शिवमहिम्न स्तोत्र – भाग ४ मराठी अर्थासह
महेशान्नापरो देवो महिम्नो नापरा स्तुतिः ।
अघोरान्नापरो मन्त्रो नास्ति तत्त्वं गुरोः परम् ।।३५।।
मराठी- सदाशिव सोडून दुसरा (कोणीही श्रेष्ठ) देव नाही. महिम्न स्तोत्राहून अन्य (कोणतेही श्रेष्ठ) स्तुतीस्तोत्र नाही. अघोर मंत्राहून दुसरा श्रेष्ठ मंत्र नाही. गुरू (शिव) पेक्षा श्रेष्ठ असे दुसरे तत्त्व नाही.
सर्वश्रेष्ठ शिव स्थानी, श्रेष्ठ स्तोत्र महिम्न से ।
अघोरापरि ना मंत्र, श्रेष्ठ तत्त्व गुरू असे ॥ ३५ ॥
टीप- शैव उपासकांमध्ये – ‘ॐ अघोरेभ्योऽथ घोरेभ्यः घोर घोरतरेभ्यः सर्वतः सर्व सर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्र रुपेभ्यः’ हा अघोर मंत्र प्रचलित आहे. काही अभ्यासकांच्या मते ‘ ॐ नमः शिवाय ’ हा अघोर मंत्र आहे.
दीक्षा दानं तपस्तीर्थं ज्ञानं यागादिकाः क्रियाः।
महिम्नः स्तवपाठस्य कलां नार्हन्ति षोडशीम् ।।३६।।
मराठी- (गुरूंकडून) घेतलेला उपदेश, (केलेला) दानधर्म, शरीर कष्टवून केलेली तपस्या, तीर्थयात्रा, अभ्यासातून मिळवलेले ज्ञान, होमा हवन इत्यादी कर्मे ह्या सार्या गोष्टी महिम्न स्तोत्र पाठाच्या सोळाव्या कलेच्याही योग्यतेच्या नाहीत.
तपस्या दान वा तीर्थे होम अभ्यास कर्मही ।
पासंगा न पुरे पाठा महिम्नाच्या कलेसही ॥ ३६ ॥
टीप- कला म्हणजे एक सोळांश भाग. चंद्राच्या प्रतिपदा ते पौर्णिमा अशा १५ आणि सोळावी अमावास्या.
कुसुमदशननामा सर्वगन्धर्वराजः
शिशुशशधरमौलेर्देवदेवस्य दासः।
स खलु निजमहिम्नो भ्रष्ट एवास्य रोषात्
स्तवनमिदमकार्षी दिव्यदिव्यं महिम्नः ।। ३७।।
मराठी- ज्याच्या मस्तकी बालचंद्र आहे असा देवांचा देव शंकर. गंधर्वांचा राजा पुष्पदंत त्याचा दास (होता). खरोखर, त्याच्या (शंकराच्या) क्रोधाने (तो पुष्पदंत राजा) आपल्या अधिकारपदापासून पिटाळला गेला. तेव्हा त्याने या अत्यंत दिव्य स्तोत्राची रचना केली.
सुरगण-गवयांचा भूप त्या पुष्पदंता
शशिशिखर शिवाचा क्रोध हो चूक होता ।
नृपपद हटवीले स्थान गेले तयाचे
रचुन शिवमहिम्ना धन्य तो दिव्य साचे ॥ ३७ ॥
सुरवरमुनिपूज्यं स्वर्गमोक्षैकहेतुं
पठति यदि मनुष्यः प्राञ्जलिर्नान्यचेताः ।
व्रजति शिवसमीपं किन्नरैः स्तूयमानः
स्तवनमिदममोघं पुष्पदन्तप्रणीतम् ।। ३८।।
मराठी- जो कोणी मनुष्य हात जोडून आणि एकाग्र चित्त होऊन स्वर्ग आणि मोक्षाचे एकमेव साधन असलेले, पुष्पदंताने रचलेले, स्वर्ग आणि मोक्षाचे अमोघ साधन असलेले हे स्तोत्र पठण करतो, तर किन्नरांकडून स्तुती केला गेलेला तो शिवाच्या जवळ पोचतो.
सुर-मुनि स्तुति चाले, लाभती स्वर्ग-मुक्ती
कर मन जुळवोनी भक्त जे स्तोत्र गाती ।
हयमुख स्तुति गाती, शंभु सन्नीध नेती (हयमुख- घोड्यासारखे तोंड असणारे, तुंबरु, किन्नर)
शिव स्तुति रचली ही भक्तिनें पुष्पदंती ॥ ३८ ॥
आसमाप्तमिदं स्तोत्रं पुण्यं गन्धर्वभाषितम् ।
अनौपम्यं मनोहारि शिवमीश्वरवर्णनम् ॥ ३९ ॥
मराठी- असे हे गंधर्वाने रचलेले (सुरुवातीपासून) शेवटपर्यंत पावन, अनुपम, आनंददायी, शंकराच्या वर्णनाचे स्तोत्र पूर्ण झाले.
पूर्ण झाली स्तुती रम्य, सुरगायक गातसे ।
अतुल्य शिवरूपाचे त्यात वर्णन जे असे ॥ ३९ ॥
त्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपादयोः ।
अर्पिता तेन देवेशः प्रीयतां मे सदाशिवः ।।४०।।
मराठी- ही अशी शब्दरूपी पूजा (मी) भगवान शंकराच्या पायावर वाहिली आहे. या पूजेने तो महेश माझ्यावर संतुष्ट होवो.
शब्दांची ही अशी पूजा वाहिली मी शिवापदी
तेणे संतुष्ट होवो तो भूतनाथ मजप्रती ॥ ४० ॥
तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर ।
यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः ॥४१॥
मराठी- हे शंकरा, तुझे खरे स्वरूप मला ठाऊक नाही. तू कसा आहेस (हेही ठाऊक नाही). तुझे स्वरूप जसे आहे, तशाच तुझ्या रूपाला माझा पुनः पुनः नमस्कार !
तुझे रूप नसे ठावे, कसा आहेस शंकरा ।
आहेस तुजला जैसा, प्रणाम मम साजरा ॥ ४१ ॥
एककालं द्विकालं वा त्रिकालं यः पठेन्नरः।
सर्वपापविनिर्मुक्तः शिवलोके महीयते ॥४२॥
मराठी- जो मनुष्य दिवसातून एकदा, दोनदा वा तीनदा या स्तोत्राचे पठण करील तो सर्व पापांपासून मुक्त होऊन शिवलोकात महान होईल.
एकदा दोनदा किंवा तीनदा स्तोत्र गायने ।
शिवलोकी थोर होई, पापनाशार्थ कारणे ॥ ४२ ॥
श्रीपुष्पदन्त-मुखपङ्कज-निर्गतेन
स्तोत्रेण किल्विषहरेण हरप्रियेण।
कण्ठस्थितेन पठितेन समाहितेन
सुप्रीणितो भवति भूतपतिर्महेशः ।।४३।।
मराठी- – श्री पुष्पदंताच्या मुखकमलातून निघालेले, पापांचा नाश करणारे व शिवाला प्रिय असणारे हे स्तोत्र जो मुखोद्गत करून एकाग्र चित्ताने पठण करील, त्यावर भूताधिपती महादेव प्रसन्न होईल.
श्रीपुष्पदंत वदनांबुज दिव्य गीता
जे दोष नाश करिते, प्रिय भूतनाथा ।
गाती मुखोद्गत तसे प्रतिबद्ध चित्ता
त्यासी प्रसन्न शिवशंकर मुक्तिदाता ॥ ४३ ॥
इति शिवमहिम्न स्तोत्रम् ।
*************************
— धनंजय बोरकर.
(९८३३०७७०९१)
Leave a Reply