चिणक्या,गोल्या,रवी आन चेंड्या लहानपणापसुनच जिगरी दोस्तं व्हते.एकाच वयाचे अन एकाच शाळतं शिकल्यान तेह्यचा दोस्ताना आंजुकच घट्ट झाला व्हता.ते चौघबी लयच ईपितर व्हते.काम धंदा त काय करायचे नाही पण घरच्यायच्या जिवावरं मस्तपैकी जगुन दिसभर गावात काड्या करत हूंदडायचे.नको तिथं नाक खुपसण्याच्या तेह्यच्या सलयीधं सगळं गाव परेशान व्हतं.एकदिवस आसचं चौघं दोस्त पारावर बसले व्हते.लय दिवसाचं तेह्यच्या जिवनात एंजायमेंटच नवती.गावातबी तेह्यच्या कुरापती चालयण गेलत्या.चौघंबी शांत बसले व्हते.तेव्हड्यात गोल्या मनला,“व्हयं रं चंड्या आपण लय दिसाचं मटनबी खाल्ल नाही आन नरडंबी वल्ल केलं नाही.तव्हा मी काय मंतो आज सुकीरवार हे तं आपण पार्टी करायची का…?”
पार्टीच नाव ऐकताच रवी,चंड्या आन चिणक्याच्या तोंडालं पाणी सुटलं.तेह्यलंबी आसच कायतरी करावं आसं वाटत व्हतं.
“हो पण पार्टी कुठं आण कशी करायची?” रवी मनला.
तसं चंड्या मनला,“आपण रवीच्या खारीत पार्टी करू की.कालच आंधाचा शिरप्या मनत व्हता की त्यानं त्यानं आत्ताच भट्टी लावलीय आन पाच सहा बिसलेर्या भरून पह्यल्या धारचा मालं तयार हाये मनुन…”
तसं गोल्या मनला ते व्हयील पण बकर्याचं कायं.खाटकाच्या दुकानाऊन मटन आणल्यापक्शा आपण एखांद लहानस बकरच आणु.पोकभर खायालंबी व्हयील आन सस्तबी पडल.उरलेल्या पैशात नरडबी वल्ल व्हयील.काय मंता.?”
तसं रवी मनाला मह्याकडं बकर हाये पण लयच मोठं आन जरगट हे.त्यापक्षा आपल्या चिणकु दाजीचं बकर लहान हे.आपण तेच आणायच का?”
रविचंबोलनं ऐकताच चिनक्या उसळुन मनला ,“मह्याघरी बकरं हाये खरं पण मथारीचा लय जीव हे त्याच्यावरं.ईकायच नाही मंते.”
चिणक्याच बोलन मंधातच ताडत चंड्या मनला ,“मथारीलं काय ईचारायच.घरचा कारभारी तं तु हे नं.आसं बायायच्या सल्ल्यानं कारभार करतु व्हयं रं”
चेंड्याच बोलन ऐकुन चिणक्याचा पुरशी आहंकार जागी झाला.त्यानं बकर द्यायचं कबुल केलं.मंग ततीन हजार रूपयात बकर्याचा सौदा करून टाकला.चंड्यानं शिरप्या आंधाकुण मव्हाची दारू आणायच कबुल केलतं.तं रविन आन गोल्यानं भांडेकुंडे आन मसाला आणायच कबुल केलं.चिणक्यानं मोठेपणाचा आव आनत बकर्याचा सौदा तं केलता पण त्यालं आत्ता मथारीलं कसं पटवावं समजयनं गेलतं.
आत्ता चिनक्या,,चंड्या आन रविलं संध्याकाळच्या पार्टीचा वेध लागला व्हता. चिनक्यानं दोस्तायसंग कालच बकर्याचा सौदा केलता.चिणक्याच्या मथारीजवळ एक लहान बोकड्या व्हता.चिणक्यानं मायच्या मांघार्याच दोस्तायसंगं बोकड्याचा सौदा केलता.तीन हजार रूपयात सौदा पक्का झालता. त्यात त्याचा साडेसातशे रुपये वाटा काटुन त्यानं बाविसशे पन्नास रूपये भेटणार व्हते. मंग काय सगळे दोस्तं संद्याकाळच्या पार्टीसाठी उतावळे झालते.ठरल्याप्रमाणं संध्याकाळचं माल मसाला घेऊन सगळेजणं खारीत जमले व्हते.तेह्यनं मव्हाच्या पह्यल्या धारच्या दोन चार बिसलेल्या भरून आणल्या व्हत्या.चिणक्याच्या मथारीलं बोकड्या ईकायचा नवता.तं चिनक्या त्या बोकड्यालं ईकायच्या मांघ लागला व्हता.
संध्याकाळ झाली.सगळ्या दोस्तांनी बिसलेरीच्या बाटल्या रिकाम्या केल्या.थोड्याच वेळात मव्हाच्या पह्यल्या धारच्या मालानं अंमल दाखवायल सुरवात केलती.मंग काय चिनकु आन दोस्तायचा मेंदू गरगरू लागला.ते हूडदंग करू लागले.पार्टी चांगलीच रंगात आलती.आता पोटात भकभक आग लागली व्हती.मंग गोल्यानं चिणक्यालं मनलं कि,“ चला चिणकु दाजी टाका मटन शिजवायलं.” हे ऐकुण चिणक्याचातं चेहरा ढवळा शिपतच पडला.काय बोलावं त्यालं कायबी कळेनं गत्यालं चुप पाहुन रवी अन चंड्या चिणक्यावर आंजुकच चिडायलं लागले.चिणक्यानं आंधीच पैसे घेतल्यानं ते कानकोंडा झालता.तसं पाह्यलं तं चिणक्यानं पहाटचं मथारीलं पटवण्यासाठी खडा टाकुन पाह्यला व्हता पण मथारीनं बकरं ईकायलं साफ नकार देलता.आन वरून,“मुडद्या सगळं घर गिळलं अन आत्ता तुलं मव्ह बकर डोळ्यातं सलायलय व्हयं.चाल निंघ ईथुन आत्ता मनला तं मनला पुन्हा मनला तं मुडदाच शेकते तुव्हा.” चिणक्यानं कचरत कचरत गोल्या,रवी अन चंड्यालं घरी पाहाटं घडलेलं रामायण सांगतलं.हे ऐकुण तिघबी चवताळुन चिणक्याच्या आंगावर धाऊन गेले.गोल्यानं तं चिणक्यालं दम देऊन सांगल की,“आत्ता तं तुलं तेच बकर आणावं लागलं नायतं डबल पैसे वापस देवावं लागतील.”संगच्या दोस्तायचे तेवर पाहुन चिणक्या वरमला.त्यानं तिघायलबी शांत बसायलं सांगत एक प्लॅन समजाऊन सांगतला.चिणक्याचा प्लॅन ऐकुन बाकी तिघंबी तयार झाले.तेह्यणं उरलेली एक बाटली संपवली आन चिणक्याच्या मथारीचं बकरं चोरायच्या मोहीमेवर निंघाले.ठरलेल्या प्लॅन परमानं चिणक्या आन रवीनं आंगावर घोंगड्या पांघरून घेतल्या आन चिणक्याच्या घराकडं निंघाले.तं गोल्या अन चंड्या गावातल्या डिपुकडं फ्युज काढायलं निंघाले.घराजवळ पव्हचलकी तिनदा बॅटरीची टिकमिक करून ईशारा देयाचं तेह्यच्यात ठरलं व्हतं.ईकड चिणक्या आन रवी चिणक्याच्या घराच्या जवळ जवळ जात व्हते.चिणक्याच्या घरी एक काळं कुत्र व्हतं.चिणक्याची मथारी त्यालं बकर्यासंगच आंगणात बांधायची.त्या कुत्र्यालं घराच्या परसात आजब हालचाली जाणवु लागल्या.कायतरी ईपरीत घडायलय या भनकनं ते कुत्र केकाटु लागलं.कान टवकारू टवकारू मोठमोठ्याण भुकु लगलं.कुत्र्याचं केकाटन ऐकुन चिणक्याची माय अन बायको सावध व्हवुन घरातुन आवाज देवू लागल्या.तेवढ्यात रविनं डिपुच्या दिशेनं तिनदा बॅटरीची टिकमीक केली.तसं मागावरच आसलेल्या गोल्या आन चंड्यानं ताबडतोब लाईट बंद केली.लाईट गेल्या गेल्या चिनक्यानं पळतच जात गपकन खुट्याची शिकार सोडुन शिकारीच्या अंगावर घोंगडी टाकली आन शिकार घेऊन रानाच्या दिशेनं पळाले.चिणक्यालं त्याचे धरून शिकारीचे तीन हजार भेटले होते.तेह्यनं शिकारीचे खांडं खांडं केले.मालमसाला लावुन मस्त रस्सा भाजी बनवली.सगळ्या शिवारात भाजीचा गंध दरवळु लागला.मंग काय सगळ्या दोस्तायनं मिळुन रातभर मस्त पार्टी करत एन्जॉय केलं.पहाट पहाट चिनक्या घरी आला.रातची धुंदी आंजुकबी त्याच्या चेहर्यावर दिसत व्हती.रातचं चिनक्यानं माय आन बायकोलं काहिच सांगलं नवतं मनुन मंग ते दबकतच घरी येवु लागला.ते घरी आल्या आल्या त्याची बायको आन माय त्याच्या नावानं बोंबलू लागल्या.मायन मोठ मोठे डोळे टवकारत चिणक्याकडं पाह्यलं.तसा चिनक्या टरकलाच.चिणक्याची माय चिनक्यालं मनली,“मेल्या,मुडद्या,तुव्हा खानाखरोबा व्हवो,कुठं उलथला व्हता रातभर.आन व्हय रं रातच्याला घोंगडी घालून चोरासारखा काहून आलता आणि रातपसून आपलं कुत्र दिसयनं तू कशाला ते कुत्र घेऊन गेलता.व्हय रं मुडद्या.” जसयं चिनक्यानं मथारीचे शब्द ऐकले तसा त्यो हैरान झाला.त्यानं हैराणीनचं बकर्याच्या खुट्याकडं पाह्यलं तं ते बकरं चिणक्याकडं पाहुन बेऽऽअं..ऽऽ आसं वरडु लागलं.चिणक्यालं ते पाहुन कसकान्नुच झालं.त्याच्या मनात मळकी भरली.तो तसाच पळत पळत मोरीजवळ गेला आन भडाभडा वकाया लागला.त्याल व्हयालेल्या वकार्या पाहुन त्याच्या मायलं आन बायकोलं काहीच समजयनं गेलत.त्या बिचार्या घायबरून गेल्या.
चिनक्याच्या मायनं शेजारच्या पिंट्यालं बलवुन चिणक्याचे दोस्त रवी,गोल्या आन चंड्यालं बलवलं.ते तिघबी तिथं आले तं तेह्यलं चिणक्या पोट खड्डोस्तोर वकायलेला दिसला.काय झालं तेह्यलं कळयनं गेलं.तेव्हड्यात तेह्यनं चिणक्याच्या खुट्यावरच्या बोकड्याचा“बेऽऽ….अंऽऽ“ आसा आवाज ऐकला. आवाज ऐकताच तेह्यच्या डोस्क्यात तडखन उजेडच पडला.राती तेह्यनं बोकड्याच्या जागी कुत्र्यालं नेलं व्हतं.आन बकर मनुन कुत्र्यालच खाल्ल व्हतं.दारूच्या नशेत तेह्यलं काहीच कळालं नाही.ते पिऊन टुंग व्हते.आत्ता त्या तिघायलबी मळमळुन आलं,आन तेबी भडं भडं वकु लागले.काय व्हयालं कोणालचं काय कळणं झालतं.मंग थोड्यायेळानं सगळा खुलासा झाल्यावर चिणक्याच्या मायलं अन बायकोलं रडावं का हासावं काहीच कळयन झालतं.
सांगोवांगी ही खबर सगळ्या गावात पसरली.आत्ता सगळं गांव चिणक्या आन दोस्तायची पार्टी यावरं हासू लागलं.चिणक्या आन त्याच्या दोस्तायलं घराबाहीर निंघनं बी मुस्कील झालतं.घराबाहीर पडलं की जे ते ईचारायचं ,“काय मंग कशी झाली पार्टी”.तसं चिणक्या आन त्याच्या दोस्तायलं कसकान्नु व्हयाचं.पडलेल्या चेहर्यानं ते आपले मुकाट्यानं निंघुन जायाचे.
©गोडाती बबनराव काळे,हाताळा,हिंगोली.
9405807079
Leave a Reply