यशवंतराव विद्यापीठ गंगापूर नाशिकचे उपकुलगुरू डॉ. पंडित पालांडे माझ्या गाण्याचे चाहते होते. या विद्यापीठाच्या १८व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी माझा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात माझी विद्यार्थिनी दर्शना घळसासी माझ्याबरोबर गायली. वादक कलाकार म्हणून कीबोर्डवर माझाच विद्यार्थी सागर टेमघरे तर तबलावादक म्हणून अमेय ठाकुरदेसाई आमच्याबरोबर होता. सागर आणि अमेय आता अनेक व्यावसायिक कार्यक्रमांनाही वादन साथ करू लागले होते. माझे विद्यार्थी आणि मला साथ करणारे वादक कलाकार जेव्हा इतर मोठ्या व्यावसायिक कार्यक्रमांना तसेच अनेक टिव्ही चॅनल्सवर कला सादर करताना दिसतात तेव्हा मला अत्यंत आनंद होतो. त्यांची या क्षेत्रातील प्रगती पाहून मला नेहमीच अभिमान वाटतो. यासाठी माझ्या सगळ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना आणि वादकांना मी निरनिराळ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी किंवा व्यावसायिक स्टेजवर जाण्यासाठी नेहमी प्रोत्साहन देतो. अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि वादक यांची जाण ठेवतात. झी चॅनलच्या एका मोठ्या कार्यक्रमात स्टेजवरूनच सागर टेमघरेने मला एसएमएस पाठवून कृतज्ञता व्यक्त केली होती. एके दिवशी माझा तबलावादक अमेय ठाकुरदेसाई याने प्रयोगशील आयोजक संजय जोशी आणि धनंजय फाटक यांची ओळख करून दिली. अनेक नवीन संकल्पनांवरील गाण्याचे कार्यक्रम ही त्यांची विशेषता होती. लवकरच राजर्षी शाहू रंगमंदिर, सातारा येथे मी त्यांच्यासाठी एक कार्यक्रम केला.
मुंबई दूरदर्शनवरील ‘म्युझिक मस्ती गप्पा गाणी’ नावाचा कार्यक्रम विशेष लोकप्रिय होता. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकरने माझी मुलाखत घेतली. कार्यक्रमात काही गाणीही मी सादर केली. ‘शेजारी-शेजारी’ या मराठी चित्रपटात वर्षा प्रमुख अभिनेत्री होती आणि मी पार्श्वगायन केले होते. या चित्रपटाच्या काही आठवणी मुलाखतीमुळे पुन्हा जाग्या झाल्या.
कोणत्याही कलाकाराला मोठ्या स्टेजवर गाण्याची संधी मिळणे अत्यंत आवश्यक असते. पण बहुतेक कलाकार अशा संधीची वाट पहात थांबून राहतात. काही कलाकारांना कधीतरी संधी मिळते तर काही कलाकारांना ती कधीच मिळत नाही. म्हणूनच अशा संधीसाठी थांबून राहण्याचा मार्ग मी कधीच स्वीकारला नाही. इतर आयोजकांवर अवलंबून न राहता मी स्वर-मंचतर्फे माझे कार्यक्रम आयोजित केले. याचमुळे मी ७५० कार्यक्रमांचा पल्ला गाठला आणि पार केला. माझ्या गुणवान विद्यार्थ्यांना स्टेज उपलब्ध करून देण्यासाठी स्वर-मंचतर्फे आम्ही नेहमीच अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत असतो. असाच एक हिंदी गझलचा कार्यक्रम आम्ही ऑक्टोबर २००७ मध्ये गडकरी रंगायतनला केला. माझी विद्यार्थिनी दर्शना घळसासी आणि रोशन खत्री या कार्यक्रमात माझ्याबरोबर गायले. निवेदन धनश्री लेले यांनी केले. संगीतकार कौशल इनामदार, आमदार जितेंद्र आव्हाड आणि दूरदर्शन निर्माते शरण बिराजदार यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती.
-अनिरुद्ध जोशी
Leave a Reply