चिंपाझींची संशोधक – बेडर मैत्रीण
जेन गुडाल (Jane Goodall) या लंडनवासी तरुणीने आफ्रिकेच्या जंगलात जाऊन तेथील चिंपाझी माकडांचे दीर्घकाळ जवळून निरीक्षण केले. काही चिंपाझींशी तिने मैत्री केली. त्यांची बारशी करून त्यांना तिने नावे ठेवली. त्यांच्या जीवनाचा शास्त्रीय पद्धतीने त्यांच्या सहवासात राहून तिने अभ्यास केला. आपल्या निरीक्षणांनी मानववंशशास्त्रात कायमस्वरुपाची मोलाची भर घातली. योगशाळेत वा वाचनालयात बसून चिंपाझींविषयी अंदाजात्मक पुस्तकी निरीक्षण लिहिणाऱ्या मानववंशशास्त्रज्ञांना आपली चिंपाझीं विषयीची निरीक्षणे आणि व्याख्या बदलण्यास जेन गुडालचा चिंपाझींचा अभ्यास कारणीभूत ठरला.
आफ्रिकेच्या जंगलात जाऊन चिंपांझींचा सहवास मिळविणे, त्यांच्याशी मैत्री करणे, हा अत्यंत धाडसी प्रयोग होता. जिवावर बेतणाऱ्या अनेक प्रसंगांना जेन गुडालला बेडरपणे तोंड द्यावे लागले होते. तसा म्हटला तर हा प्रयोग आत्मघातकीच होता. म्हणूनच जेन गुडालचे अनुभव हे अत्यंत लोकविलक्षण आणि आत्मघातकीच वाटतात. चित्तथरारक वाटतात. एखाद्या कादंबरीची वा चित्रपटकथेची नायिका असावी तशी जेन गुडाल वाटते. तिची जीवनकहाणी वास्तविक वाटत नाही. परंतु ती वास्तविकच आहे, हेही सत्यच आहे!
जेन गुडाल ही जेव्हा आठ वर्षे वयाची होती, तेव्हा तिने डॉ. डुलिटल यांच्या कथा ऐकल्या होत्या. त्या कथा तिला प्रेरक वाटल्या. डॉ. डुलिटल यांच्या कथांमुळेच आफ्रिकेच्या जंगलात जाऊन तेथील प्राण्यांविषयी लेखन करण्याची स्वप्ने जेन गुडालला पडली होती.
आफ्रिकेच्या जंगलात प्रवास करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी जेन गुडालने लंडनच्या हॉटेलात वेट्रेस म्हणून केलेल्या नोकरीच्या पगारातून नियमितपणे काही पैसे राखून ठेवले. पुरेशी रक्कम जमली असे लक्षात आल्यावर आफ्रिकेतील केनिया कॅसल येथे ती जहाजप्रवास करून गेली. हा प्रवास जेन करणार आहे हे कळल्यावर लंडनमधील हॉटेलातील तिच्या परिचितांनी तिला वेड्यातच काढलेले होते. लंडन सोडून एखाद्याने आफ्रिकेत का जावे हे कोडे कुणाला उलगडणारे नव्हते. तसे करणे लोकांच्या दृष्टीने यत्किंचितही शहाणपणाचे नव्हते. जेन करीत होती तो लोकांच्या दृष्टीने मूर्खपणाच होता!
सर्व परिचितांनी जेनला मूर्खात काढले तरी तिच्या आईचा जेनवर विलक्षण विश्वास होता. जेनला तिची आई म्हणाली, जर तू कठोर परिश्रम करीत असशील तर येणाऱ्या प्रत्येक संधीचा फायदा घे. कोणतीही संधी सोडू नकोस! तुला तुझ्या आयुष्याचा मार्ग निश्चितपणे सापडेल!
आफ्रिकेच्या भूमीवर पाय ठेवल्यावर जेनला परदेशातील संस्कृतीतील आपल्या कार्याच्या दिशेची हळुहळू चाहूल लागू लागली. तिने आपल्या कार्याच्या दृष्टीने तेथे पाय रोवण्यास प्रारंभ केला असता १९५७ मध्ये जगप्रसिद्ध पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. लुईस लिकी यांनी जेन गुडालची आपल्या कामात मदतीसाठी निवड केली होती. या संदर्भात जेननेच लिहून ठेवले आहे, डॉ. लुईसने मला सांगितले होते की, गेली दहा वर्षे जशा प्रकारच्या कुणा माणसाच्या शोधात ते होते तशा प्रकारच्या माणसांपैकीच मी एक होते.
मेकअप, बॉयफ्रेंडस आणि पायपेक्षा जिला प्राणीच महत्त्वाचे वाटतात. अशी तू एक मुलगी आहेस, असेही डॉ. लुईस मला म्हणाले होते.
शांतवृत्तीची, स्वतंत्र विचाराची आणि अगदी साध्यासुध्या राहणीमानाची आवड असलेली जेन गुडाल डॉ. लुईस यांना खरोखरच आपली योग्य मदतनीस म्हणून खूप आवडली होती.
चिंपाझींसाठी राखून ठेवलेल्या गोंबे स्ट्रीम भागात चिंपाझींचा अभ्यास करण्यासाठी सतत सहा वर्षे एका तंबूत जेन राहिली होती. तिच्या शांत स्वभावामुळे आणि साध्यासुध्या राहणीमानाच्या आवडीमुळेच ती त्या तंबूत सहा वर्षे राहू शकली होती.
विशेष म्हणजे जेनसोबत तिची आईही राहिली होती! तिची आईही विलक्षण व्यक्तिमत्वाची असावी. लंडनसारख्या जगप्रसिद्ध शहराच्या अत्यंत आधुनिक वातावरणाचा त्याग करून आणि सर्व प्रकारच्या सुखसोयी दूर ठेवून आफ्रिकेच्या जंगलातील प्राण्यांच्या संगतीत आणि दूषित हवामानात जेनची आई राहिली होती. जेन ही एका चमत्कारिक जगावेगळ्या ध्येयाने पछाडलेली होती. परंतु तिच्या आईला आपल्या मुलीला साथ देत आफ्रिकेतील जंगलातील प्राणी, डास आणि कीटक तसेच प्रतिकूल हवामान व राहणी यांना तोंड देत राहण्याचे काय कारण होते?
प्राणावर बेतणारी संकटे आपणहून झेलण्याचा वेडा अट्टाहास करून चिंपाझींसारख्या माकडांचा अभ्यास करण्यासाठी तंबूत राहणाऱ्या तरुण मुलीला सतत ६ वर्षे साथ देणारी तिची आईही जगावेगळीच होती! एरवी पाश्चात्य देशात आज १४-१५ वर्षांच्या मुलांपासून त्यांचे आईवडील दूरच राहतात. मुले वेगळीच राहतात आणि स्वतंत्र होतात, असे आपण आज पाहत आहोत. असे असताना आपल्या तरुण मुलीच्या अव्यवहारी आणि मूर्खपणाचे वाटणारे स्वप्न साकार करण्यात तिची आईही तिच्यासोबत फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड म्हणून राहते, हे आश्चर्यजनकच वाटते. लंडनसारख्या गजबजलेल्या शहराला रामराम ठोकून एकांतात आफ्रिकेच्या जंगलातील विजनवासात अविवाहित राहिलेल्या आपल्या तरुण मुलीला साथसंगत देत तिच्याबरोबर तंबूत राहणाऱ्या जेनच्या आईविषयी मला अतिशय आदर वाटतो. इतिहासात प्रसिद्धीच्या पडद्याआड असलेल्या, दुर्लक्षित झालेल्या अशा किती स्त्रिया असतील!
जेन आणि तिची आई जेव्हा चिंपाझींसाठी राखीव असलेल्या गोम्बे स्ट्रीम या विभागात तंबूत राहत होत्या तेव्हा प्रत्येक दिवशी मलेरिया, सर्प, कीटक आणि चोरट्या बबून जातीच्या माकडांशी त्यांना तोंड द्यावे लागत होते.
जेनचा दिनक्रमही मोठा चमत्कारिक होता. ती बऱ्याच वेळा पहाटेच तंबूबाहेर निरीक्षणासाठी जात असे. केवळ एक किटलीभर कॉफी बरोबर घेऊन ती त्यावरच संपूर्ण दिवस काढत असे. चिंपाझींचे त्यांच्या नकळत त्यांच्या जवळून निरीक्षण करणे ही साधीसोपी गोष्ट नव्हती. प्रारंभीच्या काळातील निरीक्षणाबाबत जेन गुडालने लिहिले आहे. सतत तीन तास मी अनेक चिंपांझी मुलांना दूध पाजत असताना पाहत होते. मी केवळ दमलेली नव्हते तर दाट अशा झुडपांतून रांगत जाताना ओलीचिंब झालेली होते.
जेनला चिंपाझींकडून अनेकदा बेदम मारही बसला होता. एका चिंपाझी नराने तर जेनवर तीन वेळा हल्ला केला होता. निमुळत्या आणि घसरत्या अशा भीतिदायक कड्यावर ती त्या वेळी उभी होती. या संदर्भात जेन लिहिते, आम्हाला का ते कळले नाही; परंतु त्याला खरोखरच माझ्यावरच हल्ला करावयाचा होता. त्या चिंपांझीने जेव्हा शेवटचा म्हणून हल्ला जेनवर केला तेव्हा जेनचे डोके खडकावर आपटून रक्तबंबाळ झाले होते. जेन खाली कोसळून घसरून पडली. या प्रसंगाचे वर्णन करताना जेन म्हणते, छोट्या छोट्या झुडपांनीच मृत्यूच्या खाईत होणारा माझा कडेलोट थोपविला होता. जेन गुडाल पुढे लिहिते, इतर चिंपाझींनी माझे सांडलेले रक्त हुंगले, ते गोंधलेले दिसले आणि हूss हूऽऽईंग असा आवाज ते काढू लागले. स्वतः ला झटकून, साफसूप करून संशोधन केंद्रात परण्याशिवाय दुसरे काही मी त्यावेळी करू शकत नव्हते.
आफ्रिकेच्या टांगानिका (Tanganyika) तलावाच्या काठावर एके दिवशी दुपारच्या प्रहरी चिंपाझींचे निरीक्षण करताना जेनच्या अत्यंत आवडत्या चिंपाझींपैकी एक असलेल्या डेव्हीड ग्रेबिअर्ड या चिंपाझींला गवताच्या देठाने मातीचे वारूळ खणून त्यातून त्याला खाण्यासाठी किडे काढताना तिने पाहिले. तसेच जेनने चिंपाझींना झाडाच्या फांद्या तोडून त्यांची हत्यारे करताना पाहिले. जेनचे हे निरीक्षण आणि हा अनुभव ऐतिहासिक ठरला. कारण तोपर्यंत माणूस आणि चिंपाझींमधील फरक म्हणजे माणूस हत्यारे बनवू शकतात आणि चिंपाझी हत्यारे बनवू शकत नाहीत, असे प्राणिशास्त्रज्ञांकडून सांगितले जात असे. परंतु वीस वर्षांच्या जेनसारख्या आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने महाविद्यालयीन पदवी न घेतलेल्या तरुणीने प्राणीशास्त्रज्ञांचा सिद्धांत खोडून टाकला होता. चिंपाझींना माणसांप्रमाणे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते, असे गृहीत धरून जेनने तिच्या प्राणिशास्त्रांच्या क्षेत्रात क्रांतीच केली. ज्या काळात इतर प्राणी शास्त्रज्ञ प्राण्यांच्या शरीराची चिरफाड करून त्यांचा अभ्यास प्रयोगशाळेत करीत होते त्याच काळात जेन प्राण्यांना इजा न करता नैसर्गिक वातावरणात त्यांचे अवलोकन करून त्यांचा अभ्यास करीत होती. माणसांप्रमाणेच स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेल्या चिंपाझींमध्ये माणसांप्रमाणेच नातेसंबंध असतात, असे जेनने सिद्ध करून दाखविले. म्हणूनच तिने चिंपाझींना नावे देण्याचे धाडसही केले होते.
जेन गुडालचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच विशाल होता. सकारात्मक होता. मनुष्यास लाभलेले आयुष्य ही परमेश्वरी देणगी असून तिचा वापर जग अधिक सुंदर करण्यासाठी करायला हवा, असे जेनचे मत होते. म्हणूनच ती म्हणते, आपल्या आयुष्याची आपल्याला मिळालेली देणगी आपण कशी वापरायची हे आपणच ठरवायचे असते. आजूबाजूचे विश्व सुंदर करण्यासाठी आपण आपले आयुष्य खर्च करणार, का बेफिकीरपणे जगणार, हे आपणच ठरवतो. कसे जगायचे किंवा जगताना कोणत्या दृष्टिकोनाची निवड करायची हे आपणच ठरवायचे असते, हेच जेन गुडालला सांगायचे होते. हे तिने नुसते तात्त्विकदृष्ट्या सांगितले नाही, तर जग सुंदर करण्यासाठी वैयक्तिक सुखांचा त्याग करून आपले ऐन तारुण्य चिंपांझींविषयीचा अभ्यास करण्यात खर्च केले. आधी केले मग सांगितले, असे तिच्या जीवनाचे सार आहे. म्हणूनच जेन गुडालचे जीवन जगावेगळे, प्रेरक आणि चिरंजीव ठरले.
मी जेव्हा जेव्हा एका कुणा जगावेगळ्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करीत असतो, तेव्हा मला तशाच दुसऱ्या व्यक्तिमत्वाची आठवण सतत येत राहते. झाशीच्या राणीचा विचार करताना सुभाषचंद्र बोस यांच्या खांद्याला खांदा लावून आझाद हिंद फौजेत नेतृत्व करणारी कॅप्टन लक्ष्मी मला आठवते. कुटुंबनियोजनाची उद्गाती मागरिट हिच्या कार्याचा व जीवनाचा आढावा घेताना मला भारतातील र.धों. कर्वेंचे जीवनकार्य सतत आठवत राहते. त्याचप्रमाणे चिंपांझींचा अभ्यास करणाऱ्या जेन गुडालच्या जीवनकार्याचा आलेख पाहताना मला अममेरिकन पुरातत्त्वसंशोधक डायन फॉसी हिने गोरिला जातीच्या माकडांच्या संदर्भात केलेले कार्य आणि दिलेले आपल्या प्राणांचे बलिदान आठवते. डायन फॉसीवरील गोरिलाज इन दि फिस्ट हा पाहिलेला चित्रपट आठवत राहतो.
डायन फॉसीसारखी अमेरिकन पुरातत्त्व संशोधक जर जन्माला आली नसती तर कदाचित पर्वतराजीतील गोरिला जातीच्या माकडांचा निर्वंशच झाला असता. एकही गोरिला जातीचे माकड आज जिवंत राहिलेले कुणास दिसले नसते. जेन गुडाल प्रमाणेच डायन फॉसीने आफ्रिकेत प्रवास करून गोरिलांचा अभ्यास करून आपल्या संशोधनक्षेत्रात क्रांतीच केली होती.
खांडा पर्वतराजी ही डायन फॉसीच्या अभ्यासविषयाची भूमी होती. अत्यंत भयानक स्वरूपाचे गोरिला तेथे वस्ती करून होते. विरूंगा ज्वालामुखी असलेल्या अत्यंत उंचावरच्या धुक्याने वेढलेली ती जागा होती. तेथे आजही गोरिलांचे अस्तित्व आहे, असे ते स्थळ डायन फॉसीने गोरिलांच्या निरीक्षणासाठी निवडले होते.
गोरिलांची शिकार करून त्यांना मारणाऱ्या धंदेवाईक टोळ्यांविरुद्ध डायन फॉसीने जेव्हा लढा उभारला, तेव्हा तिचे कार्य अतिशय धोकादायक ठरले होते. गोरिलांना पकडण्यासाठी त्यांच्या मारेकरी टोळ्यांनी लावलेल्या सापळ्यांचा नाश करण्यासाठी, गोरिलांच्या आरोग्यासाठी आणि सापळ्यात सापडेलल्या प्राण्यांची सुटका करण्यासाठी डायन फॉसीने संघटना बांधल्या होत्या. त्यामुळेच डायनने असंख्य शतू निर्माण करून आत्मघाताचीच जणू मुहूर्तमेढ बांधली होती. स्वतःला सुळावर चढविण्याचीच तयारी केली होती. १९८५ मध्ये तिच्या तंबूजवळच तिची हत्या करण्यात आली. तिची हत्या नेमकी कुणी केली ही गोष्ट अज्ञातच राहिली. डायन फॉसी मात्र आपल्या जीवनध्येयासाठी अक्षरशः प्राण जाईपर्यंत निष्ठेने लढत राहिली.
डायन फॉसी काय किंवा जेन गुडाल काय, यांना बंडखोरी करण्यासाठी, प्रखर ध्येयवादावर अविचल निष्ठेने प्राणाचीही पर्वा न करता सर्व भौतिक सुखांना दूर ठेवून निःस्वार्थी वृत्तीने एकाकीपणे लढण्याची शक्ती कोण देतो? कोणती पुस्तके, कोणते संस्कार, कोणत्या प्रेरणा, कोणते गुरु, कोणत्या पदव्या त्यांना आयुष्य ध्येयनिष्ठेसाठी झोकून देण्यास उपयुक्त ठरतात? केवळ स्वयंप्रेरणाच डायन फॉसी किंवा जेन गुडालसारख्यांची आयुष्ये उजळून टाकतात!
आपल्यासारख्यांना पडणाऱ्या या चिरंतन प्रश्नांची उत्तरे काहीही असोत. आपली स्वतःची आयुष्ये समाजाच्या उत्कर्षासाठी उजळून जाणाऱ्या डायन किंवा जेनसारख्या अलौकिक जगावेगळ्या विभूतींच्या प्रकाशमय जीवनाच्या एखाद्या किरणाचाही आधार आपल्याला आपल्या स्वार्थी काळोखी जीवनात फार मोठा वाटत राहतो!
-– प्रा. अशोक चिटणीस
(व्यास क्रिएशन्स् च्या ‘जगावेगळ्या’ ह्या पुस्तकातील प्रा. अशोक चिटणीस ह्यांचा हा लेख)
Leave a Reply