एक पती पत्नी कायद्याने विभक्त झाले होते. आता त्यांचे रहाते घर त्यांच्या कामाचे नव्हते. ती तिच्या आई बाबांकडे निघून गेली. याला ते घर विकून दुसरे घर घ्यायचे होते. त्या घरातल्या आठवणी त्याला पुसून टाकायच्या होत्या.
त्याने आपले घर विकायला काढले. ब्रोकरला गिन्हाईक बघायला सांगितले. मुलीच्या वडीलांनीच ब्रोकरला सांगून ते घर विकत घेतले. जावयाच्या हातात एक किल्ली देत ते म्हणाले “मी माझ्या लेकीला ओळखतो तसा तुम्हालाही ओळखतो. तुम्ही भावनेच्या भरात बऱ्याच गोष्टी केल्यात. माझ्या लेकीशी लग्नही असेच भावनेच्या भरात केलेत आणि पुन्हा तसेच भावनेच्या भरात तुम्ही तिच्यापासून विभक्तही झालात. आता हे घरही असेच पुढचा मागचा विचार न करता भावनेच्या भरात तुम्ही विकू पहात होतात. तुम्ही स्वतःसाठी दुसरे घर अवश्य घ्या. परंतु पुन्हा तुम्हा दोघांना एकत्र यावेसे वाटले तर रहायला घरच नाही असे व्हायला नको. म्हणून मी हे घर म्हणजे रिकामी वास्तू तुमच्या हवाली करतो आहे. कधी वाटलं तर येथे येऊन बसा. भरल्या घरापेक्षा रिकामं घर जास्त बोलतं आपल्याशी. भावनेपेक्षा आपले विचार अधिक ठाम असतात. तुमच्या विचारांवर तुम्ही जर ठाम झालात तर घेतलेल्या निर्णयाचा तुम्हाला पश्चात्ताप होणार नाही. तुमचा निर्णय ठाम झाला की माझी किल्ली मला परत करा. नाहीतर माझ्या मुलीला येऊन परत घेऊन जा.”
तो खरोखरच दुपारच्या वेळात या रिकाम्या घरात येऊ लागला. सूर्याची कलंडणारी उन्हे आपल्या घरात ऐसपैस पसरतात याची त्याला कल्पनाच नव्हती. मावळतीचा वारा अख्या घराचा ताबा घेतो हे त्याने नव्याने अनुभवले. एका भिंतीवर कालनिर्णयचे कॅलेंडर चुकून राहिले होते. भिंतीवर हवेमुळे ते फडफडत होते.
त्याने जवळ जाऊन बारकाईने ते पाहिले. तिने त्यावर कितीतरी नोंदी करुन ठेवल्या होत्या. बिले भरण्याची तारीख, दुधाचा हिशोब, कामवालीचे खाडे, पेस्टकंट्रोलची तारीख, सिलेंडर संपल्याची तारीख, वाणी सामान आणल्याची तारीख, इस्त्रीच्या कपड्यांचा हिशोब, तो कशातच सहभागी नव्हता. त्याला जाणवलं सारं काही फक्त तिचचं होतं. तिचा एकटीचा डाव ती खेळत राहिली. आपण मात्र फक्त तिच्यात दोष काढत राहिलो, तक्रार करत राहिलो.
तो विचार करत बेडरुममध्ये आला. त्याने खिडकी उघडली. तिने हौसेने लावलेली शेवंती अजून तिथेच होती. वाळून वाळून झुरायला लागलेली. तिला भिजवायला तो आतूर झाला. पाणी घालायला भांडं नव्हतं. मग त्याने कुंडीच सिंकपाशी नेली. शेवंतीवर यथेच्छ पाणी शिंपडलं. तहानलेली शेवंती गटागटा पाणी प्यायली आणि तृप्त मात्र तो झाला.
तेवढ्यात लॅच की ने दार उघडल्याचा आवाज आला. ती आली होती. त्या शेवंतीसारखीच तिची अवस्था होती. हिच्या आयुष्यातलं आपलं स्थान आपल्या लक्षात कसं आलं नाही याचा विचार तो करायला लागला. ती कितीही भांडली, जिद्दीला पेटली आणि टोकाला पोहोचली तरी हा स्वभाव आपल्याला नवीन तर नव्हता! लग्नाआधीपासून मला हिचा हा स्वभाव माहित होता. मग आपण असा टोकाचा निर्णय कसा घेतला?
दोघांची नजरा नजर झाली. ती म्हणाली “मी शेवंती न्यायलाच आले होते.” तो म्हणाला “ती अगदी सुकली होती, मी तिला आत्ताच पाणी दिले आहे. तिचं निथळणं संपेपर्यंत थांब ना. ”
आणि ती थांबली. अगदी कायमची. एकमेकांचा दोष स्विकारुन प्रेम करण्यातच नात्याची सुंदरता आहे. मुलीच्या वडीलांना जीवनातले हे सत्य होते आणि म्हणूनच त्या दोघांचे पुनर्मिलन झाले.
— नीला सत्यनारायण
अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.
Leave a Reply