शतावरी ह्या वनस्पती बाबत आपल्या पैकी बऱ्याच जणांना माहीत असेल.आपण सर्वांना शतावरी कल्प तर माहितच असेल जो बाळंतीणीला हमखास दुधातून दिला जातो.चला तर आज आपण ह्या शतावरीची थोडी जास्त ओळख करून घेऊ.
शतावरीचे काटेरी झुपकेदार वेल असतो.ह्याच्या फांद्यावर उभ्या रेषा असतात.काण्ड त्रिकोण,स्निग्ध असते.ह्याचे काटे ०.५-१ सेंमी लांब व खालच्या बाजुस वळलेले काहीसे बाकदार असतात.शतावरीचे काण्ड हे पानां सारखे भासते.२-६ ह्या संख्येत गुच्छात उगवते.१.२५-२-५ सेंमी लांब पातळ व विळ्या प्रमाणे भासते.फुले मंजिरी स्वरूपात उगवतात जी २.५-५ सेंमी लांब एकेरी किंवा गुच्छ रूपात असतात हि सुगंधी व पांढरी किंवा गुलाबी रंगाची असतात.फळ वाटाण्याच्या आकाराचे १-२ बीज युक्त असते.मुळ हे मुल स्तंभापासून जाड लांबट गोल व दोन्हीकडे निमुळती व पांढरी अशी मुळे फुटतात.
शतावरीचे उपयुक्तांग आहे मुळ.ह्याची चव गोड,कडू असून हि थंड गुणाची व जड,स्निग्ध व मृदू असते.हि वातपित्त नाशक व कफ पोषक आहे पण ओली असताना मात्र कफकर असते.
चला आता आपण हिचे औषधी उपयोग जाणून घेऊ:
१)वातनाशक व बल्य असल्याने शतावरी सिद्ध तेल अभ्यंगासाठी वापरतात.
२)सरक्त मल प्रवृत्तीमध्ये शतावरी सिद्ध घृत चांगले कार्य करते.
३)बाळंतीणीस चांगले व भरपूर स्तन्य उत्पत्ती साठी शतावरी सिद्ध दुध देतात.
४)अधोग रक्तपित्तामध्ये शतावरीचा काढा अथवा स्वरस वापरतात.
५)शतावरी शुक्रधातूची वाढ करते तसेच ती गर्भाशय पोषक देखील आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply