पुण्याला ऐतिहासिक परंपरा आहे. याच शिवकालीन ‘पुनवडी’मधील लाल महालात शिवाजी महाराजांचं बालपण गेलं.. तोच शिवाजी महाराजांचा इतिहास अनेक पिढ्यांना वाचण्यासाठी व ऐकवण्यासाठी एका इतिहासाने झपाटलेल्या माणसाचा जन्म, २९ जुलै १९२२ रोजी पुण्याजवळील सासवड येथे झाला.
१९५४ पासून २०१५ पर्यंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावरील हजारों व्याख्यानं देशात व परदेशात दिली. शिवाजी महाराजांचा इतिहास बाबासाहेबांनी अक्षरशः कोळून प्यायलेला आहे.
भारत इतिहास संशोधन मंडळ व अशा अनेक ठिकाणी जाऊन, जुनी कागदपत्रे अभ्यासून त्यांनी ‘शिवाजी महाराज’ या सप्ताक्षरी मंत्राचा अहोरात्र जप केलेला आहे. महाराजांचे सर्व गड व किल्ले पालथे घातलेले आहेत.
इतिहासातील नोंदींप्रमाणे त्या त्या गडकोटांवर जाऊन, त्या दिवसा किंवा रात्री घडलेल्या घटनांचा बाबासाहेबांनी अभ्यास केलेला आहे. कदाचित त्यावेळी, गडांवरचे निर्जिव दगडही सजीव होऊन बाबासाहेबांशी त्या घडलेल्या रोमहर्षक इतिहासाच्या कानगोष्टी करीत असतील.
बाबासाहेबांनी लिहिलेल्या काही ऐतिहासिक पुस्तकांबरोबरच ‘राजा शिवछत्रपती’ या पुस्तकाच्या आजपर्यंत १७ आवृत्त्या निघालेल्या आहेत. सुमारे पाच लाख घरापर्यंत हे शिवचरित्र पोहोचलेलं आहे. त्यांच्या ‘शेलार खिंड’ या कादंबरीवर आधारित ‘सर्जा’ या चित्रपटाची निर्मिती झालेली आहे.
१९८४ साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गरवारे महाविद्यालयात बाबासाहेबांची ‘शिवचरित्र’ व्याख्यानमाला आयोजित केली होती. त्याचे पोस्टर डिझाईन आम्ही केले होते. त्यावेळी हजारोंच्या गर्दीत बसून आम्ही ती व्याख्यानमाला ऐकली. बाबासाहेबांनी श्रोत्यांसमोर शिवाजी महाराजांचा तपशीलवार इतिहास रोमहर्षक शब्दांतून उभा केला. आम्ही धन्य झालो…
त्याच दरम्यान बाबासाहेबांनी ‘जाणता राजा’ भव्य महानाट्य सुरु केलं. रेणुका स्वरुप शाळेच्या मैदानावर आम्ही ते पाहिले. महाराजांच्या जीवनावरील निवडक प्रसंगांवर आधारित, सादर केलेले शेकडो कलाकारांचे, डोळ्यांचे पारणे फेडणारे महानाट्याचे गेल्या २७ वर्षांत १२५० हून अधिक प्रयोग झालेले आहेत. या प्रयोगाच्या उत्पन्नातून बाबासाहेबांनी अनेक संस्थांना लाखों रुपयांची मदत केलेली आहे.
बाबासाहेबांना मिळालेल्या महाराष्ट्र भूषण या सन्मानाबरोबरच दहा लाख रुपयातले फक्त दहा पैसे जवळ ठेवून उरलेल्या पैशात आणखीन पंधरा लाख रुपयांची भर घालून ती सर्व रक्कम कॅन्सर हाॅस्पिटलला त्यांनी दान केलेली आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सुप्रसिद्ध चित्रकार दीनानाथ दलाल यांचे समवेत बसून, शिवराज्याभिषेक हे भव्य चित्र काढण्यासाठी मोलाच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे ते शिवदरबाराचे चित्र अलौकिक, अजोड व अप्रतिम ठरलेले आहे.
आज बाबासाहेबांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. आम्हा पुणेकरांचे, ते एक ‘ऐतिहासिक वैभव’च आहे! आमच्या तीन पिढ्यांनी त्यांच्या तोंडून छत्रपतींचे चरित्र ऐकले, पाहिले. पुढील पिढ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून शिवचरित्र ऐकता, पाहता येईलही. मात्र आम्ही ते ऐकताना जशा आमच्या मुठी वळल्या, तशा नवीन पिढीच्या वळतील की नाही ही शंका आहे. त्यासाठी असे शिवशाहीर बाबासाहेब युगानुयुगे हवेत.
बाबासाहेबांशी माझी भेट ग्राहक पेठेच्या, सूर्यकांत पाठकांनी घालून दिली होती. बाबासाहेबांनी माझी आपुलकीने चौकशी केली. नंतरही त्यांच्याशी भेटी होत राहिल्या. महाराष्ट्रातील दोन बाबांनी शिवाजी महाराजांसाठी आयुष्यभर काम केलं. चित्रतपस्वी भालजी पेंढारकर उर्फ बाबा यांनी शिवचरित्र पडद्यावर दाखवलं, तर शिवशाहीर बाबासाहेबांनी ‘शाई’पेनाने संपूर्ण शिवचरित्र लिहून ते प्रकाशित केले.
शतायुषीच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवणाऱ्या, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना, माझा मानाचा त्रिवार मुजरा!!!
© सुरेश नावडकर.
मोबाईल ९७३००३४२८४
२९-७-२१.
नावडकर सरांचा हा आणखी एक लेख. नेहमीप्रमाणे उत्तम माहिती व ओघवती सरळ सोपी भाषा त्यांचे वैशिष्ठ ह्यात पण दिसून येते.
अनुभवाचा खजिना योग्य रीतीने कशी मांडावा हे शिकण्यासारखे आहे. एकंदरीत उत्तम लेख.