रयतेचे स्वंतत्र सारवभौम स्वराज्य निरमाण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले रायगडावर ६ जून १६७४ रोजी गागाभट्ट यांच्याकडून आपला राज्याभिषेक करवून घेतला. छत्रपती असे बिरुद धारण करून साम्राज्याचे ते अधिपती झाले. राज्याभिषेक सोहळा साठी त्यांनी ३२ मण सोन्याचे सिंहासन बनवुन घेतले. एक मोठा भव्यदिव्य असा राज्याभिषेक सोहळा पार पडला. रयतेला राजा मिळाला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. रायरीचे नाव रायगड असे बदलले. अनेक देशी विदेशी राजे सरदार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
साडेचार हजार राजांना निमंत्रणे गेली. रायगडावर साडेचार हजार राजे जमले. गागाभट्टानि पवित्र साप्तनद्यांचे पाणी आणले.
शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला अनेक देशविदेशातून मंडळी आणि मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात हेन्री ऑक्सएन्डन (Henry Oxenden) हा इंग्रज अधिकारी रायगडावर उपस्थित होता. या हेन्री ऑक्सएन्डन ने राज्याभिषेक सोहळा सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत संपूर्ण सोहळ्याची वरणनात्मक माहिती आपल्या डायरीत नमूद केली होती आणि हीच माहिती शिवरायांच्या राज्याभिषेकाबद्दल एक ठोस पुरावा तसेच अतिशय विस्तृत व सखोल आणि उत्तम माहिती म्हणून इतिहासात महत्वपूर्ण मानली गेली आहे.
हेन्री ने असे नमूद केले आहे कि, राज्याभिषेक सोहळा हा दिनांक ३० मे १६७४ रोजी सुरु केला गेला आणि दिनांक ६ जून १६७४ रोजी संपन्न झाला. या ८ दिवसांत अनेक वेगवेगळे विधी व संस्कार शिवरायांवर व त्यांच्या परिवारावर करण्यात आले.
३० मे १६७४: हेन्री, जेधे शकावली, शिवापूर शकावली आणि समकालीन साधनांत नमूद केले आहे कि, या दिवशी हा सोहळा रायगडावर सुरु झाला. दिनांक ३० मे १६७४ रोजी शिवरायांनी वैदिक पद्धतीनुसार आपल्या सर्व राण्यांशी पुन्हा विवाह केला (ज्या राण्या हयात होत्या त्यांच्याशीच). सोबतच शिवराज्याभिषेक प्रयोगात सांगितल्याप्रमाणे गणेश पूजन तसेच पुण्यावाचन असे विधिवत कार्य संपन्न झाले.
३१ मे १६७४: या दिवशी ऐंद्रीशांती विधी आणि ऐशानयाग असे विधी पार पडले.
१ जून १६७४: या दिवशी रायगडावर ग्रहयज्ञ आणि नक्षत्रहोम असे विधी करण्यात आले.
२ जून १६७४: २ जून १६७४ म्हणजेच हिंदू कालगणनेप्रमाणे मंगळवार, ज्येष्ठ शुद्ध नवमी असा दिवस होता आणि शिवराज्याभिषेक प्रयोगात नमूद केल्याप्रमाणे या दिवशी राज्याभिषेकाशी संबंधित कोणतेही विधी करणे योग्य नसल्यामुळे या दिवशी कोणतेही विधी-संस्कार झाले नाहीत.
३ जून १६७४: शिवराज्याभिषेक प्रयोगात सांगितल्याप्रमाणे या दिवशी नक्षत्रयज्ञ संपन्न झाला.
४ जून १६७४: निवृत्तीयाग हा विधी या दिवशी करण्यात आला.
५ जून १६७४ व ६ जून १६७४: या दोनही दिवशी राज्याभिषेकाचे मुख्य विधी संपन्न करण्यात आले. अनेक नद्यांचे व समुद्राचे जल रायगडावर मागविले गेले होते. या दिवशी अनेक होमहवन करण्यात आले, यजमानांची औदुंबर शाखांचे असं करवून घेतले होते आणि मग होमहवन संपन्न झाल्यावर शिवरायांनी स्नान केले आणि अभिषेक शाळेत दाखल झाले आणि तेथील सिंहासनावर आरूढ झाले. मग ब्राह्मणांनी मंत्रांच्या घोषात शिवरायांवर अभिषेक केले. या अभिषेकावेळी शिवरायांचा हात धरून ब्राह्मणांनी ‘महते क्षत्राय महते अधित्यात महते जानराज्यायेष व भरता राजा सोमोअस्माकं ब्राह्मणानांच राजा’ अशी घोषणा केल्याचा उल्लेख देखील सापडतो. (मराठ्यांचा इतिहास, रा.वि. ओतूरकर)
६ जून १६७४ रोजी शिवाजीराजे भोसले यांचा स्वराज्याचे राजे म्हणून, सोयराराणी साहेब यांचा स्वराज्याच्या महाराणी आणि संभाजी भोसले यांचा स्वराज्याचे युवराज म्हणून अभिषेक करण्यात आला. अनेक सुवासिनींनी त्यांना ओवाळले, अनेक उदकांनी पती-पत्नी दोघांवर अभिसिंचन केले गेले आणि पुन्हा एकदा महाराजांनी स्नान संपन्न केले, वस्त्रालंकार केला आणि धनुर्धारणा करून शिवराय रथारोहणासाठी सज्ज झाले आणि नंतर हत्तीवर बसून त्यांनी मंदिरालाही भेट दिली.
ही घटना भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना होती. या घटनेच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने प्रतिवर्षी शिवराज्याभिषेकदिन विविध उपक्रम किल्ले रायगडावर साजरे केले जातात. पण या वर्षी करोना मुळे मोजक्या लोकांच्यात शिवराज्याभिषेकदिन साजरा केला गेला.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply