नवीन लेखन...

शिक्षण कोहिनूर (कथा)

“काका यंदाच्या शिक्षकदिन विशेषांकासाठी कोणाची मुलाखत घेणार आहात? काय ते लवकर ठरवा. दिवस फार थोडे राहिले आहेत.”

सूर्याजींनी म्हणजे ‘रोजची पहाट’ या लोकप्रिय दैनिकाच्या संपादकांनी आपले मुख्य वार्ताहर, मुलाखतज्ज्ञ काका सरधोपट यांना विचारले.

“साहेब, अहो तुम्ही काय रोजचा अंकही विशेषांक म्हणून काढाल, पण रोजच्या रोज आणि कुणाच्या मुलाखती घेऊ?”

“काका, तुम्ही असं म्हणता? अहो, कुणाचीही आणि कसलीही आणि कुठेही मुलाखत घ्यायची तुमची ख्याती आणि तुम्हीच असं म्हणावं?”

“तसं नाही साहेब, ते एरवी ठीक आहे. पण एखाद्या विशेषांकासाठी मुलाखत म्हणजे त्या विषयाशी संबंधित नको का?”

“अहो मग एखादा शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य पकडा कोणीतरी. अशा प्रसंगी मुलाखती द्यायला काही मंडळी तर कायमची तयार असतात.”

“छे, छे साहेब. ते आपल्या ‘रोजची पहाट’ला शोभणार नाही. शिवाय आपण ‘विशेषांक सम्राट हे बिरुद वागवतात ते प्रत्येक विशेषांक काही तरी नवीन देतो म्हणूनच ना? एकदा एखादी मुलाखत आल्यावर त्याच व्यक्तीची मुलाखत आपण कधी छापतो का?”

“हे पहा काका, आपली धोरणे तुम्हाला ठाऊक आहेत मग पुन्हा माझ्या तोंडून कशाला वदवून घेता?”

“साहेब, ती धोरणे राबवताना माझे काय हाल होतात ते थोडे लक्षात घ्या म्हणजे झाले.”

“आले, आले लक्षात. हरदासाचे गाडे शेवटी आले मूळपदावर. तुमचा उद्देश लक्षात आला.   बरं आता सांगा, कोणाची मुलाखत घेणार आहात?”

काका मनातल्या मनात, “म्हातारा महा कद्रू आहे. आपले काम काढून घेण्यात पटाईत.’ उघडपणे म्हणत, ‘साहेब, शिक्षण कोहिनूर अण्णागुरूजी यांची मुलाखत घ्यायचे ठरवले आहे.”

“शिक्षण कोहिनूर? हे काय नवीन? कधी ऐकले नाही. अहो काका असे कोहिनूर नाक्यानाक्यावर आहेत, त्यांच्या कसल्या मुलाखती?”

“साहेब ते कोहिनूर वेगळे आणि हे शिक्षण कोहिनूर वेगळे. या वर्षापासून सरकारने शिक्षण क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या शिक्षकास हा सन्मान देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ अण्णागुरुजी यांची निवड झाली आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रात काही मूलभूत प्रयोग केले आहेत. त्यामुळे त्यांना हा सन्मान मिळत आहे.’

“अच्छा म्हणजे हे काही तरी पद्मश्री, पद्मभूषण सारखे आहे वाटते?”

“साहेब आपण रोजची पहाटचे संपादक, विशेषांक सम्राट. आपल्याला हे माहीत नाही असे कसे होईल? (मनात) बारा गावचे पाणी प्यायला आहे म्हातारा पण अज्ञानीपणाचा आव बघा कसा आणतोय. (उघडपणे) का माझी परीक्षा बघताय?”

“काका तुमची कोण परीक्षा पाहाणार? बरं ते राहू द्या. त्या अण्णा गुरुजीच्या मागे लागा. चला लागा कामाला.”

“साहेब, ही माझी हजारावी मुलाखत आहे. साहेब, त्यानंतर मला रोजची पहाट’चा ‘कोहिनूर’ असा एखादा पुरस्कार आणि भरघोस पगारवाढ मिळेल, अशी मी आशा करावी काय?”

“काका चेष्टा पुरे. बघतो मी पण तूर्तास त्या अण्णाला गाठा, जा.”

काका अण्णागुरुजींना त्यांच्या जिल्हा परिषद शाळेच्या कार्यालयात ठरलेल्या वेळेवर भेटायला जातात. शाळेत फक्त मुख्याध्यापक अण्णागुरुजी आणि त्यांच्या खोलीसमोर एका स्टुलावर त्यांचा शिपाई डुलक्या खात असतो. बाकी शाळेत सगळा शुकशुकाट असतो. काका वर्गात डोकावतात पण वर्ग रिकामेच दिसतात. ते शिपायाला उठवतात. शिपाई दचकून उठतो.

“काय रे, शाळेला सुट्टी वाटते?”

“नाही साहेब.”

“नाही? मग सारे वर्ग रिकामे दिसतात ते?”

“रिकामे कशापाई? समदी पोरं गेलीत चेअरमन सायबांच्या ऊसाच्या शेतावर.”

“असं? छान छान!” काकांना वाटलं चेअरमन सायबांचा वाढदिवस वगैरे काहीतरी असेल म्हणून शाळेच्या पोरांना ऊसाचा रस प्यायला नेलं असेल.

“बरं ते असू दे. अण्णा गुरुजी तर आहेत ना?”

“हाय हायेत ना. आपण कोण?”

“मी काका. काका सरधोपट. त्यांची मुलाखत घ्यायला आलोय.”

“हा, मंग जावा की आत. आपलीच वाट बगत्यात.”

काका आत शिरतात. अण्णागुरुजी स्वागत करतात.

“या, या काका सरधोपट. तुमचीच वाट बघतोय.”

“नमस्कार गुरुजी. शिक्षण कोहिनूर हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल आपले प्रथम अभिनंदन!”

“आभारी आहे.”

“गुरुजी, या पुरस्काराबाबत आणि तो पुरस्कार आणपास प्रथम मिळत आहे याबद्दल आमच्या रोजची पहाटच्या वाचकांना काही माहिती देता का?”

“हो देतो ना. केंद्र सरकारने प्रत्येक क्षेत्रात उदा. आरोग्य, शेती, विज्ञान संशोधन, इतिहास, तंत्रज्ञान इ. इ. मधे मूलभूत कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस कोहिनूर पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की, शिक्षण क्षेत्रात हा मान महाराष्ट्राला प्रथम मिळत आहे.”

“वा! महाराष्ट्राला हे खचितच भूषणास्पद आहे. या क्षेत्रात आपण कोणते मूलभूत कार्य केले आहे?”

“काका, तसा तर मी नाममात्रच आहे. पण शिक्षण क्षेत्राकडे बघण्याची एक नवी दृष्टी आपले माननीय मुख्यमंत्री लफडेसाहेब यांच्या मार्गदर्शनामुळे मला मिळाली आणि त्यामुळेच मी हे मूलभूत काम करू शकलो.”

“म्हणजे याचे श्रेय आपण माननीय मुख्यमंत्री लफडेसाहेब यांना देऊ इच्छिता.”

“होय काका.”

“अच्छा, म्हणजे हे असे लफडे आहे तर!”

“लफडे? अहो कसले लफडे? काका यात काही लफडे बिफडे नाही. या कार्याची प्रेरणा मला त्यांच्याकडून मिळाली एवढेच. मी फक्त माझे कर्तव्य केले.”

“वा! फारच छान! विद्या विनयेन शोभते! हे वचन आपल्याकडे पाहून पटते. माननीय मुख्यमंत्र्यांनी काय मार्गदर्शन केले आपल्याला?”

“काका, सध्या शिक्षण म्हणजे फक्त घोकंपट्टी आणि कारकुनी कामाचा कारखाना झाला आहे. असे शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या मुलांना ना शहरात, ना गावात काम मिळतं. अशा पोशाखी शिक्षणामुळे मुलांना गावातली कामे करायला लाज वाटते. मग शेतीवाडी कुणी करायची? सगळेच शहरांकडे पळणार. शेतात घाम गाळण्यापेक्षा त्यांना शाळेत शिपाई बनून बिड्या फुकायला बरे वाटते. आमच्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हा प्रकार मुळापासूनच सुधारावयाचे ठरवलेआणि शाळा इमारतीच्या खुराड्यातून बाहेर काढून शेतांच्या मोकळ्याढाकळ्या वावरात हलवायचे ठरवले.”

“वा! फारच छान! अगदी रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनप्रमाणे वाटते! पण हे त्यांनी कसे साधले? म्हणजे प्रचलित शिक्षणपद्धतीच्या अधीन राहून?

“सांगतो. फारच क्रांतिकारी आहे त्यांची कल्पना. काका, आत्ता तुम्ही आलात तेव्हा तुम्हाला शाळेत काय फरक जाणवला?”

“आधी मला वाटले मुलं फार शांतपणे शिकत आहेत. बिलकूल आवाज करत नाहीत. मग नीट पाहिले तर सर्व वर्ग रिकामे! तुमचा शिपाई म्हणाला, सगळी पोरं चेअरमन साहेबांच्या ऊसाच्या शेतावर गेलीत. काय आहे हा प्रकार? मुलांना कारखाना पाहायला नेले आहे का?”

“छे छे काका. अहो नुसता कारखाना नाही पाहायचा. तिथे जाऊन प्रत्यक्ष काम करायचे. आम्ही याला व्यावसायाभिमुख शिक्षणपद्धती म्हणतो. हीच तर आमची मूलभूत क्रांतिकारक योजना!”

“वा! नक्कीच काहीतरी वेगळे दिसतेय. जरा स्पष्ट करून सांगता का?”

“काका माननीय मुख्यमंत्री लफडेसाहेबांची ही कल्पना. शाळेच्या चार भिंतीतून बाहेर पडून, शालेय शिक्षणाबरोबरच व्यवसाय आणि व्यावहारिक शिक्षण, श्रमातला आनंद, कष्ट करण्याची सवय, शिका आणि शिकता शिकताच कमवा या हेतूने माननीय मुख्यमंत्री लफडेसाहेबांनी शाळेतील सर्व मुलांना व्यवसाय शिक्षण सक्तीचे केले आहे. या भागात साहेबांचे चार साखर कारखाने आहेत. सध्या गळीताचा हंगाम चालू आहे. त्यामुळे ऊस तोडणीपासून ऊस गाळणी आणि साखर निर्मितीच्या सर्व कामात शाळेतील सगळी मुलंमुली आनंदाने सहभागी होतात. त्यातून त्यांना कामाचा अनुभव मिळतो.”

“पण त्यांच्या अभ्यासाचे काय?”

“काम करता करताच ते अभ्यासही करतात. त्यांचे शिक्षकही त्यांच्याबरोबरच कामावर असतात. त्यांना तिथेच नाष्टा, जेवणही मिळते.”,

“ही तर बालमजुरी झाली.”

“छे.छे. यात कसली बालमजुरी? मजुरीच नाही तिथे बालमजुरी कसली?’

“म्हणजे आपण फुकटात या मुलांना वापरून घेता?”

“तसे नाही काका. हा त्यांचा प्रशिक्षण कालावधी असतो, ज्याला तुम्ही अप्रैटिसशिप म्हणता.”

“पण अॅग्रेटिसशिपमध्ये अॅडेंटिसशिप भत्ताही देतात.”

“आम्ही पण देतो. शासनाने मुलांना दुपारचे जेवण देण्याचे धोरण ठरवले आहे त्याप्रमाणे जेवणाचा खर्च शासनाकडून मिळतो. ते तर आम्ही मुलांना देतोच शिवाय रोजचा दहा रुपये भत्ताही देतो. त्यातून त्यांच्या कपड्यालत्याचा, वह्यापुस्तकांचा खर्च भागतो. तिथेच ते संध्याकाळी मैदानी खेळही खेळतात. अभ्यास, काम, खेळ, कमाई असा हा आदर्श शिक्षणक्रम आहे.”

“अण्णा हे सर्व बेकायदेशीर आहे. अशा प्रकारे मुलांचा वापर करणे अयोग्य नाही का?”

“काका शिकून तरी त्यांच्या पोटापाण्याची हमी कोण घेतो का? आमच्या शिक्षण पद्धतीत मुलांना शाळा चालू असतानाच चार पैसेही मिळतात आणि पास झाल्यावर कायमचे कामही मिळते.”

“अण्णा हे झाले ऊसाच्या हंगामात, एरवी काय व्यवसाय प्रशिक्षण असते?”

“काका, व्यवसायांना काय तोटा? शेतीची बारमाही कामे असतात. पशुपालन, कोंबडीपालन, शेळीपालन, खत निर्मिती, रस्ते बांधणी, इमारत बांधणी अशी अनेक कामे, व्यवसाय असतात. त्या त्या ठिकाणी आमची मुले प्रशिक्षण घेतात. एक उदाहरण सांगतो. आमची ही जिल्हा परिषद शाळा बघताय ना, ही संपूर्ण शाळा आमच्या विद्यार्थ्यांनी व्यवसाय प्रशिक्षणातून बांधली आहे.”

“काय सांगताय?”

“काका, जिल्हा परिषदेने शाळेच्या कामाला मंजुरी दिली आणि निधी दिला तेव्हा आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदाराला शाळेच्या मुलांना प्रशिक्षित करून त्यांच्याकडूनच सर्व काम करून घ्यायची अट घातली.”

“काय सांगता? म्हणजे कामावरचा खर्चही वाचला म्हणायचा.”

‘नाही, कागदोपत्री तो तेवढा दाखवावा लागतो. नाहीतर हिशेब तपासनीस मंजुरी देणार नाहीत.”

“अण्णा, पण हे सगळे तुम्ही कसे जमवता?”

“काका, ते आमचे माननीय मुख्यमंत्री जमवतात. त्यांचा उद्देश अत्यंत चांगला असल्याची खात्री त्यांनी सरकार दरबारी पटवून दिली आहे. आता ही पद्धत संपूर्ण देशात राबविण्याचा निर्णय घ्यायचा सरकारचा विचार चालू आहे.’

“यातून वाचलेल्या निधीचे काय होते?”

“काका, तो माझा प्रांत नाही. त्यासंबंधी आपल्याला माननीय मुख्यमंत्री लफडेसाहेबच सांगू शकतील.”

“अण्णा, या तुमच्या व्यवसाय प्रशिक्षण आधारित माध्यमिक शिक्षणात आणखी काय काय प्रशिक्षण देता?”

“काका, फक्त शेतीच नाही तर सहकारी बँका, पतपेढ्या, बाजार समित्या, मार्केट समित्या, जनगणना, आरोग्य शिबिरे, निवडणूक प्रचार असे एक ना अनेक व्यवसाय आहेत. या सर्व क्षेत्रात आमचे विद्यार्थी प्रवीण होतात.”

“वा, फारच क्रांतिकारक आहे आपला अभ्यासक्रम. (मनात) पोरांना वापरून घ्यायचा चांगलाच उद्योग आरंभलाय या अण्णागुरुजी आणि लफडेसाहेबांनी. (उघडपणे) अण्णा खरोखरच ‘शिक्षण कोहिनूर’ हा किताब आपल्याला शोभतो खरा.”

“काका, आमच्या संस्थेतून पास झालेल्या सर्व मुलांना शंभरटक्के कामधंदा मिळण्याची आम्ही हमी घेतो.”

“अण्णा, हे सगळे ठीक आहे. पण शिक्षण खात्याच्या कायदे, नियमांचे पालन आपण कसे करता?”

“काका त्यासाठी आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी पर्याय ठेवला आहे. पूर्वप्राथमिक प्राथमिक, विद्यापिठीय शिक्षणासाठी आमच्या मोठमोठ्या लफडे संकुल योजना आहेत. त्यातून शाळा, महाविद्यालये चालविली जातात. त्यात प्रचलित सर्व शिक्षणक्रम, कायदेकानून पाळले जातात. अट फक्त एकच की त्यांनी वेळोवेळी आमच्या ग्रामीण आणि जिल्हा परिषद व्यवसायाभिमुख शाळांना मदत करायची.”

“ती कशी?”

“काका, एक उदाहरण देतो. जेव्हा आमच्या शाळांची तपासणी होते, परीक्षा होतात, तेव्हा त्यांनी त्यांची मुले आमच्या वर्गात बदलीवर पाठवायची.”

“बदलीवर म्हणजे?”

“म्हणजे १० वीची तपासणी असेल तर १०वीच्या तुकडीत सर्व मुले बदलतो. ती परीक्षा देतात. तोंडी, लेखी, सगळ्या परीक्षा देतात. त्यांनाही एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथची शिकवण मिळते.”

“वा! फारच छान! म्हणजे सहकाराचे बाळकडूच मिळते की त्यांना!”

“काका, फक्त एवढेच नाही. माननीय मुख्यमंत्री लफडेसाहेबांनी या शिक्षणपद्धतीद्वारे ग्रामीण आणि शहरी संस्कृतीचा एक अनोखा संगम साधण्याची किमया साध्य केली आहे.”

“वा! खरोखरच ही मूलभूत क्रांतिकारी योजना आहे. बरं या शाळांतून प्रवेश कसा देतात?”

“काका, ग्रामीण आणि जिल्हा परिषद शाळा प्रवेशाबाबत काही बंधने नाहीत शासकीय अनुदानातून त्या चालविल्या जातात. प्रवेश आणि शिक्षणाचा खर्च जिल्हा परिषदेकडून केला जातो. लफडे संकुलातील शाळा कॉलेजांमध्ये मात्र सरकारी नियमांप्रमाणे शुल्क आकारणी आणि राखीव डोनेशन कोटा पद्धतीप्रमाणे काम चालते. भारत आणि इंडिया या आपल्या देशाच्या दोन्ही नावांना शोभेल अशी शिक्षणपद्धती आम्ही विकसित केली आहे.”

“वा! खरोखरच आहे खरी मूलभूत क्रांतिकारी योजना. शिक्षण कोहिनूर पुरस्काराबाबत आपले पुन्हा एकवार अभिनंदन. येतो.”

“धन्यवाद! या!”

— विनायक अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..