नवीन लेखन...

शिवमहिम्न स्तोत्र – मराठी अर्थासह – भाग २ 

शिवमहिम्न स्तोत्र – मराठी अर्थासह – भाग २ 

अमुष्य त्वत्सेवासमधिगतसारं भुजवनं
बलात्कैलासेऽपि त्वदधिवसतौ विक्रमयतः ।
अलभ्या पातालेऽप्यलसचलितागुष्ठशिरसि
प्रतिष्ठा त्वय्यासीद् ध्रुवमुपचितो मुह्यति खलः ।।12।।

मराठी- तसेच ज्या रावणाच्या हातांना तुझ्या सेवेच्या प्रसादाने प्रचंड बळ मिळाले, त्यानेच जबरदस्तीने तुझ्या निवासात जोर जबरदस्तीचा प्रयत्न केला. त्याच्या मस्तकावर तुझ्या नुसत्या अंगठ्याच्या दाबाने त्याला पाताळातही प्रतिष्ठा लाभली नाही. खरोखर, भरभराट झाली की दुष्ट प्रवृत्तीचा माणूस चुकतोच.

कृपेने लंकेशा भुजबळ तुझ्या लाभ, परि तो
मदाने कैलासा उचलत बळें यत्न करतो ।
दबे अंगुष्ठाने तव, न मिळतो मान वितली   (वितल- सप्तपाताळांपैकी एक)
खलाची ऐश्वर्ये खचितच असे बुद्धि फिरली ॥ १२॥


यदृद्धिं सुत्राम्णो वरद ! परमोच्चैरपि सतीम्
अधश्चक्रे बाणः परिजनविधेयत्रिभुवनः ।
न तच्चित्रं तस्मिन् वरिवसितरि त्वच्चरणयोः
न कस्याप्युन्नत्यै भवति शिरसस्त्वय्यवनतिः  ।।13।।

मराठी- हे (भक्तांना) वर देणार्‍या शंभो, तिन्ही लोकांना आपल्या सेवकांप्रमाणे ताब्यात ठेवणार्‍या, इंद्रादि देवांपेक्षाही अधिक संपत्ती जमवणार्‍या बाणासुराने तुझ्या चरणी माथा टेकला यात त्याच्यासाठी आश्चर्याची गोष्ट काहीच नाही. तुझ्या चरणी डोके टेकल्यावर कोणाची प्रगती होत नाही ?

तिन्हॊ लोकी बाणासुर हुकुम चाले, जमवितो
सुरांपेक्षा जादा मिळकत, परी दंडवत तो ।
तुझ्या पायी, तेणे चकित न कुणी होय जगती
पदी माथा टेके नच मग कशी होत प्रगती ॥ १३ ॥


अकाण्डब्रह्माण्डक्षयचकितदेवासुरकृपा
विधेयस्याऽऽसीद्यस्त्रिनयन विषं संहृतवतः ।
स कल्माषः कण्ठे तव न कुरुते न श्रियमहो
विकारोऽपि श्लाघ्यो भुवनभयभङ्गव्यसनिनः  ।।14।।

मराठी- हे त्रिलोचन शंकरा, (समुद्रमंथनाच्या वेळी) (हलाहल विष बाहेर पडल्याने) सर्व जग अनपेक्षित रीत्या नाशाच्या भीतीने भयभीत झालेले असतांना, देव आणि दानव यांच्यावर कृपा करण्यासाठी ते विष आपल्या कंठात एकत्रित केल्याने (प्राशन केल्याने) तुझा कंठ डागाळला. तो (काळा डाग) तुझे सौंदर्य वाढवीत नाही असे नाही. जगाचे भय दूर करण्याचा वसा असणार्‍यांमधील (एखादी) विकृती स्तुत्यच होय.

निघे एकाएकी विष, सुर तसे दैत्य डरले
हिता विश्वाच्या, तू गिळुन विष कंठात धरिले ।
निळा धब्बा ग्रीवे, सुभग रुप ते का न खुलते?
उखाडे जो भीती, पुसट विकृती स्तुत्य ठरते ॥ १४ ॥


असिद्धार्था नैव क्वचिदपि सदेवासुरनरे
निवर्तन्ते नित्यं जगति जयिनो यस्य विशिखाः ।
स पश्यन्नीश त्वामितरसुरसाधारणमभूत्
स्मरः स्मर्तव्यात्मा नहि वशिषु पथ्यः परिभवः ।।15।।

मराठी- हे शंभो, या देव,दानव व मानव भरलेल्या जगात ज्या विजेत्याचे बाण कधीतरीच आपले नेहेमीचे कार्य न करता परततात, तो (मदन) तुलाही इतर सर्वसाधारण देवांपैकी आहेस असे समजला आणि स्वतःच नामशेष झाला. जितेंद्रियांची मानखंडना हितकर होत नाही हेच खरे !

जगी या दैत्यांच्या, मनुज, सुर यांच्या, कधितरी
जयाच्या बाणांना यश न, अवमान स्मर करी ।  (स्मर – मदन)
तुला कल्पूनीया इतरजन, तो भस्म बनला
बधे ना जो गात्रां, अविनय तयाचा नच भला ॥ १५ ॥


मही पादाघाताद् व्रजति सहसा संशयपदं
पदं विष्णोर्धाम्यद्भुज-परिघ-रुग्ण-ग्रह-गणम्।
मुहुद्यौदौस्थ्यं यात्यनिभृतजटाताडिततटा
जगद्रक्षायै त्वं नटसि ननु वामैव विभुता  ।।16।।

मराठी- खरोखर जगाच्या रक्षणासाठी तू नृत्य करतोस. तथापि, त्या नृत्या दरम्यान होणार्‍या पायाच्या आघातांनी पृथ्वीचा थरकाप होतो, विष्णूचे पद म्हणजे आकाश, जिथे तुझ्या फिरणार्‍या हातांनी ग्रहांचे तुकडे झालेले दिसतात, आणि तुझ्या पिंजारलेल्या जटांच्या झटक्याने स्वर्गाच्या किनार्‍यांची दुरवस्था होते. खरोखर (कधीकधी) (जगासाठी हितकारक) मोठ्या गोष्टीही तापदायक होतात.

जगासी राखाया करिसि तव नृत्या, परि धरा
पदन्यासे कापे, नभभर ग्रहांचाच कचरा ।
करांच्या घेर्‍याने, सुरपुर तटी क्षोभ उठतो     (सुरपुर- स्वर्ग)
जटांच्या आघातें, जनहित कधी त्रास ठरतो ॥ १६ ॥


वियद्व्यापी तारा-गण-गुणित-फेनोद्गम-रुचिः
प्रवाहो वारां यः पृषतलघुदृष्टः शिरसि ते ।
जगद्द्वीपाकारं जलधिवलयं तेन कृतमि
त्यनेनैवोन्नेयं धृतमहिम दिव्यं तव वपुः  ।।17।।

मराठी- पूर्ण आकाशाला व्यापणार्‍या आणि नक्षत्रांच्या तेजाने वाढत्या चमचमणार्‍या फेसाने युक्त (आकाशगंगेच्या) जलाचा प्रवाह, ज्याने या पृथ्वीला वेढून एखाद्या बेटाप्रमाणे केले आहे, तुझ्या मस्तकावर केवळ एका छोट्याशा थेंबाप्रमाणे दिसतो, यावरूनच तुझ्या दिव्य देहाचे माहात्म्य प्रतीत होते.

प्रभा स्वर्गंगेची चमचम नभी फेस पसरे   (स्वर्गंगा- आकाशगंगा)
प्रवाहाने वेढी वसुमति दिसे बेटच बरे ।   (वसुमति- पृथ्वी)
शिरी वाटे छोटे टिपुसच तुझ्या शोभुन दिसे
प्रचीती व्याप्तीची तव मम मनी दिव्यच ठसे ॥ १७ ॥


रथः क्षोणी यन्ता शतधृतिरगेन्द्रो धनुरथो
रथाङ्गे चन्द्रार्कौरथचरणपाणिः शर इति।
दिधक्षोस्ते कोऽयं त्रिपुरतृणमाडम्बरविधि
विधेयैः क्रीडन्त्यो न खलु परतन्त्राः प्रभुधियः ।।18।।

मराठी- त्रिपुरासुरासारख्या गवताला जाळण्यासाठी पृथ्वीचा रथ, त्याला चंद्र-सूर्याची दोन चाके, इन्द्रासारखा सारथी, श्रेष्ठ (मेरू) पर्वत / श्रेष्ठ सर्प (वासुकी) यांचे धनुष्य, ज्याचे हाती चक्र आहे असा (चक्रपाणी) विष्णू बाण, एवढे सगळे अवडंबर कशासाठी ? खरोखर, परमेश्वराची बुद्धी स्वतःच्या विचारानेच चालते, इतरांच्या नाही हेच खरे !

कशाला सामग्री त्रिपुर गवता भस्म करता
धुरे जिष्णू, विष्णू शर, नि शकटा चंद्र सविता । (धुरा– सारथ्याची जागा, जिष्णू– इन्द्र, शकट–गाडा,रथ)
धनू मेरू-सर्पासह, रथ मही, ईश्वर मती
कशी चाले, बुद्धी इतर मनुजां तेथ न गती ॥ १८ ॥ 

टीप- या श्लोकाला संदर्भ शिव पुराण व मत्स्य पुराणातील, शंकराने सर्व देवांच्या साहाय्याने, मेरु पर्वताचे धनुष्य व वासुकीची प्रत्यंचा बनवून त्रिपुरांचा नाश केला त्या कथेचा आहे. तसेच श्रीमद् शंकराचार्यांच्या ‘ चंद्रशेखराष्टका’तही अशाच वर्णानाचा श्लोक आहे त्याची आठवण होते.


हरिस्ते साहस्रं कमलबलिमाधाय पदयोः
यदेकोने तस्मिन्निजमुदहरन्नेत्रकमलम् ।
गतो भक्त्युद्रेकः परिणतिमसौ चक्रवपुषा
त्रयाणां रक्षायै त्रिपुरहर जागर्ति जगताम् ।।19।।

मराठी- हे तिन्ही नगरांचा नाश करणार्‍या शंभो, श्रीविष्णूने तुझ्या पायांवर एक हजार कमळे अर्पण केली, त्यात एक कमी पडले असता त्याने (संख्या पूर्ण करण्यासाठी) आपले एक नेत्र रूपी कमळ वाहिले. हा भक्तीचा आवेग (सुदर्शन) चक्राच्या स्वरूपात दृश्य झाला आणि तो  तिन्ही जगतांच्या रक्षणासाठी जागृत असतो.

तुझ्या पायी पद्मे दशशत हरी एक पडते
कमी, अर्पी नेत्रा कमल म्हणुनी भक्तिपर ते ।
उमाळा भक्तीचा प्रकटत जणू चक्र फिरते
तिन्ही लोकी जागे, सतत जन-सांभाळ करिते ॥ १९ ॥

टीप- विष्णु पुराणानुसार सुदर्शन ही विश्वकर्म्याची निर्मिती असून महाभारतातील उल्लेखानुसार ते अग्नीने कृष्णाला ‘कालचक्र’ म्हणून भेट दिले. शिवपुराणानुसार ते शंकराने विष्णूला वर म्हणून दिले.


क्रतौ सुप्ते जाग्रत्त्वमसि फलयोगे क्रतुमतां
क्व कर्म प्रध्वस्तं फलति पुरुषाराधनमृते।
अतस्त्वां सम्प्रेक्ष्य क्रतुषु फलदानप्रतिभुवम्
श्रुतौ श्रद्धां बद्ध्वा दृढपरिकरः कर्मसु जनः ।।20।।

मराठी- यज्ञ समाप्तीनंतर (यज्ञ संपला तरी) त्याचे फळ देण्यासाठी तू सज्ज असतोस. परमेश्वराच्या आराधनेशिवाय समाप्त यज्ञकर्माचे फळ कसे काय मिळेल ? त्यामुळे यज्ञानंतर फलदानाचे कार्य तू करतोस हे पाहून लोक वेदवचनावर विश्वास ठेऊन यज्ञ करायला उद्युक्त होतात. (सतीने यज्ञकुंडात उडी मारल्यानंतर शंकराने यज्ञाचा विध्वंस केला. तरीही साधकांना हवनाची चांगली फळे देण्यास तो कटिबद्ध आहे असा गर्भितार्थ.)

तुझा ऐसा बाणा फल वितरणा, ध्वंस हवना
नियंत्याच्या पूजेविण फळ कसे लाभत जना ? ।
जनां वाटे खात्री तव फल वितरणें, ही तव कृती
श्रुतीवक्तव्याचा सकल जन विश्वास करिती ॥ २० ॥


क्रियादक्षो दक्षः क्रतुपतिरधीशस्तनुभृताम्
ऋषीणामात्विज्यं शरणद सदस्याः सुरगणाः।
क्रतुभ्रंशस्त्वत्तः क्रतुफलविधानव्यसनिनो
ध्रुवं कर्तुः श्रद्धाविधुरमभिचाराय हि मखाः ।।21।।

मराठी- हे सर्वांच्या आश्रयदात्या शंभो, आपल्या कर्तव्यांमध्ये प्रवीण व सर्व प्राण्यांचा नायक दक्ष हा यज्ञाचा यजमान (होता), ऋषी त्याचे पुरोहित, सर्व देवगण यज्ञाला उपस्थित, (असे असूनही) ज्याला यज्ञाचे फळ देण्याची आवड आहे अशा तू यज्ञाचा नाश केलास. कारण यागाच्या विधींवर श्रद्धा नसताना केलेले याग यज्ञ करणार्‍याच्या नाशास कारणीभूत होतात.

पित्याचे पुष्टीच्या हवन सुरसंगे घडतसे (पुष्टी- दक्षाची एक मुलगी)
ऋषी पौरोहित्या, नृप कुशल, शास्ता प्रविणसे ।
तुला गोडी देण्या हवन-फळ, विध्वंस करिसी
अश्रद्धांची कृत्ये-हवन करिती नाशच कशी ॥ २१ ॥


प्रजानाथं नाथ प्रसभमभिकं स्वां दुहितरं।
गतं रोहिद् भूतां रिरमयिषुमृष्यस्य वपुषा ।।
धनुष्पाणेर्यातं दिवमपि सपत्राकृतममुम् ।
त्रसन्तं तेऽद्यापि त्यजति न मृगव्याधरभसः।। २२।।

मराठी- हे नाथा, लाल हरिणीचे रूप घेतलेल्या स्वतःच्या कन्येशी रममाण होण्याच्या लालसेने काळवीटाचे रूप घेऊन अश्लाघ्य रीतीने गेलेल्या, तू हाती धनुष्य घेऊन (बाण मारून जखमी केलेल्या) आणि वेदनेने त्रस्त झालेल्या ब्रह्म्याला, तू आज सुद्धा व्याधाच्या आवेशाने सोडत नाहीस.

मृगी लाली कन्या, लगट मृग कामार्त शरिरी
करी ब्रह्मा मोहें जुलुम जबरीही तिजवरी ।
पळे स्वर्गी जख्मी तव शर शरीरात घुसता
किराताच्या त्वेषे अजुन खिळवी त्यास पुरता ॥ २२ ॥

टीप- या श्लोकात ब्रह्मवैवर्त पुराण, मत्स्य पुराण, अनेक ब्राह्मण ग्रंथ, श्रीमद् भागवत व इतर अनेक पुराणांमध्ये ब्रह्मा व सरस्वती यांच्या संदर्भात आलेल्या गोष्टींवर आधारित, आकाशात दिसणार्‍या मृगनक्षत्र व व्याधाचा तारा यांच्यावर कल्पनाविलास केलेला आढळतो. या किराताच्या उल्लेखाबरोबर ‘किरातार्जुनीयम्’ मधील अर्जुन व किरात यांच्यातील युद्धाचीही आठवण झाल्याखेरीज रहात नाही.


स्वलावण्याशंसा धृतधनुषमह्नाय तृणवत्
पुरः प्लुष्टं दृष्ट्वा पुरमथन पुष्पायुधमपि ।
यदि स्त्रैणं देवी यमनिरतदेहार्धघटनाद् –
अवैति त्वामद्धा बत वरद मुग्धा युवतयः ।।23॥

मराठी- हे तीन नगरांचा नाश करणार्‍या, वरदायका शंभो, आपल्या सौंदर्याच्या प्रशंसेत (हाती) धनुष्य धरलेल्या मदनाला आपल्या समोर क्षणार्धात जळालेला पाहून सुद्धा, (केवळ), तुझा यम-नियमांनी बद्ध देह अर्धनारीश्वर रूपात संलग्न झाल्याने तू स्त्रीच्या अधीन झालास असे जर देवी पार्वती समजत असेल…. अरेरे तरुण स्त्रिया खरोखर भोळ्या असतात.

स्तुती रुपाची त्या, मदन धनुषा घेउन करी
झणी पाहे त्याची जळुन उरली राखच, तरी ।
असे वाटे, अर्धी तनु म्हणुन तू लंपट असे
अये देवी, छे छे, युवति मन भोळे अति कसे ॥ २३ ॥


श्मशानेष्वाक्रीडा स्मरहर पिशाचाः सहचराः
चिताभस्मालेपः स्रगपि नृ-करोटीपरिकरः ।
अमाङ्गल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलम्
तथापि स्मर्तॄणां वरद परमं मङ्गलमसि ।।24।।

मराठी- हे मदनाचा नाश करणार्‍या शंकरा, स्मशान हे तुझे क्रीडांगण, भूतप्रेते हे तुझे खेळगडी, अंगी चितेतील राखेचा लेप, तसेच गळ्यात मानवी मुंडक्याची माळ असते. तुझे सर्व वर्तन ओंगळ असले तर असू दे, तथापी हे वर देणार्‍या शंकरा, जे लोक तुझी तुला आठवण काढतात, त्यांच्यासाठी तू मंगलच आहेस.

चिता भस्मा अंगी, मसणवट क्रीडांगण तुला
भुते प्रेते साथी, मनुज कवटी माळहि गळा ।
असो भीतीदायी, मन न मम चिंता करितसे
भले त्याचे होई वरद हृदयी आठवतसे ॥ २४ ॥

**********************

— धनंजय बोरकर.

(९८३३०७७०९१)

 

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..