नवीन लेखन...

शिवजयंती : माझ्या लहानपणीची आणि आताची आणि आपण सारे..

आज शिवजयंती. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि परचक्र आपल्या इमानदार मावळ्यांच्या साथीने एक हाती थोपवण्याचं यशस्वी धाडस केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आज झाला, त्याची आठवण काढण्याचा आजचा दिवस..

मला माझ्या लहानपणीची शिवजयंती आठवते. लहानपण-कुमारपण अशा उंबरठ्यावरची ती वर्ष. करमणुकीची साधनं मर्यादीत. त्यामुळे वर्षातून एकदा येणारा गणपती आवि दिवाळी यांची आतुरतेने वाट पाहायचे ते दिवस. त्यात शिवजयंतीचीही भर पडली होती. एप्रिल-मेच्या दरम्यान येणाऱ्या शिवजयंतीची मी जानेवारी सुरु झाला, की आतुरतेने वाट पाहायचो. मी राहायचो त्या अंधेरी पूर्वच्या पंपहाऊस येथील कांतीलाल कंपाऊंड भागात शिवजयंती प्रचंड मोठ्या भव्यदीव्य प्रकारे साजरी व्हायची.

पंपहाऊसचं कांतीलाल कंपाऊंड ही तशी सगळी बैठ्या चाळींची वस्ती आणि रहीवाशी बहुतेक सर्व मालवण-कणकवलीकडचे. मिनी सिंधुदुर्ग जिल्हाच तो. मुळात आम्ही मालवणी माणसंच उत्सवी. कशाचाही उत्सव, अगदी एखाद्याच्या मयताचाही, करून आयुष्याचाच उत्सव करण्यात (आणि मग दोन गट करण्यातही) उर्वरीत महाराष्ट्रापेक्षा आम्ही दोन पावलं पुढेच. आणि शिवजयंती ही तर महाराष्ट्राच्या अनभिषिक्त राजाच्या जन्माचा उत्सव, यावेळी तर उत्साह सोड्याच्या बाटलीसारखा फसफसून यायचा. कार्यक्रम काय असावा, मिरवणूक कशी आणि कुठून काढावी, कधी सुरू करावी (कारण ती कधी संपवावी हे कोणच ठरवू शकत नव्हतं, अगदी महाराजही), शिवाजी कोण बनणार, जिजाबाई, संभाजीचं पात्र कोण वठवणार याची चर्चा सुरू व्हायची. अर्थात, ही पात्र दरवर्षीचीची ठरलेलीच असायची. पण चर्चा व्हायचीच. हे ही मालवण्यांचं वैशिष्ट्य. सर्व काही ठरलेलं असलं तरी चर्चा झालीच पाहीजे. उगाच नाही कोकणी माणसं तिरकस, पण बुद्धीमान म्हणत. असो, ठरवा-ठरवी आमच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलांची जबाबदारी असायची. मी व माझ्या वयाचे माझे सवंगडी यांना फाक्त मिरवणूकीतच रस असायचा.

स पहाटे ५-५.३० पासूनच भोंग्यावर महाराजांवरची गाणी, पवाडे(तेंव्हा ‘पोवाड्या’ला ‘पवाडा’ असंच म्हणायचो आम्ही) मोठ्या आवाजात वाजायला सुरुवात व्हायची. तेंव्हा ‘स्पिकर’ नसायचे, लांबुळके भोंगे असायचे. त्याचा आवाज कुठवर जातो, ते ऐकायला काही पोरं सायकलवर जायची. अर्धा-पाऊण किलोमिटरवर भोंग्यातून येणाऱ्या पवाड्याचा आवाज ऐकू येतो म्हटल्यावर तसं सांगत छाती पुढे काढून यायची. अर्थात तेंव्हा न्यायालंयं न्यायदानाचंच काम करायची आणि सरकारं त्यांची कामं. लोकांचं ‘ऐकीव’ आरोग्य, ध्वनीप्रदुषण, भावनांचं दुखावणं वैगेरे सर्व प्रदुषीत गोष्टींचा जन्मही व्हायचा होता. त्यामुळे त्या भोंग्यांच्या आवाजाने कुणाला त्रास वैगेरे झाल्याचं आठवत नाही. उलट एखादी-एखादा रसिक आमच्या लहानमुलांच्या कानात, “त्या लाऊड स्पिकरवाल्याला ते प्रभो शिवाजी राजा परत परत लावावला सांग” असा निरोपही धाडायची/चा. ‘धाडणारी’ असेल तर रगेच हुकूमाची तालीमी व्हायची. हे नंतर त्या वयात गेल्यावर आम्हाला कळायला लागलं, तेंव्हा मात्र ते महाराजांचंच ‘प्रेम’ वाटायचं

भोंग्याच्या आवाज दूरवर जायला हवा असं वाटण्यात एक सुप्त खोच असायची..आमची कांतीलाल कंपाऊंड सर्वच बैठ्या चाळीची दाटीवाटीची वस्ती. परंतू वस्तीच्या किनाऱ्याने नविनच झालेली मुसलमानांची वीस-बावीस इमारतींची वसाहत. तेंव्हा हिंन्दु-मुसलमान वैगेरे गोष्टी आमच्या वयाच्या पोरांच्या मनातही नसायचे, थोड्या मोठ्या वयाच्या मुलांच्या मनात असावेत कारण ‘सर्व तयारी’ झालीय अशी खुन्नसभरी चर्चा दबक्या आवाजात कधीतरी कानावर यायची, पण ती तयारीच असायची, सुरुवात कधीच झाली नाही. उलट एकदा तर एक बांकदार नांकाचा, उंच-गोरटेला पठाण तरूण तर महाराजांची भुमिका मी करणार म्हणून हटून बसला होता. त्याचं मुसलमान असणं नव्हे, तर त्याचं साडे-सहाफुट उंचं असणं त्याच्या महाराज बनण्याच्या आड आलं होतं. अशी गंम्मत होती सारी..!!

मिरवणूकीची वेळ जवळ यायची तसे सर्वांच्याच अंगात महाराज संचारत जायचे. मी, माझे मित्र नरेश खराडे, सुनिल केरकर, विवेक धुरी (हा नंतर खास शिवजयंतीला भिवंडीला जायचा), मख्खन उर्फ सरदार गुरविंदरसिंग आणि आणखी दोन-चारजण असे तयार व्हायचो. आमच्याहून मोठे बाळु धुरी, कादर, वनराज, जेम्स, जाॅर्ज हे पुढे असायचे, ढोल-ताशेवाले प्रॅक्टीसला सुरुवात करायचेये. बॅंन्जो वाजायला सुरुवात व्हायचा. सजवलेले हत्ती-घोडे आलेले असायचे. महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखावा उभा केलेला उघडा ट्रक यायचा. एखाद्या पत्र्याच्या खोलीत महाराजांचा मेकअप सुरू असायचा. दिवस उन्हाळ्याचे, त्यामुळे महाराजांच्या हातात गोल्डस्पाॅटची बाटली आणि एका जागेवर मुश्किलीने बसवून ठेवलेल्या बाल संभाजीराजेंच्या हातात आईस्क्रीम असं मनोरम दृष्य दिसायचं. संभाजी राजांना कंटाळा आला की किंवा शी-शु लागली, की एखादी शेलकी शिवीही देऊन त्याच्या खऱ्या-आईबापाचा उद्धारही केला जायचा. मच्छींन्द्र कांबळींनी आपल्या ‘वस्त्रहरणा’त जी काही कृष्णार्जुनादी पात्रांची धमाल दाखवलीय, ती मी लहानपणीच शिवजयंतीत अनुभवली होती, हे पुढे लक्षात आलं.

महाराजांच्या कुटुंबियांचा मेकअप संपला, की मग महाराज सहकुटूब ट्रकरुपी रायगडावर राज्याभिषेकासाठी जायला निघायचे..बॅंजो-ढेल-ताश्यांचा एकच गजर व्हायचा. ‘जय भवानी-जय शिवाजी’चा एकच जयघोष गर्जायचा. महाराज सिंहासनावर आरुढ झाले की, त्यांना मुजरा करायला एकच गर्दी व्हायची. महाराजांचं सोंग वठवणारा आपलाच कुणीतरी मित्र आहे, हे त्या क्षणापासून पुढचे चारपाच तास विसरलं जायचं. बाल संभाजी, संभाजी राजे झालेले असायचे, त्यांच्या हातातलं आईस्क्रीम दिसायचं नाही. सर्वत्र महारांजांचा वास जाणवायचा. ट्रक नाहीसा होऊन तो रायगडच दिसायचा, बेलबाॅटम घालून वाद्याच्या तालावर घुमणाऱ्या पोरांमधे मनाने कुणी तानाजी, कुणी बाजीप्रभू, कुणी येसाजी, कुणी जीवा महाला तर कुणी साक्षात महाराज झालेला असायचा. शिवकाळ साक्षात समोर उभा राहीलेला असायचा…अंगावरची टी-शर्ट-बेलबाॅटम नाहीशी झालेली असायची आणि डोक्याला मंदील-टोप बांधलेले मावळे साक्षात भाले-बर्च्या-तलवारी उगारून मोहीमेवर निघाल्यासारखे दिसायचे. शिवकाळ अंगात भिनलेली सर्व पोरं मावळे-सरदार-दरकदार होऊन भान विसरून घुमायला लागायची. हे सर्व पुढे पाच-सहा तास न थकता सुरू असायचं..

संपले ते भारलेले दिवस. आता मात्र सारं बदललं. महाराज पक्षा-पक्षांत वाटले गेले. महाराजांची जयंतीही सरकारी आणि गैरसरकारी अशी झाली. आज महाराजांची तारखेने जयंती. सरकारी स्तरावर ही सरकारी पद्धतीने साजरी होते. फार कमी ठिकाणी मिरवणूका निघतात. आणखी काही दिवसांनी गैरसरकारी शिवजयंती साजरी होईल, ती मात्र धामधुमीत. इथेही आम्ही, महाराजांचा वारसा सांगणारांनी, वादाची परंपरा सोडलेली नाही. महाराज आता ‘माझे-तुझे’ असे वाटले गेले आहेत, ते ‘आपले आहेत’ असं कुणाला वाटतंय की नाही अशी परिस्थिती आहे. राजकारणाने महाराजंना हमखास मतं मिळवून देण्याचं साधन केलंय. राजकारणाने जीवनाच्या इतर अंगासारखी इथेही घाण केलीच आहे..!!

महाराजांची जयंती कधी साजरी करावी हा वादाचा मुद्दा होताच कामा नये. मला तर वाटतं महाराजांची जयंती रोज साजरी करावी. ती मनातल्या मनात साजरी करावी. अशी रोज साजरी केलेली शिवजयंती उत्सवी नसावी, तर वागणुकीतून असावी. महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शावर आपण आधुनिक काळात वागतोय की नाही, याचं भान ठेवून आपलं दररोजचं वागणं असलं, की मग ही शिवजयंती रोजच्या रोज साजरी होईल..महाराजांच्या नांवाला आणि इभ्रतीला धक्का लागेल असं आपलं वागणं असता कामा नये याची दक्षता प्रत्येकाने घेतली, क मग वेगळी शिवजयंती साजरी करण्याची गरजच भासणार नाही..

पण असं वागण अवघड आहे आणि म्हणून महाराजांना आपण दोन वेगवेगळ्या दिवसांशी बांधून ठेवलंय की काय असं वाटावं अशी सारी परिस्थिती आहे. असं करून एकदा का ती शिवजयंती उरकली, की मग ३६५-२ असे ३६४ दिवस आपण ‘यवनां’सारखे वागायला मोकळे. (इथे यवन या शब्दाचा अर्थ शत्रू य, मग ते स्वतीय वा परकीय असे कोणीही असोत, उगाच त्यावरून वाद नको.)

महाराज आपल्या तना-मनात भिनावे लागतील. त्यांचा ‘देव्हाऱ्यातला देव’ होता कामा नये, हे आतासं मला आवर्जून वाटायला लागलंय..देव झाला की तो फक्त सणासुदीलाच पुजायचा असतो, एरवी तो देव्हाऱ्यात बंदच बरा असं आपण समजतो..महाराजांचं तसं होता कामा नये.

आपल्या मनात रोज जन्म घ्यावा आणि आपण तो आपल्या वागण्यातून रोज साजरा करावा, असं मला आपलं वाटतं..

बघा जमतंय का ते?

— ©️ नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..