नुकतीच वयाची पंचवीस वर्षे पूर्ण केली होती त्याने. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून आता जॉब मध्ये देखील तो स्थिर स्थावर झाला होता. त्याच्या आई-वडिलांना आता त्याच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात करायची होती. स्थळ बघायला सुरुवात करण्याआधी वडिलांनी मित्रत्वाच्या भावनेने त्याला एकदा विचारून घेतले की त्याच्या मनात कोणी आहे का? मुळात शांत स्वभावाचा असणारा तो लहानपणा पासूनच काहीसा अबोल होता. महाविद्यालयीन जीवनात देखील फार क्वचित पणे त्याने एखाद्या मुलीशी संवाद साधला असेल. मनात कधी कोणाबद्दल प्रेम भावना उमलल्या नाही असे नाही पण त्या कधी मनाचे दरवाजे उघडून व्यक्त देखील झाल्या नाही. अबोल व्यक्तीचे डोळे खूप बोलके असतात असे म्हणतात. वडिलांनी त्याच्या डोळ्यामधील उत्तर शोधून त्याच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात केली. लवकरच त्याचा कांदा-पोहे कार्यक्रमाचा योग येणार होता. त्याच्यासाठी एक चांगले स्थळ आले होते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होऊन ती देखील जॉब करत होती. ओघाने दोघेही जण एकाच शहरात जॉब करत होते. दोघांच्याही पालकांनी एकमेकांशी संवाद साधला. पत्रिकेचे ३६ गुण जुळत होते त्यांचे. पालकांनी एकमेकांशी संवाद साधल्यानंतर कांदा-पोहे ऐवजी कॉफीचा प्रस्ताव पुढे आला कारण मुलगा आणि मुलगी दोघेही एकाच शहरात होते. पत्रिकेचे छत्तीस गुण जुळले आहेत त्यामुळे मुलगा आणि मुलगी आधी एकत्र भेटले आणि त्यांची मने जुळली तर पुढे सविस्तर चर्चा करूया असा कॉफी प्रस्तावा मागील मूळ हेतु होता. एखाद्या मुलीसोबत त्याच्या आयुष्यातली ही पहिलीच कॉफी होती. कॉफी काय किंवा कांदा-पोहे काय आयुष्याच्या जोडीदार निवडीबद्दल तो प्रथमच कोणालातरी भेटणार होता. प्रत्येक्षात कॉफी भेटीचा योग येण्याआधी गेल्या काही दिवसांपासून वधु वर सूचक मंडळाच्या वेबसाईटवर अनुरूप प्रोफाइल बघणे आणि अपेक्षांचे वाचन करणे त्याच्याकडून सुरू होते. आयुष्याच्या जोडीदारा कडून नेमक्या काय अपेक्षा असाव्या याचा काही ठराविक विचार त्याच्या मनात न्हवता. बघता क्षणी क्लिक व्हावे, विचारांचे सुर जुळावे एव्हढी कल्पना मनात मांडून तो तिला भेटायला गेला. ओघाने तिच्या आयुष्यातील देखील हा पहिलाच कांदा-पोहे म्हणजेच कॉफीचा कार्यक्रम होता. दोघांच्या व्यक्तिमत्त्वातील शांत आणि काहीसा अबोल पना देखील सारकाच भासत होता. पहले आप पहले आप करत दोघांचा परिचय झाला, कॉफी पण मागवून झाली, एकमेकांच्या कुटुंबा बद्दल पण चर्चा करून झाली. मुळ चर्चा राहिली होती ती आयुष्याच्या जोडीदाराकडून असणाऱ्या अपेक्षांची. बघता क्षणी क्लिक व्हावे, विचारांचे सुर जुळावे एव्हढी कल्पना मनात मांडून जसा तो तिला भेटायला गेला होता तसेच हीच अपेक्षा मनात मांडून ती पण त्याला भेटायला आली होती. तरीही तिने पुढाकार घेऊन एक माफक अपेक्षा बोलून दाखवली की मुलगा डाऊन टू अर्थ असावा. हीच अपेक्षा त्याने देखील बोलून दाखवली. दोघांच्या चर्चेने डाउन टु अर्थ अपेक्षेला केंद्रस्थानी आणले होते. दोघानाही ही अपेक्षा सविस्तर पणे समजून घ्यायची होती. पण ही अपेक्षा सविस्तरपणे न तिला सांगता येत होती न त्याला. कारण मुळातच दोघानाही डाउन टु अर्थ चा नेमका अर्थच माहीत न्हवता. भेटीला येण्याआधी दोघांनीही वधु वर सूचक मंडळाच्या वेबसाईटवर वाचलेल्या अपेक्षांमधून एक सर्वसाधारण अपेक्षा निवडली होती आणि आपल्या पहिल्या भेटीत व्यक्त केली होती. कळत नकळत केलेला पराक्रम दोघानाही एकमेकांसमोर मान्य करायची वेळ आली. देव जेव्हा पत्रिकेचे ३६ गुण जुळवतो तेव्हा बहुदा व्यक्तिमत्त्वाचे पण गुण जुळवत असणार. स्थळ शोधण्यापासून ते प्रत्यक्ष भेट होईपर्यंत दोघांचेही बहुतांश व्यक्तिमत्व गुण सारखेच निघाले होते. कॉफी संपली होती आणि झालेल्या फजिती नंतर चर्चा पण संपवायची वेळ आली होती. डाऊन टु अर्थ चा नेमका अर्थ काय हा प्रश्न मनात घेऊन दोघांनीही एकमेकांचा निरोप घेतला नाही तर पळ काढला होता. डाऊन टु अर्थ चा खरा अर्थ असतो ज्याने यशाचे शिखर गाठूनही पाय जमिनीवर ठेवलेत. ज्या व्यक्तीच्या यश आणि प्रसिद्धीला कुठल्याही प्रकारचा गर्व चिकटलेला नाहीये. कॉफी शॉप मधून पळ काढण्याआधी बॅकग्राऊंड मध्ये एफएम रेडिओ वर वाजणारे “छन से जो तुटे कोई सपना, जग सूना सूना लागे” हे गाणे त्यांनाच समर्पित झाल्याची भावना त्यांना मनोमन जाणवली. पण अंत बरोबर नसेल तो पिक्चर कसला? पिक्चर अजून खरोखर बाकी होता. दोन दिवसांनंतर एका चहाच्या छोट्या टपरीवर परत त्यांची योगायोगाने भेट झाली. नशिबाचा भाग म्हणजे या दोन दिवसात दोघांनीही आपापल्या घरी अंतिम निर्णय अजुन कळवला न्हवता. खरे तर स्थळ बघण्यापासून ते चहाच्या टपरीवर परत भेट होईपर्यंत त्यांच्यात सगळच मॅचिंग मॅचिंग होते पण दोघानाही ते व्यवस्थित पणे व्यक्त करता येत न्हवते. दोघांच्याही स्वभावातील साधा, सरळ आणि शांतपना एकमेकांना क्लिक करून गेला होता पण तो व्यवस्थित पणे व्यक्त होण्या ऐवजी दोघांनीही गोंधळ निर्माण करून ठेवला होता. बहुदा हाच गोंधळ दूर करण्यासाठी देवाने त्यांची परत भेट घडवुन आणली होती. जे त्यांना कॉफी सोबत व्यक्त करता आले न्हवते ते कटिंग चहा सोबत व्यक्त करायची संधी परत एकदा मिळाली होती. गेल्या दोन दिवसात त्या दोघांनी फक्त डाऊन टु अर्थ चा अर्थ शोधला न्हवता तर वास्तववादी आणि भावनिक अपेक्षा अशा दोन्ही पण गोष्टींचा सारासार विचार करून ठेवला होता. त्याच अपेक्षा त्याने आज स्वतः पुढाकार घेऊन तिच्या समोर मोकळे पणाने व्यक्त करून दाखवल्या. त्या व्यक्त करण्यासाठी त्याने फक्त स्वतःमध्ये बळ निर्माण केले न्हवते तर तिला पण बळ देऊन बोलते केले होते. दोघांच्याही आवडी निवडी, आशा-आकांक्षा एकमेकांना अनुरूप निघाल्या होत्या. कदाचित यामुळेच त्यांचे ३६ गुण जुळले होते आणि परत भेटीचा योगही आला होता. दोन दिवसाखाली अर्ध्या तासात संपणाऱ्या कॉफीने आज कटिंग चहा संपवण्यासाठी दोन तास लावले होते. क्लिक झालेल्या जोडीदारासोबत आयुष्याचा अल्बम सजवण्याचा निर्णय त्यांनी घरच्यांना कळवला. पहिल्या भेटीत झालेल्या गोंधळाच गुपित मात्र त्या दोघांनी एक गोड आणि गमतीदार आठवण म्हणून त्या दोघातच कायम स्वरुपी जपून ठेवले.
लेखक : राहुल बोर्डे
ई-मेल : rahulgb009@gmail.com
Leave a Reply