मोटर शर्यतीतील गतीची सम्राज्ञी
‘मी गतीचे गीत गाई’ हे बाबा आमटे यांच्या एका गीतासारखे बोल रक्ताच्या थेंबाथेंबात जागवतच शर्ले मलडावनी हिचा अमेरिकेत जन्म झाला असावा! लहानपणी हायस्कूलमध्ये शिकत असतानाच न्यूयॉर्कमधील शेनेक्टॅडी (Schenectady) येथील रस्त्यांवरील शर्यतीत आपल्या गावातील मुलांबरोबर शर्ले दांडगाईने वागत असे. त्यानंतर १९६०च्या सुमारास देमार चित्रपटांत दाखवितात तशा सुसाट वेगाच्या धक्काबुक्की करणाऱ्या मोटर शर्यतीत शर्लेने प्रवेश केला. त्या ‘ड्रॅग रेसिंग’च्या जगात शर्लेने आपल्या शौर्याचा एक कायमचा ठसाच उमटविला. सर्वोत्तम ड्रायव्हरांपैकी एक म्हणून तिचा नावलौकिकही झाला होता.
एकमेव प्रमुख महिला शर्यतपटू म्हणून मोटर शर्यतींच्या, मुख्यतः पुरुषी दंडेलीच्या म्हणून मानल्या गेलेल्या क्षेत्रांत शर्लेने आपला दबदबा निर्माण केला होता. इ.स. १९७३ पर्यंत तिची ही दबदबा निर्माण करणारी प्रतिमा कायम होती. मोटर शर्यतीचा हा खेळ मूलतः जीवघेणा असल्याने तिने तो फार गांभीर्याने स्वीकारलेला होता. ती ‘चाचा’ या टोपण नावानेच या खेळातून निवृत्त झाली होती. तिने ड्रॅग रेसिंगमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या महिलांना प्रोत्साहित करताना सांगितले होते की, “या खेळात भाग घेणाऱ्यांनी आपण स्त्री आहोत की पुरुष हा विचारच करता कामा नये. निर्बुद्ध सौंदर्यवती तरुणींना या खेळात स्थानच नाही!”
खरोखरच, ड्रॅग रेसिंगची कार ही चमत्कारिकच दिसते. पुढचा बोनेटचा भाग त्रिकोणात निमुळता व उतरता होत गेलेला दिसतो. एकच व्यक्ती बसू शकेल एवढीच एक सीट असते. हेल्मेट घालून ड्रायव्हर तिथे बसून शर्यतीत भाग घेतो. त्या कारचा वेग ताशी ३०० एम. पी. एच. इतका भयानक असतो. त्या गाडीत बसणे म्हणजे बॉम्बवर बसण्यासारखेच असते. जेव्हा ‘शर्यतीला सुरूवात करा’ असा इशारा देणाऱ्या पिस्तुलाचा चाप ओढला जाऊन ‘फायर’ केले जाते तेव्हा शर्यतीत भाग घेणारी व्यक्ती आपली कार नुसती चालू करीत नाही किंवा अॅक्सिलरेट करीत नाही, तर यानाचे उड्डाण व्हावे तसे कारचे जमिनीवर सरपटते उड्डाण करते! त्या शर्यतीतील कोणत्याही कारच्या वेगाच्या कल्पनेचाच पाहणाऱ्यावर प्रथम विलक्षण ताण येतो. त्या कारला नियंत्रित कसे केले जात असेल हा विचार नंतरचाच ठरतो!
अशा या जीवघेण्या वेगवान शर्यतीच्या खेळात शर्ले हिने प्रावीण्य मिळवावे, ही अविश्वसनीय वाटणारी गोष्टच वाटते. असे असले तरी प्रत्येकाच्या आयुष्यात विरोधक व टीकाकार असतातच. काही तिरकस विचारांच्या टीकाकारांनी शर्ले ही शर्यतीतील केवळ एक उत्सुकतेचाच विषय असून तिची इतर स्पर्धकांना भीती वाटावी अशी काही गोष्ट नाही, असे म्हटले होते. मात्र शर्लेने टीकाकारांना त्यांची तिच्याकडे पाहण्याची दृष्टी पूर्वग्रहदूषित वा चुकीचीच होती हे आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिले. तिने ड्रॅग रेसिंगमधील तिच्या पूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले. शर्यती तर जिंकल्याच; परंतु त्या शर्यतींच्या इतिहासात नवे विक्रम निर्माण केले.
आताच्या तुलनेत १९७० मध्ये जेव्हा शर्ले शर्यतीत उतरत होती तेव्हाच्या शर्यतीच्या गाड्या फार कमी प्रतीच्या व धोकादायक होत्या. शर्लेच स्वतः म्हणाली होती की, “खरोखरच अत्यंत वाईट मशिन्स असलेल्या त्या गाड्या मी चालवीत होते.” ज्यांच्या शक्तीचाच अंदाज नव्हता आणि ज्या चटकन पेटत वा जळून जात अशा त्या गाड्या होत्या!
शर्लेने जेव्हा १९७७ मध्ये जागतिक विक्रम नोंदविला तेव्हा तिची कीर्ती केवळ ड्रॅग रेसिंगच्या विश्वापुरती मर्यादित न राहता सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचली होती. प्रत्येकजण या पृथ्वीतलावरील अत्यंत वेगवान स्त्री म्हणून शर्लेला ओळखू लागला होता. इतकेच नव्हे, तर फक्त पुरुषांच्याच मानल्या गेलेल्या क्षेत्राला धडक देऊन शर्लेसारखी एक स्त्रीही सर्व बंधनांच्या मर्यादा पार करू शकते हे जगाला दिसले होते.
१९८२ मध्ये शर्लेने यू. एस. नॅशनल्स स्पर्धेतील अजिंक्यपद मिळविले होते. हे यश तिला स्वतःलाच अतिशय अभिमानास्पद वाटले होते. प्रथमच एका स्त्रीने मिळविलेले ते यश होते, तसेच त्या शर्यतीच्या इतिहासातील सर्वात जास्त वेगवान वेळात मिळविलेले ते अजिंक्यपद होते.
१९८४ मध्ये शर्लेला एक जीवघेणा अपघात झाला. ताशी २५० एम.पी. एच. वेगाने ती तिची गाडी शर्यतीत पळवीत होती. अपघातातील गाडीच्या धडकेने तिचे करिअरच आणि आयुष्यच संपुष्टात आल्यासारखे झाले होते. अपघाताने भीषण स्वरूपात जखमी झाल्यामुळे आणि दोन्ही पाय वाकडेतिकडे झाल्यामुळे शर्लेला सुमारे दोन वर्षे काही करता आले नाही. फार मोठ्या स्वरूपाच्या पाच शस्त्रक्रिया तिच्यावर करण्यात आल्या होत्या. सुदैवाने ती वाचली होती. तो अनुभवच इतका विदारक होता, की कुणीही माणूस गाडी चालविण्यास पुन्हा व्हील हातात घेण्यास धजला नसता. शर्ले पुन्हा शर्यतीत उतरणारच नाही अशी तिच्या सर्व चाहत्यांची रास्त खात्री होती.
परंतु शर्लेच्या चाहत्यांची विचार करण्याची पद्धत चूक ठरली. सुमारे अठरा महिन्यांच्या शरीर व मनाला थकविणाऱ्या काळाला तोंड देत शर्ले पूर्वस्थितीला आली. नुसती ती शरीरानेच बरी झालेली नव्हती! शर्यतीत पुन्हा उतरण्याची ईर्षा तिच्या मनात पूर्वीप्रमाणेच होती. त्यामुळे पुन्हा दंड थोपटून आणि सिंहगर्जना करून ती स्पर्धेत उतरली व तिने स्पर्धा जिंकलीही! तिचे यश हे आश्चर्यजनक व अविश्वसनीय असल्याने साऱ्या प्रसारमाध्यमांनी शर्लेला डोक्यावरच घेतले होते. प्रत्येकाला शर्लेसंबंधी एक मोठी कथाच लिहायची होती व सांगायची होती व दाखवायची होती! मासिके, वृत्तपत्रे आणि दूरदर्शन यात जणू स्पर्धाच होती. दूरदर्शनवर ‘टू नाईट शो’मध्ये जॉनी कर्सनबरोबर तिच्या यशोगाथेला सादर केले गेले होते. शर्ले ही सर्वांच्या दृष्टीने ‘गतीची सम्राज्ञी’ बनली होती.
परंतु ‘गतीची सम्राज्ञी’ या बिरुदाने शर्लेची गती अद्याप विराम पावलेली नव्हती. नव्या नव्या स्पर्धेतील अजिंक्यपदे आणि बिरुदावल्या ती मिळवतच राहिली होती. तिच्या काळातील अत्यंत नामवंत वाहनचालक म्हणून तिला सर्वमान्यता प्राप्त झालेली होती. १९८९ मध्ये शर्लेने केलेला विक्रम अत्युच्च प्रकारचा ठरला. तिने ‘फोर सेकंद क्लब’ स्पर्धेत भाग घेतला होता. जगातील अत्यंत थोडे वाहनचालक ज्या स्पर्धेत भाग घेतात त्या स्पर्धेच्या उपक्रमात ती उतरली होती. ‘फोर सेकंद क्लब’ जिंकणे म्हणजे पाच सेकंदापेक्षा कमी वेळात पाव मैलांचे अंतर कारला पळवायला लावणे! असे पळवणे म्हणजे किती गतीने जाणे हे सांगता येत नाही! वेग, वेग आणि वेगच! एवढेच म्हणता येते!
शर्लेला वेगाची आवड किती होती याचा सहज अंदाज करता येणार नाही. १९८८ मध्ये जेव्हा तिला एफ-१८ हे वेगवान विमान चालविण्याचे निमंत्रण देण्यात आले तेव्हा तिला त्या निमंत्रणाला नकार देता आला नाही.
ताशी ७५० मैल अशा प्रचंड वेगाने उडणाऱ्या त्या विमानाची हाताळणी शर्ले ने सहजपणे केली होती.
वस्तुतः अशा ताशी ७५० मैल वेगाने जेटसारख्या विमानातून जाताना गुरुत्वाकर्षणाच्या संदर्भातून उड्डाणाची सवय असावी लागते. प्रशिक्षण घ्यावे लागते. परंतु शर्लेचा तो पहिलाच अनुभव असूनही जणू काय तिचा तो नेहमीच्याच सवयीचा अनुभव असावा असे पाहणाऱ्यांना वाटले. त्या तो अनुभवाबद्दल शर्ले म्हणाली की, “आजपर्यंत मी घेतलेल्या अनुभवांतील एक थरारक स्वरूपाचाच अनुभव होता!”
आपल्या अलौकिक यशाबद्दल बोलताना आणि ण इतरांना प्रेरणा देताना शर्ले म्हणाली होती,
“तुमची जर एखादी गोष्ट करण्याची इच्छा प्रबळ असेल तर ती गोष्ट साध्य करण्याचे असंख्य मार्ग तुम्हाला सापडतात. फक्त तुम्हाला तुमच्या निश्चयावर अढळ राहावे लागते. तुम्ही जर निश्चयाचे पक्के नसाल तर मात्र तुमच्या इच्छांना जुन्या पायताणांचीच किंमत उरते!”
१९९८ साली शर्लेना आपल्या कार- रेस कारकिर्दीची चाळीस वर्षे आणि वयाची सत्तावन्न वर्षे पूर्ण केलेली होती. काररेसमधून निवृत्त व्हावे असा विचार तिच्या मनाला शिवलेला नव्हता. ती शर्यतीत भाग घेऊन उच्च घेऊन उच्च श्रेणीचे यश मिळवीतच राहिली.
अत्युच्च श्रेणीच्या खेळाडूंना ‘ऑल अमेरिकन’ म्हणून दिला जाणारा पुरस्कार एकूण सहा वेळा शर्लेला देण्यात आला. १९९६ साली हा पुरस्कार दिला गेला तेव्हा शर्ले आपली शर्यतीच्या खेळातील निवृत्ती आनंदाने जाहीर करील असे सर्वांनाच वाटले होते. परंतु लोकांचा अंदाज चुकला. शर्ले S माझ्या कारकिर्दीस सहजपणे म्हणाली, “अद्याप कितीतरी पुरस्कारांची जोड देण्यासाठी मी तयार आहे !”
शर्लेच्या जीवनावर १९८४ मध्ये ‘सी हार्ट लाईफ ए व्हील’ या नावाचा चित्रपट काढण्यात आला आहे. त्या चित्रपटात बोनी बेडेलिया (Bonnie Bedelia) आणि ब्यू ब्रिजेस (Beau Bridges) यांनी भूमिका केलेल्या आहेत.
विशेष गोष्ट म्हणजे, शर्लेच्या संदर्भात जाणकारांसाठी www.shirleymuldowney.com ही वेबसाइटही संगणकावर उपलब्ध आहे.
-प्रा. अशोक चिटणीस
Leave a Reply