सफेद वालावर जलरंगाने रंगविलेला
रोमचा गणेश (गुरु) मूर्ती
रोम येथील बार्जीयन मुझियम वेलोस्ट्रेज येथील मस्तकावर शिवलिंग
व घंटाधारी द्विभूज गणेश (गुरु) मूर्ती रोम आणि भारतीय संस्कृती ह्यांच्या एकत्रीकरणाचा उत्कृष्ट नमुना आहे. शिवपुत्र, सुर्यपुत्र आणि विघ्नहर्ता म्हणून जगात प्रसिद्ध असलेला श्री गणेश येथे विद्यादायक गुरुस्वामी म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. येथे श्री गणेश गुरु म्हणून ओळखला जातो.
इ.स. १७९१ साली “ब्राम्हविक पद्धती” ह्या लॅटीन भाषेत प्रसिद्ध झालेल्या एका पुस्तकात विद्येचा स्वामी म्हणून ह्या श्री गणेशाचा उल्लेख सापडतो. एका हातात लेखणी व दुसर्या हातात दौत असे द्योतक दाखविले आहे. योगासन पद्धतीप्रमाणे ही मूर्ती पद्मासन घालून बसलेली आहे. मस्तकावर शिवलिंग त्यावर घंटा, कपाळावर नाम व भारतीय पद्धतीप्रमाणे वेदांची लिखाणे. मान सरळ व उंच, मनगट व दंडावर भारतीय पद्धतीप्रमाणे वाळे असून गळ्यात एकही अलंकार किंवा दागिना नाही हे विशेष. डाव्या खांद्यावरून छातीपर्यंत उपवस्त्र, छातीभोवती सर्पांचे वेटोळे असून त्याचा फणा डाव्या बाजूला पसरलेला दिसतो. अशा तर्हेची वैशिष्टयपूर्ण रचना असलेले शिल्प गणेश भक्तांना व संशोधकांना आश्चर्यकारक वाटते.
मूर्तीच्या शरीराच्या मानाने चेहरा फारच मोठा आणि माणसासारखा रेखीव डोळे असून त्यावर रोमन संस्कृतीची छाप आहे. डाव्या कानावर शिवप्रतिक त्रिशूळ असून कान एकंदरीत फार मोठे वाटतात. डोक्यावर किरीट किंवा मुकुट नसून मुकुटाच्या आकाराची गुहा आणि त्यात शिवलिंग व घंटा आहे. ह्या शिवलिंगाला नवीन चंद्र (New Moon) असेही संबोधतात.
एकंदरीत मूर्तीची उंची, डोक्याचा प्रकार आणि भव्यपणा रोमन पद्धतीची जाणीव करून देते. ही मूर्ती संपूर्ण लाकडी असून भौगोलिक वातावरणाचा कसलाही परिणाम ह्यावर झालेला नसून मूळ स्वरुपात ही मूर्ती आज दिसत आहे. अत्यंत दुर्मिळ आश्चर्यकारक गणेश (गुरु) मूर्ती म्हणून रोम येथील हा विद्येचा स्वामी जगात फार प्रसिद्ध आहे.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply