कवी – श्री. सारंग शहाजीराव चव्हाण.
कोल्हापूर.
(सदरची कविता कोणावर टीकाटिप्पणीसाठी नसून शेतकऱ्यांच्याबद्दल
वाटणाऱ्या दुजाभावाबद्दल आहे याची कृपया नोंद घ्यावी)
आयपीएल संपले,
फटाके फुटले जल्लोष झाला,
खेळणाऱ्याना बक्कळ पैसा मिळाला,
आणखी बॅंकबॅलन्स वाढवायला,
थोड्याच दिवसांत पुन्हा वर्ल्डकप आला,
जगाचा पोशिंदा मात्र वावरात फुकटात मेला.
डीजे ब्राव्हो नाचून गेला,
पोलार्ड तात्या खिसा भरून गेला,
आयुष्यभर बाप नाचला वावरातल्या ढेकळामधी,
तरीबी खिसा फाटकाच राहिला,
जगाचा पोशिंदा मात्र वावरात फुकटात मेला.
कोणी अमुक कोटीत गेला,
कोणी तमुक कोटीत गेला,
या आयपीएलच्या नादात,
पोरगा महिनाभर वावरात नाही गेला,
जगाचा पोशिंदा मात्र वावरात फुकटात मेला.
खेळाच्या या कुंभमेळ्यात,
करोडोंचा सट्टा लागला,
खेळणाऱ्यासह सट्टेबाजांच्या हाताला,
नोटांचा गट्टा लागला,
शेतकरी खेळला वावर पेरून जुगार,
त्याला कर्जबाजारीपणाचा बट्टा लागला,
बट्टा पुसण्यासाठी त्यान फास जवळ केला,
जगाचा पोशिंदा मात्र वावरात फुकटात मेला.
शेतकरी प्रीमियर लीग सुद्धा,
कधीतरी खेळवुन बघा,
निकालाची खात्री नसताना,
हजारो रुपये मातीत घालून बघा,
शेतकरी जवानीतच मातीत मिसळून गेला,
जगाचा पोशिंदा मात्र वावरात फुकटात मेला.
सट्टा इथही लावता येइल पावसाच्या पडण्यावर,
टीआरपीही वाढेल चॅनलचा,
बिनमौत शेतकरी मेल्यावर,
पण आजवर इकडे कोणीच नाही फिरकला,
जगाचा पोशिंदा मात्र वावरात फुकटात मेला.
पस्तीस वर्षानंतर खेळाडू निवृत्त झाला,
जातानाही पैशाचा पाऊस त्याच्यावर पडला,
ऐंशी वर्षाचा तरुण शेतकरी पावसाविना वावरात रडला,
सरकारने पण त्याच्या जीवावरचा खेळ नाही पाहिला,
जगाचा पोशिंदा मात्र वावरात फुकटात मेला,
जगाचा पोशिंदा मात्र वावरात फुकटात मेला.
— श्री. सारंग शहाजीराव चव्हाण
कोल्हापूर. ९९७५२८८८३५.
फोटो सौजन्य: गूगलबाबा.
Leave a Reply