नवीन लेखन...

शिक्का

” त्याला पोलिसांनी उचलला” ,
“त्याच्या मुलाला पोलिस केसमध्ये अटक झाली “,
” आमचा शेजाऱ्याच्या मुलाला काल पोलिस घेऊन गेले , वाटलं नव्हतं हो त्यातला असेल ” ,
” हा तोच ना हो ? याचा भाऊ अटक होता ? “,
” माझ्या मुलाच्या एका मित्राला कालरात्री पोलिस घरातून घेऊन गेले, आत्ता कुठे लागला होता हो नोकरीला! माझ्या मुलाला सांगितलंय , याद राख पुन्हा त्याच्याबरोबर दिसलास तर “
या किंवा अशा प्रतिक्रिया असतात एखाद्या तरुण मुलाला अटक झाल्यावर त्याच्या कुटुंबाच्या परिचीतांच्या.
पोलिस ही संस्थाच भयंकर असून तिच्यापासून दोन हात लांब राहिलेले बरे अशी सर्वसाधारण नागरिकांची भावना आपल्या समाजात पहिल्यापासून आहे.
पोलिसदल कायद्याने रीतसर स्थापन होण्या पूर्वी म्हणजे १८६१ पूर्वी संस्थानिक आणि राजे रजवाड्यांच्या काळात त्यांनी नेमलेले कोतवाल पोलिसाचे काम बजावत असत. कोतवालांचे इमान हे निव्वळ त्यांच्या स्वामींशी . न्यायी राजांचे काही मोजके अपवाद सोडले तर बाकी सगळ्यांचा लहरी कारभार. त्यांच्या लहरी सांभाळणे हेच त्या कोतवालांचे आणि त्यांच्या दलाचे मुख्य काम . त्या नंतरच्या शतकात ब्रिटिश पोलिस अधिकारी आणि त्यांचे भारतीय सहकारी यांनी स्वातंत्र्य चळवळ दडपण्यासाठी केलेल्या अनन्वित अत्याचारांनी, पोलिस या संस्थेबद्दल प्रजेच्या मनात आणखीनच भय निर्माण केले हा इतिहास आहे.
समाज शांतता राखण्याची जबाबदारी पोलिस इमाने इतबारे पार पाडत असले तरीही , सर्वसाधारण समाज आणि पोलिस यांच्यामधे आजतागायत एक अदृश्य दरी आहे ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. त्यामुळे एखाद्याला पोलिसांनी अटक केली की त्याचे ” वाटोळे झाले ” या भावनेबरोबरच अटकेच्या घटनेला , संबंधित व्यक्तीच्या जवळचे सोडले तर बाकीच्यांच्या चर्चेला खमंगपणा येतो. त्या व्यक्तीला सहानुभूती देणे बाजूला राहते आणि ” तुझ्या आधी मला तो माहिती आहे ” छापाची कुजबुज वेग घेते.
एखाद्याला पोलीसांनी अटक केली की तो सुटेपर्यंत , त्याच्या घरावर एक विचित्र सावट पसरलेलं असतं. विशेषतः अटक झालेली व्यक्ती हातातोंडाशी आलेला तरुण मुलगा असेल तर परिस्थिती फारच दयनीय असते .
शेजाऱ्यांच्या भांडणात वडिलांची बाजू घेऊन पुढे झालेला एखादा कॉलेज तरुण,चाळीतील नळावर वडिलांना शिवीगाळ करणाऱ्याच्या अंगावर धाऊन जातो.थोडी झटापट होते . दोघेही खाली पडतात . शेजाऱ्याला बालदीची कड लागते . थोडे रक्त येते आणि चांगल्या शिकत्या तरुणाच्या कुटुंबावर सूड घेण्यासाठी , जखमी व्यक्तीचे कुटुंब त्या लहानशा जखमेचा पुरेपूर उपयोग करून घेते. जखमी इसम , त्या तरुणाने बालदी डोक्यात मारल्याचा कांगावा करत पोलिस ठाण्यात धाव घेतो. पोलिस नियमाप्रमाणे जखमीला सरकारी इस्पितळात पाठवतात . डॉक्टरने दिलेले ” Alleged assault with metal object ( bucket ) ” हे वैद्यकीय प्रमाणपत्र पोलिसांना त्या तरुण मुलाविरुद्ध दखलपात्र फौजदारी गुन्हा दाखल करण्यास भाग पाडते. गुन्हा दाखल होतो . मुलाला अटक होते. त्यानंतर अटकेच्या नोंदी , झडती , घटना स्थळाचा पंचनामा , गुन्ह्यातील मुद्देमाल असलेली बालदी ताब्यात घेणे, साक्षीदारांचे जबाब , तरुणाला न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीत ठेवण्यासाठी पोलिसांनी घेतलेला रिमांड, जामीन प्रक्रिया, दोषारोप पत्र आणि खटला सुनावणी असे शुक्लकाष्ठ इतके दिवस मागे लागते की त्याला सुमार नसतो . पोलिस स्टेशनमध्ये ” शरीराविरूद्ध गुन्हे ” या सदरातील आरोपींच्या अभिलेखात आणखी एका नावाची भर पडते.
नुकताच नोकरीला लागलेला मध्यमवर्गीय तरुण. आईवडील खुषीत. नेमाने घरून डबा घेऊन ऑफिसला
जाणारा. स्वतःची मोटर सायकल घेण्याचे स्वप्न बाळगून असलेला असा तो , पगारातील पैशाची बचत करतो. वडील त्यात भर घालण्याची तयारी दाखवतात. नवीन घेणे शक्य नसते . सेकंड हॅण्ड मोटार सायकली विकणाऱ्याकडे तो जातो. त्याच्या मित्राने अगोदर तिथूनच मोटार सायकल घेतलेली असते. मित्राच्या शिफारशीनुसार तिथूनच सेकंड हॅण्ड मोटार सायकल विकत घेतो. त्यासाठी आईचा एखादा दागिना तारण ठेवून एखाद्या खाजगी कर्ज वितरण कंपनीतून थोडेफार कर्ज उचलतो. चांगला दिवस पाहून दिमाखात गाडी घरी येते. पूजा होते. मुलाच्या आनंदाला पारावर उरत नाही. आईच्या मुखावर मुलाबद्दल कौतुक ओसंडत असतं. मुलगा हेल्मेट, पाठीवर हावरसॅक असा रोज ऑफिसला जाउ लागतो. असेच काही दिवस जातात आणि एखाद्या बेरात्री दारावर पोलिसांची थाप पडते.
” गाडी नंबर xxxxxx तुझी का ? ” ,
“होय साहेब “…मुलगा .
” चावी दे आणि आमच्या गाडीत बस ” पोलिस सांगतात.
घरातल्यांच्या पायाखालची जमीन सरकते.
असं झालेलं असतं , की पोलिसांनी एक मोटार सायकल चोर पकडलेला असतो. तो ज्याला चोरीच्या गाड्या विकतो तोही पोलिसांच्या जाळ्यात अडकतो, त्याने गाडीची बनावट कागदपत्रे खोट्या सरकारी शिक्यानिशी तयार केलेली असतात, अशा बनावट कागदपत्रांचा उपयोग करून तो विक्रेता चोरीची मोटार सायकल या तरुणाच्या गळ्यात मारतो.अजाणतेपणी या मुलाने कर्ज घेण्यासाठी त्या बनावट कागदपत्रांचा उपयोग केलेला असतो. गुन्हा दाखल होतो. गाडी जप्त होऊन मुद्देमाल म्हणून केस संपेपर्यंत सडत पडते . गहाण दागिना परत मिळण्याची शक्यता रहात नाही. पोलिस तपासाच्या विलंबित प्रक्रियेत मुलाची नोकरी जाण्याची आपत्ती येते आणि एकूणच कुटुंबाची फरपट होऊन कौटुंबिक स्वास्थ्य पार लयाला जातं.
नोकरीच्या प्रतीक्षेत असलेला असाच पदवीधर मुलगा. एखादा नातेवाईक त्याच्या आई वडिलांना सांगतो,.
” आमच्या तळमजल्यावरची जागा एका फायनान्स कंपनीने भाड्याने घेतली आहे. जागामालक माझा चांगला मित्र आहे . त्याला सांगून पाहतो याच्या नोकरीसाठी. तो बोलेल त्या कंपनीच्या मालकाशी.”
मुलगा नोकरीला लागतो. त्या कंपनीचा कारभार , लोकांकडून ठेवी घेऊन ठराविक मुदतीनंतर काही पटींनी परतावा देणे अशा प्रकारचा. कंपनीत मुलाच्या शिक्षणाच्या तुलनेने भरघोस पगार . त्यावर , मिळालेल्या ठेवींवर स्टाफला आकर्षक कमिशन. त्यामुळे मुलगा आलेल्या संभाव्य ठेवीदारांना कंपनीच्या योजना हिरीरीने समजावतो. पावत्यांवर सह्या करतो. छानछोकीने राहू लागतो. आणि अचानक एक दिवस कंपनीचा मालक कंपनीच्या खात्यातील सगळे पैसे दुसरीकडे वळवून , काढून घेऊन परागंदा होतो. ठेवीदार वेडेपिसे होतात. मग पोलिस केस . ठेवीदार तक्रारींचा पाढा वाचत असल्याची टी व्ही वर दृष्ये . अत्यंत कडक अशा ” ठेवीदार संरक्षण कायद्याखाली ” गुन्हा दाखल होणे आणि ओघाने त्या मुलाची सह आरोपी म्हणून त्या गुन्ह्यात अटळ अटक. त्यानंतर दीर्घ काळासाठी मागे लागणारे ते शुक्लकाष्ठ.
चार पाच कॉलेजकुमारांचा घोळका कॉलेजच्या गेटपाशी थट्टा मस्करी करत उभा. नव्यानेच मोटार सायकल शिकलेला तरुण वेगात येत असताना किंचितसा धक्का या गटातील कुणाला तरी लागतो. त्यावरून बाचाचाची. स्थानिक मोटर सायकलवाला फोन करून त्याच्या आळीतील मित्रांना बोलवतो. त्याचे चारपाच मित्र शिगा आणि काठ्या घेऊन येतात . ते भांडण करणाऱ्या धक्का लागलेल्या मुलाला “राखपट्टी ” देण्यासाठी बाजूला घेतात. त्याचे मित्र स्वाभाविकपणे त्याला सोडवायला सरसावतात. तोपर्यंत आलेला एखादा कोणाला तरी काठीचा तडाखा देतो. दोन गटात पाच सात मिनिटे हातापायी होते. एक दोन जण किरकोळ जखमी होतात. तेवढ्यात पोलिस कंट्रोल रूमला कोणीतरी फोन करतं. आसपास असलेली Police Patrolling Van तिथे थडकते आणि त्या दोन्ही गटांना गाडीत कोंबून पोलिस ठाण्यात नेते. जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी सरकारी दवाखान्यात नेले जाते. वैद्यकीय प्रमाणपत्रं आली की एकमेकाच्या तक्रारीवरून दंगल केल्याचे परस्परविरोधी गुन्हे दाखल. पुन्हा तेच अटकेपासून खटल्याचा निकाल लागेपर्यंत न संपणारे शुक्लकाष्ठ.
हे असे प्रकार दररोज कुठे ना कुठेतरी घडतच असतात. आदल्या दिवसापर्यंत पोलिस कोठडी बाबत पुसटशीसुद्धा कल्पना नसताना दुसऱ्या दिवशी त्या पोराला आयुष्यभर पुरणाऱ्या अनुभवांची नांदी सुरू होते.
उथळ माध्यमे मारामारी कशी झाली यावर रसभरीत रकाने भरून कॉलेजमधे वाढणाऱ्या गुंडगिरीबाबत चिंता व्यक्त करतात. त्या वेळी केवळ मित्राला सोडवण्यासाठी पुढे गेलेल्या परंतु फिर्यादीत नाव आल्यामुळे अटकेला सामोरे जावे लागणाऱ्या , एरवी सालस असलेल्या मुलाला गुंड ठरवून टाकतात. तो पुढे निर्दोष सुटतोही . पण तो पर्यंतच्या काळात त्याला अनंत दिव्यांतून जावे लागते.
मुलाच्या वडिलांची स्थिती फार दयनीय असते. बरं, आजपर्यंत त्यांचा पोलिस, कोर्ट, वकील , जामीन इत्यादी कोणत्याही गोष्टीशी संबंध आलेला नसतो. जे ऐकतोय त्यावर त्याना विश्वास ठेवणे भाग पडते. घरात लग्नाच्या वयाची मुलाची बहीण असते. तिला सांगून आलेली स्थळे दूर होतील ही रास्त भीती त्यांना सतावत असते.
मुलाची आई तर पूर्ण हतबल झालेली असते. वडिलांनी कितीही आदळआपट केली तरीही आपला मुलगा अजाणतेपणी या फेऱ्यात अडकला गेलाय याची फक्त त्या माऊलीला खात्री असते. तो लॉकअप मधे असताना दिवसातून दोनदा जेवणाचा डबा पोलिस स्टेशनमधे घेऊन येणारी आई , त्याची जामीनावर कधी सुटका होईल वगैरे बाबत चौकशा न करता रात्री आणलेला डबा मुलगा जेवला की नाही याची दुसऱ्या दिवशी सकाळी प्रथम खात्री करते. शक्य होईल तेव्हा. ” अहो कुणाच्या भानगडीत नसतो हो तो. शाळेत किती बक्षिसं मिळवली आहेत त्याने ” असं पोलिसांना सांगत असते. आईच ती !
मुलगा काहीही बोलत नसतो. आपल्यामुळे घरावर आलेली विपरीत छाया त्याला कळत असते. आपल्या घरातील वातावरणाला आपणच जबाबदार असल्याची खंतही त्याला वाटते. पण त्याचं तरुण रक्त त्याला उघडपणे परिस्थितीला शरण जाऊ देत नाही. या सगळ्याचा कुठून ना कुठून तरी बदला कसा घेता येईल याचा, त्याचं तरुण बंडखोर मन शोध घेतय हे त्याच्या देहबोलीवरून स्पष्ट दिसून येतं. अटकेच्या अगदी आधीच्या दिवसापर्यंत आपल्या भविष्याबद्दल त्याने मनात जपलेले मनसुबे बाजूला पडतात. ज्या कोणामुळे आज त्याला पोलिस ठाण्याची हवा खायला लागली ते त्याचे आयुष्यभराचे शत्रू होतात.
पोलिस कोठडीत किंवा न्यायालयीन कोठडीत , तुरुंगातील जगाचा अनोखा अनुभव त्याला येऊ लागतो.
कोठडीत अंमली पदार्थांच्या प्रकरणातील , फसवणुकीच्या ,घरफोडीच्या, पाकीटमारीच्या, खुनाच्या अशा अनेक प्रकारच्या गुन्ह्यातील कैदी एकत्र असतात. त्यात सराईत गुन्हेगारही असतात. त्यांची भाषा जगावेगळी. जगाकडे पाहण्याची नजर निराळी. बेरड वृत्ती आणि टक्केटोणपे खाऊन झालेला बेडर स्वभाव यामुळे जगापासून मानसिक दृष्ट्या तुटलेल्या अशा भणंगांच्या सानिध्यात आल्यावर अशी काही मुले त्यांच्या अर्धवट वयात त्या गुन्हेगारांना हिरो समजू लागतात.
” अपुन इतने बार अंदर हुयेला है!” ,
” मैने आजतक इतने लोगोंको काट डाला हैं “,
“अपने सामने सब लॉक फेल हैं l अपुन कौनसाभी लॉक दो मिनिटमें खोल सकता हैं l”
लॉकअप मधील अल्पकाळाच्या वास्तव्यात सर्वस्वी नवीन जगतातील अशा फुशारक्या त्या तरुणांना गुंग करणाऱ्या ठरल्या नाहीत तर नवल !
साधारणपणे सतरा ते बावीस या वयोगटातील बहुतेक मुलांना आपले मित्र म्हणजे सर्वस्व असते. घरच्यांनी कोणत्याही गोष्टीला विरोध केला की बंड करून उठल्यासारखा त्या विरोधाला अवज्ञेने विरोध करणे, त्याच्या भविष्याची चिंता असणारे वडील शत्रूसमान भासणे , जग काय म्हणेल यापेक्षा मित्र काय म्हणतील याला सर्वात महत्त्व देणे , घर सोडून जाण्याची भाषा करणे आणि हा खरंच डोक्यात राख घालून गेला आणि स्वतःच बरंवाईट करुन घेतलं तर ? या चिंतेने दोन्हीकडून मरण होत असलेल्या आईने त्याला सांभाळून घेत छुपा आधार देणे , या आणि अशा , मध्यमवर्गीय घरातील तीव्रतेत कमी अधिक फरक असलेल्या सामायिक गोष्टी.
या अशा मुलांचा बाल्यावस्थेचा कोष पूर्ण गळून पडल्यावर त्यांना अचानक पंख फुटल्यासारखी ती बेबंद होतात. त्यांच्या धाडसी होत चाललेल्या वृत्तीला एक निडर आणि काही अंशी जुगारी कड सुद्धा येते. ” जो होगा देखा वो जायेगा ” अशी काहीशी मानसिकता होते आणि साहजिकच मग त्यामुळे होणाऱ्या परिणामाबाबत त्यांच्यात एक प्रकारची बेफिकिरी येते.
ही अवस्था असतानाच तरुणांना संगतीचे महत्त्व , सुनिश्चित आयुष्याचे प्रयोजन आणि त्याचे सुशांत जीवनासाठी दूरगामी लाभ याबाबत समुपदेशनाची खरीखुरी आवश्यकता असते हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.
कोणत्याही सरकारी नोकरी किंवा योजनेबद्दल असो किंवा अगदी पासपोर्ट काढताना असो , व्यक्तिगत माहिती रकान्यात भरताना हटकून
” IS THERE ANY CRIMINAL CASE PENDING AGAINST YOU ? “
हा प्रश्न हटकून समोर येतोच येतो .
न्यायालयात गुन्ह्याचा खटला निकाली संपायला काही वर्ष लागतात. तो संपेपर्यंत कोर्टात तारखेला हजर रहावे लागते. नाहीतर अटक वॉरंट निघते. ते निघाले की वकीला मार्फत कोर्टात अर्ज करून ते रद्द करून घ्यावे लागते. की तो पुन्हा खर्च . तारखा १४/१४ दिवसांच्या अंतराने पडतात . कोर्टाची तारीख सुटीच्या दिवशी कधीही पडत नसल्याने प्रत्येक तारखेला कामाच्या ठिकाणी रजा किंवा सवलत घेणे भाग पडते. खाजगी कंपन्यामधे अशा सवलती किंवा रजा वारंवार मिळत नाहीत. त्यात नोकरी जाते. अशा प्रकारे गुन्ह्यात अडकलेल्या मुलांची समाजाकडून , प्रत्यक्ष नसली तरी आडून सर्रास हेटाळणी होत असते. याचा एकत्रित परिणाम म्हणून की काय , अशी मुले बिथरतात. आपण आता कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी आपल्यावरचा हा बट्टा जाणार नाही अशी त्यांची धारणा होते. आणि चांगली जीवनमूल्ये त्यांच्या लेखी चेष्टेचा विषय होतो. लोकं आपल्यापासून दूर दूर रहात आहेत हे त्यांच्या लक्षात येतं आणि आपण बाकीच्या जगापासून वेगळे आहोत ही त्यांची भावना बळावते.
यथावकाश खटला संपतो . तो निर्दोष सुटतो. परंतु एकदा पोलिसांनी अटक केलेलं असलं की ” तुरुंगाची हवा खाऊन आलेला ” हा त्याच्या माथी जो शिक्का बसतो तो पुसला जात नाही . अशा धुमसत्या मनाच्या मुलांतील कलागुण लोप पावतात. त्यांच्यातील उमेदच थिजून जाते. आणि त्यामुळे येणारे नैराश्य त्यांना नकारात्मक विचारसरणीकडे ढकलू लागते.
आपल्या समाज जीवनात मुरलेल्या या प्रवृत्ती सहजासहजी नाहीशा होणे कठीण आहे. मात्र तरुण मुलाकडून अजाणतेपणी गुन्हा घडल्यास कायदेशीर प्रक्रिये दरम्यान त्याला आपल्यात सामावून घेतलं आणि त्याच्या व्यथा समजाऊन घेतल्या तर तो भविष्यात सरळ मार्ग कधीही सोडणार नाहीत हे निश्चित. कारण त्याचं मनही , आपण वास्तवात ” गुन्हेगार ” या सदरात मोडण्याइतक्या खालच्या पातळीचे नाही असं आक्रंदत असतं. मात्र ते मान्य करायला कोणी तयार नसतं.
विवाहोत्तर कलह निर्माण होऊन अगदी पोलिसांपर्यंत तक्रारी जातात तेव्हा कायदेशीर कारवाई करण्या अगोदर , समाजशास्त्र जाणणाऱ्या व्यक्तींकडून संबंधित पति-पत्नी यांना समुपदेशन केले जाते ,ज्यायोगे त्यांचे विभक्त होणे टळून संसार वाचावा . त्याच धर्तीवर ,तरुणांचे मेळावे घेऊन विविध व्यवसाय-मार्गदर्शन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन , आयुष्याला कलाटणी देणाऱ्या अशा घटना ज्या तरुणांच्या बाबतीत घडल्या आहेत अशांशी जर प्रत्यक्ष जवळीक साधली तर त्यांचे आपुलकीचे चार शब्द त्या तरुणाच्या भावी आयु्ष्याचे चित्र पालटतील हे निर्विवाद.
तुरुंगाच्या कोंदट हवेतून बाहेर आलेल्या ह्या तरुणांना पुन्हा मुक्त मोकळ्या हवेत भरारी घेण्यासाठी मदतीचा हात आपणच द्यायला हवा.
–अजित देशमुख,
( निवृत्त) अप्पर पोलीस – उपायुक्त.
9892944007
इ-मेल: ajitdeshmukh70@yahoo.in

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..