुक्काम केला.

रुपेरी पदार्पणातच असे घवघवीत यश म्हणजे, कारकिर्दीची गाडी योग्य रुळावरून धावण्यास सकारात्मक गोष्ट. पण तेव्हा एस्टॅब्लिज असलेल्या नूतन, तनुजा, माला सिन्हा, शर्मिला टागोर, सायरा बानू, मुमताज, कुमकुम यांच्या स्पर्धेत लीना चंदावरकरची यशस्वी भर पडलेली, त्याच वेळेस हेमा मालिनी ड्रीमगर्ल म्हणून नंबर वनची तारका म्हणून झपाट्याने लोकप्रिय होत होती. रेखाचीही लक्षवेधक वाटचाल सुरु झालेली, तात्पर्य, गुणवत्ता व सौंदर्य याच गुणांवर राखीला आपली रुपेरी वाटचाल आखणे गरजेचे होते. अशातच झीनत अमान, परवीन बाबी अशा वेस्टर्न लूकच्या अभिनेत्रीही आल्या. अभिनयाइतकेच छान दिसण्यास महत्व आले होते.

दोन्हीची केमिस्ट्री नवतारकाना आवश्यक होती आणि नायकप्रधान चित्रपटसृष्टी हळूहळू का होईना पण आकाराला येत होती. अशा वेळी कधी मागील पिढीतील देव आनंद (बनारसी बाबू, हीरा पन्ना), संजय खान (वफा), मनोजकुमार (बेईमान), राजेंद्रकुमार (आन बान), राजकुमार (लाल पत्थर) यांच्यासोबत भूमिका कर, तर कधी अगदी नवीन हिरोसोबत चित्रपट स्वीकार (राकेश रोशनसोबत ‘आँखो आँखो मे, त्याचा तो रिलीज झालेला पहिला चित्रपट) असे करावे लागतेच. अशा गोष्टी म्हणजे, तात्कालिक व्यावसायिक गरज असतेच आणि अशातच ‘चलनी नाण्यां’ सोबत भूमिका साकारत करियर पुढे न्यावी लागते. तिने तेव्हाच्या आघाडीच्या हीरोंसोबत चित्रपट स्वीकारले. धर्मेंद्रसोबत ‘ब्लॅक मेल’, संजीवकुमारसोबत ‘पारस’, जितेंद्रसोबत ‘यार मेरा’, शशी कपूरसोबत ‘शर्मिली’, राजेश खन्नासोबत ‘दाग’, ‘शहजादे’ अशा चित्रपटांनी राखीचे व्यवस्थित बस्तान बसले. त्यात तिच्या पर्सनालीटी आणि अभिनयाचा वाटा महत्वाचा.

यश चोप्रा दिग्दर्शित ‘दाग’ (१९७३) सेटवरील शर्मिला टागोर आणि राखी यांचा वाद गॉसिप्स मॅगझिनसाठी जणू खमंग झणझणीत फोडणी असलेला खुराक ठरला. हिंदी चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील ते एक अतिशय रोचक आणि ग्लॅमरस असे गॉसिप्स ठरले, म्हणजे त्यातही राखीचा स्कोअर आहेच. आजही त्याची रोचक रंजक चर्चा होते. राजेश खन्नासोबतची प्रणय दृश्य जास्त चांगली कोणाची आहेत आणि कोणाची भूमिका लांबीने मोठी आणि प्रभावी आहे, पब्लिसिटीत जास्त स्कोप कोणाला यावरुन झालेला या दोघींचा वाद लहान मोठ्या मॅगझिनमधून भारी गाजला.

एकीकडे हे होत असताना शशी कपूरशी तिचा खास दोस्ताना आहे अशी कुजबुज सुरु झाली, त्याची कंपनी त्याला आवडते असेही म्हटले गेले तरी राखी चक्क साहित्यिक, गीतकार, निर्माता आणि दिग्दर्शक गुलजार यांच्या प्रेमात पडली. दोघेही संवेदनशील असल्याने दोघांचीही मने पटकन जुळली आणि लगेचच त्यांनी लग्नदेखिल केले. पण सुखी संसारात मुलीला (अर्थात बोस्की) जन्म दिला आणि यांच्या संसारात खटके उडू लागले. तेही गॉसिप्स मॅगझिनमधून रंगले. राखीची महत्वाकांक्षा कायम आहे असेही म्हटले गेले. फिल्मी जगताचा मोह तिला सोडवत नाही असाही निष्कर्ष काढला गेला.

राखीला चित्रपटसृष्टीत पुनरागमनाचे वेध लागले आणि अशा मानसिकतेत जे व्हायचे तेच झाले. तिने यश चोप्रा दिग्दर्शित ‘कभी कभी’ (१९७६) आणि राजश्री प्रॉडक्सन्सचा अनिल गांगुली दिग्दर्शित ‘तपस्या’ (१९७६) हे चित्रपट स्वीकारून आपला रंगलेला डाव पुढे सुरु ठेवला, या टप्प्यावर तिला नायिका साकारताना काही वेगळ्या व्यक्तिरेखाही साकारायची संधी मिळाली आणि त्यातूनच ती चरित्र भूमिकेकडे वळली. म्हणजे तिचे परतणे तिच्या पथ्यावर पडले. ‘कभी कभी’ तर मल्टीस्टार कास्ट चित्रपट. मुंबईत मेन थिएटर मेट्रोत ज्युबिली हिट. तर ‘तपस्या’ तसा वन वुमन शो. सगळा सिनेमा राखीभोवती आणि त्याचा तिने पुरेपुर सकारात्मक उपयोग केला. या चित्रपटाने मुंबईत गंगा थिएटरमध्ये ज्युबिली हिट यश संपादले.

राखीच्या अष्टपैलू कारकिर्दीची वैशिष्ट्ये अनेक आहेत हे पुन्हा वेगळे सांगायला नकोच.

राखीने अमिताभ बच्चनसोबत विविधरंगी भूमिका साकारल्या. आणि हे तिचे खूप वेगळेपण आहे. रमेश बहेल दिग्दर्शित ‘कस्मे वादे’ मध्ये अमिताभची दुहेरी भूमिका आहे. त्यात एक व्यक्तिरेखा राखीच्या पतीची आहे, दुर्दैवाने त्याची एका झटापटीत हत्या होते आणि मग त्याच्यासारखाच दिसणारा या कुटुंबाच्या मदतीस येतो. शक्ती सामंता दिग्दर्शित ‘बरसात की एक रात’ मध्ये राखीने अमिताभची आंधळी प्रेयसी साकारलीय. तर प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘मुकद्दर का सिकंदर’मध्ये प्रेयसी तर ‘लावारिस’ मध्ये तिने अमिताभ तिचा अनौरस पुत्र आहे. यात ती अमजद खानची प्रेयसी आहे. व्यावसायिक धाडस म्हणतात ते हेच. रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शक्ती’मध्ये तिने अमिताभची आई साकारलीय. यात तिने दिलीप कुमारची पत्नी साकारलीय. मोठेच आव्हान होते. यश चोप्रा दिग्दर्शित ‘कभी कभी’मध्ये राखी अमिताभची प्रेयसी असते, पण तिचे लग्न शशी कपूरशी होते. यश चोप्रा दिग्दर्शित ‘त्रिशूल’, ‘काला पत्थर’, हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘बेमिसाल’, ‘जुर्माना’ या चित्रपटातही हे दोघेही वेगळ्या भूमिकेत आहेत. कालांतराने सुनील दर्शन दिग्दर्शित ‘बंधन कच्चे धागो का’मध्ये ते पती पत्नीच्या भूमिकेत आहेत. तोपर्यंत दोघेही चरित्र भूमिकेत रमले होते. राखीने कोणत्याही चौकटीत राहून काम केले नाही त्यामुळे तिच्या करियरचा विस्तार झाला.

राखीची जोडी जमली आणि शोभली ती देव आनंद आणि शशी कपूरसोबत! देवसाहेबांसोबत बनारसी बाबू, जोशीला, हीरा पन्ना, लूटमार, आनंद और आनंद अशा चित्रपटांत भूमिका साकारल्या. तर समीर गांगुली दिग्दर्शित ‘शर्मिली’ हा शशी कपूर आणि राखी या जोडीचा म्युझिकल मनोरंजक चित्रपट सुपरहिट झाला आणि ही जोडी जमली. हे दोघे एकमेकांना मॅचही ठरले. जानवर और इन्सान, कभी कभी, दुसरा आदमी, तृष्णा, बसेरा, बंधन कच्चे धागो का, जमीन आसमान, पिघलता आसमान या चित्रपटात त्यांनी एकत्र भूमिका साकारलीय. तसेच रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शान’मध्येही ते होतेच. पण भूमिका वेगळ्या होत्या. विजय आनंद दिग्दर्शित ‘एक दो तीन चार’ या मुहूर्तालाच बंद पडलेल्या चित्रपटात पुन्हा एकदा ते एकत्र आले होते. तर ‘दाग’ च्या वेळी ज्या शर्मिला टागोरशी वाद झाला त्याच शर्मिला टागोरसोबत वीस वर्षांनी म्हणजे १९९३ साली कल्पना लाजमी दिग्दर्शित ‘रुदाली’ या चित्रपटात भूमिका साकारली आणि आपल्या व्यावसायिकतेचा प्रत्यय दिला.

राखीने आणखीन काही वेगळ्या भूमिका साकारत सतत नवीन अनुभव घेतला. संवेदनशील कलाकारासाठी ते गरजेचे असतेच.

यशराज फिल्मच्या रमेश तलवार दिग्दर्शित ‘दुसरा आदमी’ या चित्रपटाती राखीने साकारलेली भूमिका वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती आपल्या ऑफिसमधील तरुण सहकारी (ऋषि कपूर) याच्यात आपला दिवंगत पती ( शशी कपूर ) पाहते आणि या तरुणाकडे भावनिकदृष्ट्या आकर्षित होते. अशी व्यक्तिरेखा साकारताना त्यातून प्रेक्षकांना चुकीचा संदेश जाऊ न देण्याची काळजी घ्यायची असते, राखीने त्यात यश मिळवले. व्यक्तिरेखेनुसार आवश्यक इतपत सुंदरता तिने खुलवली. मुख्य प्रवाहातील अभिनेत्रीने अशी ‘हटके’ व्यक्तिरेखा साकारणे त्या काळात विलक्षण धाडसी मानले गेले. पण राखीने कायमच स्वत:वर कोणत्याही मर्यादा घालून न देता रुपेरी वाटचाल केल्याचे दिसते. हेच तिचे वेगळेपण ठरले. तिच्या फॅन्सना तिचा हाच गुण कायमच आपलासा वाटला. सत्तरच्या दशकात व्यावसायिक चित्रपटात अशी थीम असणे हेच केवढे तरी विशेष होते. आणि अशा चित्रपटात राखी असावी हा योग महत्वाचा.

भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात १९८६साली पॅनोरमा विभागासाठी निवडला गेलेला अपर्णा सेन दिग्दर्शित ‘परोमा’ (मूळ बंगाली, मग हिंदीत डब) या चित्रपटातही तिने ‘धाडसी नायिका’ साकारत आपण कोणत्याही चौकटीत अडकली नाही हेच अधोरेखित केले. त्यात कोलकत्ता शहरात एका भल्या मोठ्या एकत्र कुटुंब पद्धतीत राहत असलेली परोमा (राखी) घरच्या कामात, कोशात गुंतलीय, आपल्या मुलांत रमलीय आणि अशातच तिची ओळख आपल्याच मुलाच्या फोटोग्राफर मित्राशी होते. तो सहज म्हणून परोमाचे फोटो काढतो, ते खूपच चांगले येतात, म्हणून ती त्याच्याकडे अधिकाधिक फोटो काढून घेता घेता त्यांचे संबंध सर्व मर्यादा कधी ओलांडतात हेच लक्षात येत नाही… आपण रस्ता चुकलोय असे परोमाला न वाटता आपण कामाच्या रहाटगाडग्यात आयुष्यातील आनंदाला मुक्त होतो असे तिचे मत पडते. तशी काही बोल्ड दृश्ये चित्रपटात आहेत.

अशी धाडसी व्यक्तिरेखा साकारताना आपल्या चाहत्यांना काय बरे वाटेल असाच प्रश्न असतो. पण राखीने कायमच व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात अशी अनेक आव्हाने स्वीकारली आणि आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हेच सूचित केले. पण एकदा अशी धाडसी व्यक्तिरेखा साकारल्यावर पुन्हा त्याच पठडीतील चित्रपट तेवढ्याच हिमतीने नाकारलेही. रितुपर्णा घोष दिग्दर्शित ‘शुभ महोरत’ या बंगाली चित्रपटातील अभिनयासाठी राखीला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला. तोच तिचा अभिनयासाठीचा सर्वोत्तम पुरस्कार.

ए. के. कौल दिग्दर्शित ‘२७ डाऊन’ सारख्या समांतर चित्रपटात भूमिका साकारली. त्यात तिने एम. के. रैनासोबत भूमिका साकारलीय. हा चित्रपट न्यू व्हेव अर्थात समांतर चित्रपटाच्या प्रवाहातील होता. हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पुरेसा पोहचलाही नाही. पण राखी अजिबात निराश झाली नाही. आपल्या कामाचा तिने पुरेपुर आनंद घेतला.

अनिल शर्मा दिग्दर्शित ‘श्रद्धांजली’त राखीने सूडनायिका साकारली. सत्तरच्या दशकात असे मसालेदार मनोरंजक चित्रपट यशस्वी ठरत. राखीने ॲग्री यंग वुमनची भूमिका साकारली. या चित्रपटाच्या यशाने अनिल शर्माच्या चित्रपटात राखी असणारच हे समीकरण घट्ट झाले होते. त्यांच्या ‘ऑचल’ (नायक अमोल पालेकर ), ‘दिल की बाजी’ इत्यादी चित्रपटात राखीने भूमिका साकारलीय. ‘ऑचल’मध्ये राजेश खन्ना आणि रेखा अशी आणखीन एक जोडी आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवरील कथा यात पाह्यला मिळते.

राखीने मेरे सजना, शादी के बाद, अनोखी पहचान, धुंवा, शहजादा, जोशिला, पगली, हमारे तुम्हारे, वफा अशा अनेक चित्रपटांतून भूमिका साकारलीय. काही बरे चालले, बरेचसे पडद्यावर आले तेच परतले. पण तिच्या चित्रपटांची संख्या वाढत राहिली. आणि त्या काळातील टॉप फाईव्ह अभिनेत्रीमधील आपले स्थान कायम ठेवले. आणि मग योग्य वेळी आपल्या भूमिकांचा साचा बदलला. तेही कोणतीही खळबळ न करता अथवा आपण अजून नायिका साकारु शकतो असा अट्टाहास तिने बाळगला नाही.

राखीने ‘रुपेरी माँ’ साकारलेले चित्रपटही विशेष उल्लेखनीय आहेत. अगदी खास उल्लेख करायचा तर, राम लखन (८४), जमीन आसमान (८४), साहेब (८५), डकैत (८७), फलक (८८), जीवन एक संघर्ष (९०), प्रतिकार (९१), सौगंध (९१), बाजीगर (९३) करण अर्जुन (९५), बाझीगर (९५), बॉर्डर (९७), सोल्जर (९८), बादशहा (९९), एक रिश्ता बॉण्ड ऑफ लव्ह (२००१) या चित्रपटांचा करावा लागेल.

राखीच्या एका मुहूर्तालाच बंद पडलेल्या चित्रपटाची खास आठवण सांगायला हवीच. हा चित्रपट होता ‘मजनून’ (१९७९). दिग्दर्शक कमाल अमरोही आणि निर्माता व नायक राजेश खन्ना. मेहबूब स्टुडिओतील या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा अर्धाअधिक दिवस रंगला. मेणबत्तीचा भला मोठा सेट लागला होता. जवळपास सगळी हिंदी फिल्म इंडस्ट्री यावेळी राजेश खन्नाला शुभेच्छा देण्यासाठी हजर होती (त्याचा तो एकदमच ‘पडता काळ ‘ होता) आणि अशातच राखीने मुहूर्त दृश्यात ऊर्दूमिश्रित संवादात प्रणयाचा छान अभिनय करुन लक्ष वेधून घेतले. दुर्दैवाने हा चित्रपट या मुहूर्तालाच बंद पडला.

राखीवर चित्रीत झालेली अनेक गाणी ऑल टाईम हिट आहेत. आणि त्या काळात लोकप्रिय गाणी स्टारच्या यशात एक मोठा अॅसेट असे. ‘झिलमिल सितारों का आंगन होता’ (जीवन मृत्यू) हे गाणे चित्रपटात दोनदा आहे. दोन्ही वेळचा मूड वेगळा, कुछ भी करलो तुमको मेरी होना होगा ( जोशिला), दिल की किताब कोरी है ( यार मेरा), पल पल दिल के पास तूम रहती हो, आशा ओ आशा (ब्लॅक मेल), मेघा छाये आधी रात, आज मदहोश हुआ जायेरे, (शर्मिली), जहा पे सवेरा हो बसेरा वोही है (बसेरा), आखो आँखो मे बात होने दे, दो बाते प्यार भरी (आँखो आँखो मे), मेरे सपने मे एक सुरत है (जानवर और इन्सान), मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है (लावारिस), सजना के सामने मै तो रहुंगी (पारस), दिल तो है दिल दिलका ऐतबार क्या चीज है ( मुकद्दर का सिकंदर ), मै तसवीर उतारता हू (हीरा पन्ना), यह कश्मिर है (बेमिसाल), मेरे दो अनमोल रतन (करण अर्जुन), अपने प्यार के सपने सच हुऐ ( बरसात की रात) वगैरे. अशा लोकप्रिय गाण्यांमुळे राखी पुढील पिढीला माहित झाली तरी ‘राजी’ची दिग्दर्शिका मेघना गुलजारची आई म्हणजे राखी अशी आजच्या पिढीला तिची ओळख आहे.

राखी गुलजारची वाटचाल ही अशी, स्वतंत्र बाण्याची आणि आपला, वेगळा ठसा उमटवणारी. गुलजार यांच्यापासून वेगळी राहू लागली पण त्यांनी घटस्फोट घेतला नाही. भलेही गॉसिप्स मॅगझिनमधून ‘काय वाटेल ते’ लिहिले गेले. तसे तर होणारच. गुलजार वांद्रे येथील पाली हिलवरील बोस्कीयाना या बंगल्यात राहत असताना राखी खार, सांताक्रुझच्या मुक्तांगणमध्ये राहू लागली. बोस्कीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते भेटत. आणि त्याचा ते भरपूर आनंद घेत. कालांतराने बोस्की मोठी झाली, तिने ( अर्थात मेघना गुलजार) चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकले.

आपला पहिलाच चित्रपट ‘फिलहाल’च्या ऑडिओ रिलीजचा इव्हेन्टस आजही स्पष्टपणे आठवतोय. अंधेरीतील द क्लब येथे या सोहळ्यास गुलजार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि सोहळा सुरु होताच राखीचे आगमन झाले, ती चौथ्या रांगेत बसली असतानाच गुलजार खाली उतरले, बोस्कीनेही पुढाकार घेतला आणि राखीला पहिल्या रांगेत तिने बसायचा आग्रह धरला. अतिशय भावपूर्ण असा तो क्षण होता. आजही जसाच्या तसाच आठवतोय. एका मराठी वृत्तपत्राने ही पहिल्या पानाची बातमी केली. त्यामुळे खूप दिवसांनी राखी वाचकांसमोर आली. तेव्हा तिच्या चाहत्यांनाही विशेष आनंद झाला असेल. अशा या प्रवासात राखीने मुंबईपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. नवीन आयुष्य अनुभवायची संधी मिळत गेली. चित्रपटाच्या जगापासून खूपखूप दूर राहण्याचा अनुभव काही वेगळाच… राखीचा प्रवास हा असा अनेक वळणे घेत घेत सुरु आहे. आता तर तिने आपले केसदेखील बरेच कमी केले आहेत. अगदी काही वर्षांपूर्वी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तिचे हे वय आणि अनुभवपरत्वे बदललेले रुप दिसले.

राखीला भारत सरकारच्यावतीने २००३ साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे हा तिचा यथोचित सन्मान ठरला. तेवढे आणि तसे तिचे हिंदी चित्रपटसृष्टीसाठी कॉन्ट्रीब्यूशन आहे. तिच्या यशस्वी कारकिर्दीवरचा हा एक फोकस अनेक वळणावळणाचा प्रवास आणि आव्हानातून काढलेला यशस्वी मार्ग म्हणजे राखी गुलजारची हिंदी चित्रपटसृष्टीतील पन्नाशीपार वाटचाल!

-दिलीप ठाकूर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..