पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी येणारे फिर्यादी आणि ज्यांच्या विरुद्ध तक्रार असते ते विरोधक हे , फसवणूक आणि मारामारी अशा प्रकारची गुन्हे प्रकरणे सोडल्यास , एकमेकांच्या ओळखीतले असण्याची शक्यता फार कमी असते.
आश्चर्य वाटेल , परंतु आपला कार्यभाग साधून घेण्यासाठी आपल्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तींविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार करणाऱ्या महाभागांचा अनुभवसुद्धा कधी कधी पोलिस अधिकाऱ्याला येतो. .
१९९७ साली दक्षिण मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून मी नेमणुकीस असताना असाच एक न विसरता येण्याजोगा अनुभव मला आला .
माझे काम करत बसलो असताना, रात्रौ ०९.३० च्या सुमारास , ड्यूटी ऑफिसर माझ्याकडे येऊन दबलेल्या आवाजात सांगू लागला ,” सर, गिरगाव मधला एक खूप शिकलेला माणूस आलाय. त्याला त्याच्या आई आणि लहान भावा विरुद्ध चोरीची फिर्याद द्यायची आहे”
किंचित त्रासलेल्या त्या ड्यूटी ऑफिसरची मन:स्थिती मी समजू शकत होतो.
गुन्हे प्रणालीमधे अपराध्याचा हेतू महत्वाचा घटक असतो. मात्र या अशा बव्हंशी प्रकरणात तक्रारदाराचा हेतू , पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून , आपले इप्सित साध्य करण्यासाठी विरोधकाला त्रास उत्पन्न करणे हा असतो. अशा प्रकरणाच्या तपासात पोलिस अधिकाऱ्याला तारेवरची कसरत करावी लागते . त्याला तक्रारीमागच्या हेतूची पूर्ण कल्पना असली तरी ज्याच्याविरुद्ध तक्रार असते तो , तक्रारदाराच्या खोटेपणाने का होईना, एकदा ” आरोपी ” या सदरात आला , की त्याच्या विरुद्ध पुरावा गोळा करणे हे पोलीस अधिकाऱ्याचे मुख्य काम राहते . गुन्ह्याची पार्श्वभूमी माहीत असलेला अधिकारी अशा अकारण भरडल्या गेलेल्या व्यक्तीला न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करतो . मात्र ,आपला हेतू साध्य होत नाही असे समजल्यावर बिथरलेल्या तक्रारदाराने केलेल्या नाही नाहीं त्या दोषारोपाना त्या अधिकाऱ्याला तोंड द्यावे लागते.
एकूणच , असे प्रकार तापदायक ठरतात.
ड्यूटी ऑफिसरने बोलता बोलता , त्या व्यक्तीने दिलेले व्हीजिटिंग कार्ड मला दाखवले. त्यावर दोन समांतर ओळीत छापलेली पदव्यांची माळ त्याची उच्च शैक्षणिक पात्रता दर्शवित होते . पवई येथे एका उच्चभ्रू वसाहतीत राहणारी ती व्यक्ती एका अग्रगण्य परदेशी कंपनीत अतिउच्च पदावर असल्याचेही कळत होते. समोरचे काम हातावेगळे केले आणि त्यांना माझ्यासमोर घेऊन येण्यास मी त्या अधिकाऱ्याला सांगितले.
साधारण ४५/४६ वर्षाच्या , आपल्या फॅशनेबल पत्नीसह आलेल्या त्या इसमाने माझ्या समोर येताच मलाही त्याचे व्हिजिटिंग कार्ड दिले. वाचल्यासारखे करून मी त्याना बसण्यासाठी खूण केली. माझा अधिकारी माझ्या बाजूला नोट पॅड घेऊन बसला.
” काय तक्रार आहे आपली?” मी विचारले.
” माझ्या लहान भावाने आणि आईने चोरी केली आहे. त्याबद्दल मला चोरीची एफ. आय. आर . द्यायची आहे “. त्याने सांगितले.
” कुठे झाली ही चोरी ?” ..मी
“आमच्या घरातूनच . गिरगाव मधून”…. ते दोघे म्हणाले.
” आपण पवई ला राहता ना?” मी विचारले.
” हो पण गिरगावच्या घरावरचा हक्क आम्ही सोडलेला नाही.”
लख्खकन डोक्यात प्रकाश पडला…….”प्रॉपर्टी वरून भांडण”……
“कशाची चोरी झाली आहे ?” मी विचारलं.
” त्या गिरगावच्या घरात मी विकत घेतलेलं कपाट होतं. त्यात माझ्या वस्तू आणि जुनी पुस्तकं होती. ते सगळं माझ्या संमती शिवाय गायब केलय त्या दोघांनी.” त्याने मला चोरीच्या मालाचा जुजबी तपशील पुरवला.
मघाशी यांच्या पदव्यांच्या यादीवरून नजर फिरवत असताना यांनी कायद्याची पदवीही संपादन केल्याचे समजले होते . परंतु पुस्तकातील “चोरी” च्या व्याख्येतील “संमती ” वगैरे शब्द ऐकून , हे आपल्याला उपयोगी कायद्याची उजळणीसुध्दा करून आलेत , तीही जन्मदात्या आईच्याच विरोधात तक्रार करण्यासाठी, हे जाणवले आणि मनातल्या मनात हसू आले.
तेवढ्यात, ” आपण अमुक अमुक आणि अमुक अमुक साहेबांना ओळखत असाल ना? “.. आमच्या खात्यातील मला खूप वरिष्ठ असलेल्या अधिकाऱ्यांची नावे घेऊन या व्यक्तीच्या पत्नीने प्रश्न करून ” आमची वरपर्यंत ओळख आहे ” हे अप्रत्यक्षपणे सूचित केले . त्याकडे दुर्लक्ष करून मी विचारले,
“आई आणि भाऊ कुठे असतात ?”…. मी
“आई हल्ली बहिणीकडे चुनाभट्टीला रहायला आहे. भाऊ कोकणात कुठेतरी असतो.आताआलाय इकडे. ” …तो.
” आलाय कशावरून ? ” मी.
“अहो माहिती आहे ना मला तो आलाय ते !” त्याने सांगितले.
म्हणजे भाऊ गिरगावात कधी येतोय यावर हे महाशय कुणाकरवी तरी लक्ष ठेऊन होते. आला , की तो रात्री घरी असण्याच्या वेळेला पोलिसात तक्रार केली की त्याला कुठे जायला अवधी मिळू नये , असं सगळं परफेक्ट प्लॅनिंग करून हे दांपत्य पोलिस ठाण्यात आई आणि भावाला पोलिस केस मधे अडकवायला आले होते.
” किती वय आहे आईंच?”..मी
” ८० वर्ष ” त्याने सांगितले.
या वयात त्यांना पोलिस ठाण्याची पायरी चढायला लागली तर त्यातून त्या सावरतील का? या शंकेने मी व्यथित झालो.
” तुम्ही माझी चोरीची फिर्याद घ्या आणि ते कपाट कुठे आहे त्याचा छडा लावा” समोरून तगादा सुरू होता.
अशा परिस्थितीत कायदेशीर कारवाई करण्याची घाई करायची नसते.
८० वर्षाच्या वृद्धेला तिच्या मुलाच्या चोरीच्या तक्रारीवरुन दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक…… हे वाक्यच कानाला किती चमत्कारिक वाटतंय पहा.
प्रथम मी साध्या कपड्यातील डीटेक्शन स्टाफला रवाना करून तक्रारदाराच्या लहान भावाला गिरगाव मधून पोलिस स्टेशनला आणून बसविले.
दरम्यान चुनाभट्टी येथे बहिणीकडे फोन करून प्रकरणाची थोडी कल्पना देऊन काळजीचे कोणतेही कारण नसले तरी आईंचा जबाब घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्या बरोबरच, त्या येण्यास असमर्थ असतील तर साध्या कपड्यातील स्त्री अधिकारी मी पाठवून देईन असेही सांगितले.
बहिणीने “अरे व्वा! तिथपर्यंत पोचला का तो? ” असं म्हणून ‘आईला घेऊन मीच येते ‘ असं सांगितलं .
अर्ध्या तासात टॅक्सीने पन्नाशितील बहीण आपल्या ८० वर्षांच्या आईला घेऊन पोलिस ठाण्यात उपस्थित झाली.
आपलीच मावशी , आत्या शोभावी अशी नऊवारी साडीतील आणि अगदी आपल्यासारख्याच मध्यमवर्गीय घरातील स्त्री समोर आल्यावर , या एकूण प्रकारामुळे मनात उसळलेल्या विचारवादळात मी खुर्चीतून उठून त्यांना समोरच्या खुर्चीत बसायला सांगितले.
आल्या आल्या बहिणीने सुविद्य भावाकडे टाकलेला जळजळीत कटाक्ष त्यांच्यातील नातेसंबंधाबद्दल बरेच काही सांगून गेला. आईने मात्र मुलाकडे पाहून न पहिल्यासारखे केले. इतकेच काय खुर्चीत बसताना त्याने आधाराला अनाहूतपणे पुढे केलेला हातही तिने झिडकारला.
आईंशी बोलून मिळालेली माहिती अशी ,
गिरगाव मधे राहणाऱ्या या कुटुंबात दोन भाऊ आणि एक मोठी बहीण . दोन भावांपैकी मोठा खूप शिकला आणि लग्न झाल्यावर पत्नीसह वेगळा राहू लागला . उच्च शैक्षणिक पात्रतेमुळे नोकरीमधे वरच्या स्थानावर पोहोचला. विचारसरणी मात्र उच्च झाली नाही. दरम्यान वडील गेले.
धाकटा भाऊ पहिल्यापासून शिक्षणात जरा मागे होता. जेमतेम मॅट्रिक झाला. स्थिर नोकरी नाही . शिक्षण कमी म्हणून लग्न झाले नाही. आता तर चाळिशी आलेली. सध्या कोणा एका श्रीमंत इसमाचा कोकणात मोठा फार्म होता तिथे व्यवस्थापक म्हणून नोकरीस लागला होता.नोकरीच्या स्वरूपामुळे कोकणात राहणे आवश्यक झाले. मुंबईत होता तोपर्यंत जवळ आई होती. तो कोकणात रहायला गेल्यावर या वयात आई एकटी कशी राहणार , म्हणून बहिणीने आईला आपल्याकडे नेले. मोठया उच्चविद्याविभूषित चिरंजीवांची राहती जागा अनेक खोल्यांची, मोठी आणि भरपूर नोकरचाकरांनी गजबजलेली असली तरी सूनबाईने सासूसाठी घराचे दरवाजे बंद ठेवले होते.
मोठया मुलाकडे गडगंज असल्याने , लहान मुलाच्या अधांतरी भविष्याच्या चिंतेमुळे त्या माऊलीने राहती जागा लहान मुलाच्या नावावर केली. बहिणीची त्याबाबत कोणतीही हरकत नव्हती. परंतु याची कुणकुण लागताच , मोठ्या भावाचा मात्र पोटशूळ उठला.
प्रत्यक्षात काही वर्षांपूर्वी घराच्या अंतर्गत सजावटीच्या वेळेसच मोठ्या मुलाने विकत घेतलेल्या त्या कपाटाची, ते जुने झाल्यामुळे वासलात लावण्यात आली होती. अणि याची त्याला तेंव्हा कल्पना होती . त्यातील उपयोगी पुस्तके त्याने स्वतः नेली होती आणि अनेक वर्षे धूळ खात असलेली जुनी, फारसा उपयोग नसलेली पुस्तके आईने रद्दीत दिली होती . मात्र पुस्तके आणि कपाट तेथे नसल्याबाबतचा दुरुपयोग करण्यासाठी मोठ्याने आपली बुद्धी कायद्याच्या ज्ञानासह पणाला लावली होती.
एकुण तक्रारीचे स्वरूप भावा बहिणीना मी समजाऊन सांगत होतो तेव्हा, आई मात्र निर्विकारपणे एकटक जमिनीकडे पहात होत्या. त्यांचा चेहेरा काही बोलत नसला तरी त्यांच्या मनातील विचारांचा पूर त्या कशा झेलत असतील या विचाराने मीच अस्वस्थ झालो होतो. इतरांशी बोलता बोलता माझे लक्ष फिरून फिरून त्यांच्याच चेहेऱ्याकडे नकळत वळत होते. त्या जणू देवाला मनातल्या मनात ” याहून कोणती मोठी शिक्षा देऊ शकतोस का मला ? असली तर दे . मी तयार आहे ” असं बजावत असाव्यात.
तेवढ्यात बहिण मोठया भावाकडे पहात म्हणाली. ” मी सांगितलं होतं आईला ते कपाट काढून टाकायला. माझंच नाव टाक तक्रारीत. आईचं नाव काढून टाक ” आणि माझ्या कडे पाहून म्हणाली ” सर मला अटक करा आईच्या ऐवजी. मी कपाट चोरले असं हवं तर लिहून देते. ”
इथे तक्रारदाराने ” हे बघ ताई….. ” असा बहिणीशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर तिनेही ताडकन ” मला तुझ्याशी एक अक्षर बोलायची इच्छा नाही. तुला काय करायचंय ते कर ” असे त्याला निक्षून सांगितले. तो गडबडला.
मी सुद्धा केस दाखल करून तिघांनाही अटक करतो असा पवित्रा घेऊन बनाव केला.
” ही केस उद्याच्या क्राईम बुलेटिन मधे आली की सगळया पेपर्स मधे गाजणार” असं मुद्दाम मोठ्याने म्हणालो.
आता मात्र तक्रारदाराचा चेहेरा कसनुसा झाला . “जाऊ दे . मला तक्रार द्यायची नाही .” असे बोलू लागला. मात्र त्याला तसा जबाब द्यावा लागेल अशी समज दिली. त्याचाच नव्हे तर इतर तिघांचाही जबाब घेऊन त्यावर तारीख वेळेचा उल्लेख करून सह्या घेतल्या.
आईने केलेल्या सहीमधील अत्यंत वळणदार अक्षर माझ्या अजून लक्षात आहे.आईनेच लावलेल्या त्याच वळणाचे प्रतिबिंब तक्रारदार मुलाच्या झोकदार इंग्रजी सही खालील त्याने मराठीत लिहिलेल्या नावामध्ये दिसले .
मध्यरात्र झाली होती. तक्रारदार पत्नीसह शोफर ड्रीवन कार मधून निघून गेले.
आई आणि बहिण निघाले तेंव्हा त्यांना टॅक्सी मिळवून देण्यासाठी एका कॉन्स्टेबलला सांगितले. धाकटा भाऊ त्यांच्याबरोबर चुनाभट्टीला गेला त्यामुळे सोबतीला कोणी पोलिस पाठवायचा प्रश्न नव्हता.
झाल्या त्रासाबद्दल आईंजवळ मी दिलगिरी व्यक्त केली तेंव्हा ,
” तुम्ही काही वाटून घेऊ नका हो. माझा मुलगा तसा आहे त्याला काय करणार ! ” असं म्हणून त्यांनी माझीच समजूत काढली. पुढे म्हणाल्या
” त्याला सांगा , मी गेल्यावर उत्तरक्रियेला नाही आलास तरी चालेल. मात्र दुसऱ्या दिवशी माझ्या अर्ध्या अस्थि हक्काने घेऊन जा. म्हणजे त्याने तरी तुझे समाधान होईल .”
ते सगळे निघून गेल्यावर ड्यूटी ऑफिसरला, या बाबत पोलिस स्टेशन डायरी मधे करावयाची तपशीलवार नोंद डीक्टेट करत होतो तेव्हा तो म्हणाला ,
” कसं असतं ना सर ! एवढा शिकला सावरलेला. पण आईलासुध्दा खेचलं पोलिस स्टेशनला ”
मनात आलं .. हे आपले पद आणि पदव्या मिरवणारे शिकलेले असतील , सावरलेले नव्हेत. इतरांना सावरून घेणे ज्यांना जमते त्यांना सावरलेले म्हणावं. हे प्रचंड शिक्षित असतील पण सुशिक्षित निश्चितच नव्हेत.
खरं तर फक्त मॅट्रिक पास झालेली बहीण त्या भावंडांत मला सर्वात सुशिक्षित वाटली.
— अजित देशमुख.
(निवृत्त)अप्पर पोलिस उपायुक्त,
9892944007
ajitdeshmukh70@yahoo.in
Leave a Reply