मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ रोजी झाला.
शिवसेनेच्या इतिहासात बाळासाहेबांप्रमाणेच मनोहर जोशी यांचे स्वतंत्र स्थान आहे. शिवसेनेची स्थापना जून १९६६ मध्ये झाली. १९६७ एप्रिलमध्ये मनोहर जोशी यांनी पक्षसंघटनेत प्रवेश केला. तेंव्हापासून आजपर्यंत ५० वर्षांपेक्षा अधिक काळ शिवसेनेतील चढऊतारांचे ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री ते केंद्रात मंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. प्रचंड गरिबीतूनही त्यांनी केलेला प्रवास, त्यासाठी उपसलेले कष्ट आणि त्यांना मिळालेले यश थक्क करणारे आहे. राजकारणाप्रमाणेच व्यवसायातही यश मिळवून त्यांनी कोहिनूरची उंची गाठली. जोशी यांचे शिक्षण मुंबईत झाले. ते बॅचलर ऑफ लॉ आहेत आणि त्यांनी कला, पदव्युत्तर पदवी घेतली असून मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या विषयात ते पारंगत आहेत. १९६८ मध्ये मनोहर जोशी सर्वप्रथम दादरमधून मुंबई महापालिकेत नगरसेवकपदी निवडून आले. त्यानंतर मुंबईचे महापौर, विधानपरिषद, विधानसभा आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, लोकसभा खासदार, केंद्रीय मंत्रिपद, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा अशी त्यांची राजकीय कारकीर्द बहरली. शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये मनोहर जोशी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले. ते शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री तर ठरलेच, पण राज्याचे पहिले बिगर-काँग्रेसी मुख्यमंत्रीही ठरले.
मनोहर जोशी १० मे २००२ रोजी लोकसभा सभापतीपदी बिनविरोध निवडले गेले ते ४ जून २००४ पर्यंत या पदावर राहिले.
शिवसेना काल-आज-उद्या- हे श्री.मनोहर जोशी यांनी लिहिलेले पुस्तक हे शिवसेना या अफ़ाट संघटनेचे चरित्रलेखन आहे. तसेच मनोहर जोशी यांनी धंदा कसा करावा या हे पुस्तक आपल्या अनुभवावर लिहिले आहे. अशोक चिटणीस यांनी मनोहर जोशी यांच्या जीवनावर महाराष्ट्र कोहिनूर या नावाने चरित्रात्मक आत्मचरित्र लिहिले आहे.
मनोहर जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply