शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा जन्म २५ एप्रिलला झाला.
सरनाईक कुटुंब हे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे. तेथून त्यांचे वडील बाबूराव सरनाईक ४५ वर्षांपूर्वी डोंबिवलीत स्थलांतरित झाले. त्यांचे मूळचे आडनाव हे गांडुळे होते. त्यांनी नंतर ते सरनाईक केले. प्रख्यात मराठी साहित्यिक आणि जेष्ठ पत्रकार प्र. के. अत्रे यांच्या मराठा या दैनिकात सरनाईक यांचे वडील प्रूफ रिडर होते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी काही काळ रिक्षाही चालवली. तरुणपणी त्यांनी अनेक व्यवसाय केले. ते काही काळ अंडाभुर्जीची गाडीही डोंबिवलीत ते लावत होते. १९९७ साली सरनाईक राष्ट्रवादीचे सदस्य झाले आणि त्यांनी सक्रीय राजकरणामध्ये उडी घेतली. ठाण्यातील लोकमान्यनगर परिसरातून ते तीन वेळा पालिकेवर निवडून गेले होते. २००८ मध्ये त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. लगेचच २००९ मधील विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाकडून तिकीट मिळाले आणि ते ठाण्यातून आमदार झाले. आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या वर्तुळात त्यांचा समावेश झाला.
राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मोठे राजकीय नाट्य झाले. शिवसेनेने भाजपपासून फारकत घेतली. त्यावेळी शिवसेनेच्या आमदारांना सुरक्षितस्थळी म्हणून दोन-तीन हॉटेल मध्ये हलविण्यात आले. यासाठीचा खर्च करणाऱ्यांमध्ये सरनाईक यांचा समावेश होता, अशी तेव्हा चर्चा होती. आपल्याला मंत्रीपद मिळेल, या आशेनेच त्यांनी हा खर्च केल्याचे बोलले जात होते. मात्र ते मंत्री झाले नाहीत.
प्रताप सरनाईक यांच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव विहंग असून धाकट्या मुलाचे नाव पूर्वेश आहे. दोघेही युवासेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांचे घनिष्ठ संबंध आहेत. पूर्वेश सरनाईक हे युवासेनेचे सचिव असून युवासेनेच्या कामांमध्ये ते सक्रियपणे सहभागी होतात.
पूर्वेश यांची पत्नी परिशा सरनाईक या ठाणे महानगरपालिकेत नगरसेविका आहेत. त्या प्रभाग क्रमांक २९ चे प्रतिनिधित्व करतात.
विहंग ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष म्हणून प्रताप सरनाईक यांचं नाव १९८९ पासून ठाणे शहरातील अनेक रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये सामील आहेत. विहंग शांतिवन, विहंग गार्डन, सृष्टी कॉम्प्लेक्स, विहंग रेसिडेन्सी, विहंग टॉवर, विहंग पार्क, रौनक टॉवर, विहंग आर्केड आणि रौनक आर्केड असे विहंग रिअल इस्टेटने उभारलेले अनेक रहिवासी प्रकल्प ठाण्यात आहेत. घोडबंदर रोडला मानपाड्याजवळ प्रताप सरनाईक यांचे विहंग्ज इन हे थ्री-स्टार हॉटेलही आहे. विहंग्ज पाम क्लबचीही मालकीही सरनाईक यांच्या विहंग्ज ग्रुपकडे आहे. स्विमिंग पूल, हेल्थ क्लब, जाकूझी आणि स्क्वॅश अशा अत्याधुनिक सोयी या क्लबमध्ये आहेत.
सरनाईक यांचे भाजपशीही कनेक्शन आहे. त्यांचा मुलगा पूर्वेश याची पत्नी म्हणजे माजी मंत्री रणजित पाटील यांच्या कन्या आहेत. रणजित पाटील हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात गृह आणि नगरविकास राज्यमंत्री होते. सरनाईक आणि पाटील हे दोघे व्याही आहेत. काही वर्षांपूर्वी हा विवाह झाला.
प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली संस्कृती युवा प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे वर्तकनगर येथे दहीहंडीचे आयोजन करते. संपूर्ण मुंबई-ठाण्यातून विविध दहीहंडी संघ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीचे आयोजन करण्यात आले नव्हते. ठाण्यातील दहीहंडी उत्सवातून ज्यांनी आपले नाव कमावले त्यात सरनाईक यांचा समावेश आहे.
त्यांनी `कान्हा` आणि `हृदयांतर` या दोन मराठी चित्रपटांची निर्मितीही केली आहे.
प्रताप सरनाईक यांनी अर्णब गोस्वामी, कंगना राणावत या प्रकरणात आवाज उठवला होता. तसेच अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांचा मुद्दाही उचलून धरला होता.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply