नवीन लेखन...

शिवरंजनी

” शिवरंजनी ” हा मुळातच राज कपूर, शंकर -जयकिशन, लता,मुकेश मंडळींचा आवडता राग ! यातल्या रचना भेदक असतात. “संगम ” (१९६४) मधील “ओ मेरे सनम” हे गाणे याच घराण्यातील !

अतिशय इंटेन्स स्वभावाच्या ( “राजा हिंदुस्थानी ” मधील अमीर त्याच्या जवळपास जातो. आणि ” डोंबिवली फास्ट “मधील संदीप कुलकर्णीही!) राज कपूरला सापडलेल्या एका चिट्ठीमुळे उध्वस्त झालेलं दाम्पत्य नातं आणि ते शिवण्याचा पराकोटीचा प्रयत्न करणारी वैजयंतीमाला ही या गाण्याची पार्श्वभूमी ! सुरुवातीच्या आलापीने लता गाण्याचा टोन सेट करते आणि पुढे काहीतरी ” मिस “व्हायला नको या विचाराने आपण सरसावून बसतो.

तिच्या क्षमायाचनेला राज दाद देत नाही त्यावरून त्याचं खोलवर घायाळ होणं भिडतं. जी माणसं पराकोटीचं प्रेम करतात ती दुखावल्यावर वेळप्रसंगी नात्यांपासून खूप दूरही जाऊ शकतात.

भलेही ती ” दो जिस्म मगर एक जान हैं हम
एक दिल के दो अरमान हैं हम ” सारखे आर्जवाचे दाखले देत असते पण आहत झालेला “निळ्या डोळ्यांचा जादुगार ” तिच्याकडे असा कटाक्ष टाकतो की तिला जाणवतं – साऱ्या प्रार्थना निष्फळ आहेत. पण तिचंही त्याच्यावर आत्यंतिक प्रेम असल्याने ती प्रयत्न सोडत नाही.

” जिस दिन से हुए एक दूजे के
इस दुनिया से अनजान है हम !”

असा भरवसा देउन बघते. पण तो तिला बधत नाही उलट

” सुनते हैं प्यार की दुनिया में
दो दिल मुश्किल से समाते हैं
क्या गैर वहाँ अपनों तक के
साये भी न आने पाते हैं
हमने आखिर क्या देख लिया
क्या बात है क्यों हैरान है हम ” सारखी उत्कट समज देतो.

मग आपलं अभिन्नत्व अधोरेखित करण्यासाठी ती समजूत काढायचा प्रयत्न करते –
” मेरे अपने, अपना ये मिलन
संगम है ये गंगा जमुना का
जो सच है सामने आया है
जो बीत गया एक सपना था
ये धरती है इन्सानों की
कुछ और नहीं इन्सान हैं हम ”

जे घडून गेलं ते स्वप्न होतं असं मानायला सांगते. वरील शेवटच्या दोन ओळी मानवाच्या स्वभावाच्या भाष्यकार आहेत. हे विश्व माणसाचं आहे,आपणही माणसं आहोत आणि माणसं चुका करणारच !आपण काही न चुकणारे देव नाही.
तरीही जखमा भरत नाहीत तेव्हा हताश होउन ती आपल्या भात्यातला शेवटचा बाण काढते – नृत्य !

वैजयंतीमाला- नृत्यातील शेवटचा शब्द ! पडदयावर फार कमी नायिका तिच्या जवळपास (नृत्याच्या संदर्भात) जाउ शकतात ( मला आवडलेले दोन अपवाद – “गाईड” मधील वस्तीवरचं वहिदाचं बेभान नृत्य आणि “जाग उठा इन्सान” मधील श्रीदेवीचं पावसातील नृत्य )

गम्मत म्हणजे पार्टीतील कोणालाही या दोघांच्या घालमेलीची सुतराम कल्पना नसते. तिला आग्रह होतो -ती सुरुवातीला नकार देते. तिची मनःस्थिती राजला माहीत असल्याने ती त्यालाही विनविते. पण तो जखमेवर मीठ चोळत तिचा (एकमेव )आधार निर्दयपणे काढून घेतो. आता तिला स्वतःची बाजू मांडण्यासाठी शैलेंद्रच्या शब्दांशिवाय कोण असणार ? पण तेही तोकडे पडताहेत पाहून ती नृत्य करते. त्यातील बेभानपणा पाहून तिच्या पडझडीची थोडी कल्पना राज कपूरलाही येते आणि तो पुढे येऊन तिला सावरतो. शेवटी (कधीकाळी ) जीवापाड प्रेम केलं असतं ना ?

झाली एवढी शिक्षा पुरे असाही कदाचित विचार त्यामागे असावा किंवा “जनाची ” लाजही असू शकते.

हे दर्दभरं गाणं कितीतरी वादळं भेटवून जातं. नातं /प्रेम /अविश्वास/ कबुलीजवाब/मनधरणी /क्षमायाचना किती किती भिडवून जातं.

वेदना हा ज्याच्या स्वराचा स्थायीभाव होता तो मुकेश आणि जगातील कोठलीही भावना आपल्या स्वरयंत्रातून लीलया काढू शकणारी लता अशी जोडगोळी मिळाली की शंकर -जयकिशनचं काम सोप्प होऊन जातं आणि एक अजरामर अनुभव आपल्या खात्यावर जमा होतो.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..