दिवाळी अंकांचे प्रयोजन काय असते- करमणूक, मनोरंजन, सणाचे “साजरीकरण”, वाचन संस्कृतीचे उन्नयन की आणखी काही ?
बाबा आमटे या दैदिप्यमान सूर्यप्रतापी व्यक्तीची ही नात ! आजोबांनी कुष्ठरोग्यांना जीवन पुनर्बहाल केलं आणि नातीने मागील वर्षी स्वतःचे जीवन संपविले. काही काळ “यूथ आयकॉन” शीतलबद्दल समाज माध्यमांवर फैरी झडल्या. नंतर “पब्लिक मेमरी ” शॉर्ट नांवाखाली सारं शांत ! ही निखाऱ्यावर जमलेली काजळी तिच्या पतीने (गौतम करजगी यांनी) “अक्षर ” या दिवाळी अंकात वरील शीर्षकाचा लेख लिहून झाडली आहे. विसरलेली खपली संयतपणे उचकटून काढली आहे. शेवटी हे नातं असं आहे की लेखन अस्सल (ऑथेन्टिक) वाटतं.
काल हा लेख वाचला. अंधारून आलं- तिची बाजू ,तिचे मनोगत तिने मागील वर्षी चित्र काढून, व्हिडीओ समाजमाध्यमांवर टाकून मांडले होते.
आता तिच्या पतीने आणखी काही बाबी कागदावर आणल्या आहेत. सगळं गूढ अधिक गहिरं झालंय. महाराष्ट्राचं आराध्य कुटुंब शंकेच्या मोहोळात सापडलंय पण खरं खोटं करू शकणारे गप्प आहेत. या लेखात बरंच लपलेलं, अंधारलेलं गुह्य कागदावर आलंय. व्यवस्था,यंत्रणा,देणग्या आणि आनंदवनाचे दैनंदिन व्यवस्थापन “स्कॅनर “खाली आलंय. कौटुंबिक धागेदोरे संस्थांना बांधून ठेवू शकतात पण बंद मनांच्या आडचे कढ केव्हातरी हुंदके बनून बाहेर येतात तेव्हा डोळ्यांना आवरता येत नाहीत.
अंबानी बंधूंच्या कौटुंबिक वादात काही ” जाणते “, काही ख्यातकीर्त मध्यस्थीला सरसावले होते, हे अजून लक्षात आहे. इथे कोणालाच कां तसं वाटलं नाही? किमान कुटुंब मित्र “नाना पाटेकरांना ?” कां त्यांचेही प्रयत्न फोल ठरलेत ?
आनंदवनात बाबांच्या समाधी शेजारी शीतल आमटे-करजगी अशी स्मृतीशिळा लिहिलेल्या शीतलच्या समाधीचे चित्र दिसते तेव्हा दिवाळी अंकांचे ” सांस्कृतिक संचित ” हे वर्णन वाकुल्या दाखविते. घरोघरी फक्त मातीचे पाय !
चंद्रावर डाग असतात हे शाळेत बाईंनी शिकवले होते, पण सूर्यावरही?
मग आता “प्रकाश “शोधायचा कोठे?
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply