आता पुन्हा एकदा कृष्णविवरात काळ्या मांजराचा शोध
आता पुन्हा एकदा मिटत जाणाऱ्या पानात तारखांचा शोध
आपल्याच प्रत्येक चुकलेल्या खेळीला कुठे हक्काचा खांदा
कापलेल्या दोराची शिदोरी स्वर्गाला मिठीसाठी शिडीचा शोध
आयुष्याचा सारीपाट आणि डावास सुरुवातीस फितूर फासे
प्रत्येकाचं वेगळे महाभारत नि स्वतःसाठी कवचकुंडलाचा शोध
प्रत्येकाचा तळहात रेघ नि रेघ असते नियतीशी स्वतंत्र करार
गुलामांना अधिकार मृत्युपत्रावर सहीचा अबोध दैवी असा शोध
कुणाचे हात कुणा हाती किती वेळ नि नंतर हुंदके किती काळ
न संपणाऱ्या प्रवासात वेताळाच्या पाठीवरला नव्या गोष्टीचा शोध
मला नाही सोस कि माझ्या गाण्याला दाद देत कोसळावा आषाढ
कवितेच्या रानफुलात नांदावा ईश्वर माझ्या मुक्या आसवाचा शोध
— रजनीकान्त