महाराष्ट्रामध्ये विविध कारणांसाठी एकत्र जेवणावळींची प्रथा तशी खूप जुनी ! घरातील शुभकार्य,देवाचा सार्वजनिक उत्सव यापासून ते अगदी मृत व्यक्तीचे तेरावे अशा कारणांसाठी जेवणावळी होत असत.बरेचदा या जेवणावळी जातीनिहाय, कुटुंबनिहायसुद्धा असायच्या . स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समाजातील जातीयता मोडण्यासाठी समाजातील सर्व जातींच्या लोकांबरोबर, पूर्वी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांच्या एकत्र जेवणावळीही केल्या.७०/ ८० वर्षांपूर्वी अशा जेवणावळीत भांड्यांचा आवाज, एकमेकांशी कुजबुज, यजमानांचा आवाज यापेक्षाही एक वेगळा आवाज हळूहळू घुमू लागला. जेवण सुरु असतांना देवाचे संस्कृत किंवा मराठी श्लोक म्हणणे सुरु झाले. एकावेळी ३०० / ४०० लोकांच्या पंगतीला ( माईकशिवाय ) स्पष्टपणे ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात असे श्लोक म्हणणे हे एक कसब होते. मग तर असे श्लोक म्हणण्याची जुगलबंदी सुरु होई. लग्नात मुलीकडच्या माणसांनी श्लोक म्हटल्यावर, मुलाकडे कुणीतरी आणखी चांगला / वेगळा श्लोक आणखी मोठ्याने म्हणत असे. नंतर या श्लोकात नर्म विनोदी प्रकारही आले.
उदा. ” गोविंद गोपाळ हे दोघे बंधू, जेवीत होते दहीभात लिंबू ।
जेवता जेवता चमत्कार झाला, पानात उंदीर मुतून गेला ।।
माझे काका कै. नरहरी भार्गव करंदीकर ( जन्म १९१७ ) हे एक पारंपारिक रचना अत्यंत खड्या आवाजात म्हणत असत. ४०० माणसांना त्यांचा प्रत्येक शब्द ऐकू जात असे. सर्व ज्येष्ठ मंडळींमध्ये त्यांचे ” नरू ” हे नाव फार प्रसिद्ध होते. लग्नात आमचा हा ” नरू ” जर मुलीच्या बाजूने म्हणणार असेल तर मुलीकडच्या मंडळींची कॉलर टाईट असायची. त्याकाळी सरकार दरबारी अर्ज करण्याची एक विशिष्ट भाषा असे. जेवणावळीतील अनेक पदार्थांची नवे गुंफून तयार केलेला हा अर्ज, तेव्हां लोकांना खूप आवडत असे. सुमारे ७० / ७५ वर्षांपूर्वीचा हा अर्ज, तत्कालीन अभिरुचीमध्ये मजेदार वाटत असे. माझ्या नरूकाकांना यासाठी चक्क ” वन्स मोअर ” ही मिळत असे.
हा अर्ज मुद्दाम सर्वांसाठी देत आहे —
मेहेरबान रावसाहेब श्रीखंडशास्त्री,केशरीभात, तालुके गुपचूप, जिल्हा जिलबी,यांचे हुजुरांस, अर्जदार शिरापुरी बिन करंज्या अनरसे, राहणार खाजा परगणा,तूप साजूक, यांचा विनयपूर्वक ऐसाजे. मौजे बासुंदी येथील बेसन लोकांनी दळ्याची चोरी केली. त्याची चौकशी मांडे साहेबांस करावयास सांगावी. तुमचे कोतवाल मेतकूटसाहेब यांस,चटणी सेशनी पाठवून, फेणीबाईस समन्स धाडून साक्षीकरीता वरचेवर येण्याचे करावे. मध्यंतरी तिळाची चटणी,ओल्या मिरच्यांचे तिखट,कोरड्या मिरच्या गडबड करू लागल्यास घिवर शिपायास चाबुकस्वाराचा पोशाख देऊन त्याचा बंदोबस्त करावयास सांगावे. त्याचे चवीस काही कमी झाल्यास मठठे साहेबांना साक्ष ठेवून,
लाडूभट्टावर हल्ला करून उदरनिर्वाहाची केस पुरी करावी. मेहेरबानांस जाहीर व्हावे.
सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
-मकरंद करंदीकर.
रसाळ लिंबू परिपाक त्याचा
पोटात घ्यावा रस पिंपळीचा
या पुढील दोन ओळी आहेत
नमस्कार.
दोन्ही भाग वाचले. माज्या लहानपणच्या काळाची आठवण जागी झाली.
– आपण जें ‘गोविंद गोपाळ हे दोघे बंधू’ हें पद्य दिले आहे, त्याच्या दुसर्या ओळीचा आपण दिलेला अंतिम अर्धा भाग हें ‘विडंबन’ आहे. तो मूळ भाग असा – ‘साक्षात गोचिंद भेटून गेला’ .
– पहिल्या ओळीचा अंतिम अर्धा भाग, तुम्ही लिहिला आहे त्याचप्रमाणें आम्हीही म्हणत असूं – म्हणजे ‘जेवीत होते दहीभात लिंबू’.
परंतु, माझी दिवंगत पत्नी, जिचें मूळ कोंकणातील होतें. तिच्या अनुसार, ते लोक ( म्हणजे तिच्या माहेरकडले) हा भाग – ‘जेवीत होते वरणभातलिंबू’ असा म्हणत, ( तिचें म्हणणें असें की, दहीभाताबरोबर लिंबू खाल्ले जात नाहीं, पण वरणभातावर लिंबू ही रूढ पद्धत आहे. ). असो.
– जुन्या आठवणी जाग्या केल्याबद्दल पुनश्च धन्यवाद. – सुभाष स नाईक. मुंबई