नवीन लेखन...

शोधा म्हणजे सापडेल

मुख्य रस्ता आणि रेल्वे स्थानक यांना जोडणारी एक चिंचोळी गल्ली.
गल्लीच्या दुतर्फा वेगवेगळी दुकानं.
सुरवातीला वडापाव, दाबेली, सँडविच.
मग एखादं झेरॉक्सचं दुकान.
मध्येच एक मेहेंदी काढण्याचं प्रशस्त दालन.
बाजूला कानातल्या गळ्यातल्याचं दुकान.
लागून एखादी चहाची टपरी.
पुढे स्टेशनरीचं दुकान.
शिवाय पर्स, अत्तर, मोबाईल कव्हर आणि बरंच काही.
विविध प्रकारची एक से एक दुकानं.
त्याची नोकरीनिमित्त स्टेशनवर जायची-यायची वेळ ठरलेली.
सकाळी जाताना नेहमीच ट्रेन पकडायची लगबग असायची.
त्यामुळे त्या गल्लीतून अक्षरशः पळतच जावं लागायचं.
तेव्हा दुकानांत सुद्धा सकाळच्या तयारीची, मांडामांडीची गडबड असायची.
तो संध्याकाळच्या वेळेस परतायचा ती वेळ मात्र धंदा अगदी तेजीत असण्याची.
त्यामुळे तेव्हा सगळी दुकानं आणि एकूणच गल्ली एकदम गजबजलेली.
असाच त्याचा आठवड्यातला एक सामान्य दिवस.
आज नेहमीपेक्षा तास दोन तास लवकर घरी यायचं ठरवलं होतं.
मस्त काहीतरी चमचमीत खात टीव्ही वगैरे बघत बसायचं निवांतपणे.
तसं बायकोला सांगूनही ठेवलं होतं.
खरं तर कोणाचाही वाढदिवस, कुठला कार्यक्रम वगैरे काहीही नव्हतं.
ठरलेल्या दिनक्रमाचा थोडा कंटाळा आला होता हे नुसतं निमित्त.
केवळ मनात आलं म्हणून लवकर घरी यायचं होतं हेच खरं.
एकदम आली लहर केला कहर, मेरी मर्जी.. तसंच काहीसं.
पण ऑफिसमधून निघणार इतक्यात एका महत्वाच्या मीटिंगचा निरोप आला.
सगळं मुसळ केरात .. अन् नुसता त्रागा.
लवकर निघण्याचा मानस असताना झालं मात्र उलटंच.
मीटिंग लांबली आणि निघायला नेहमीपेक्षा अडीच तास उशीर.
येतानाच्या ट्रेन प्रवासात फक्त चिडचिड आणि नशिबाला दोष देणं सुरू होतं.
“ कधी एक दिवस लवकर जाऊ म्हंटलं तर कसलं काय ? “
“ कसला मनासारखा आनंद म्हणून घेता येत नाही .. नशिबच वाईट “…. वगैरे वगैरे
त्याच नादात स्टेशनवर उतरून घराच्या दिशेने चालू लागला.
वाटेत त्या चिंचोळया गल्लीत शिरला.
आज उशीर झाल्याने ती गल्ली थोडी वेगळी भासत होती.
नेहमी सारखा गजबजाट, कलकलाट नव्हता.
काही दुकानं पूर्ण बंद झाली होती तर काही बंद होण्याच्या मार्गावर होती.
खाण्यापिण्याची दुकानं अजूनही सुरू होती पण तिथलीही गर्दी कमी होती.
तो एकेक दुकान सहज न्याहाळत चालला होता.
चालता चालता त्या मेहेंदी काढण्याच्या दुकानापाशी आला.
तिथलं दृश्य बघून त्याची पावलं आधी रेंगाळली .. मग आपसूक थांबली.
त्याचं दुकान खरं तर बंद झालं होतं पण तरीही तो मेहेंदी काढत होता.
समोर २-४ चिमुकल्या मुली बसल्या होत्या.
हसऱ्या चेहऱ्याच्या आणि गोंडस.
पण अगदी कळकट मळकट कपड्यातल्या.
मुलींचे चेहरे ओळखीचे वाटले म्हणून निरखून पाहिल्यावर लक्षात आलं.
एरव्ही दिवसा त्या मुली स्टेशन जवळच्या सिग्नलवर फुलं-गजरे वगैरे विकायच्या.
त्यातली एक मुलगी मेहेंदी काढून घेत होती.
बाकीच्या नंबर लावून , कुतुहलाने बघत तिच्या आजूबाजूला बसल्या होत्या.
काही क्षण तिथे रेंगाळल्यावर त्याला सगळा अंदाज आला.
दिवसभर मेहेंदी काढून प्रत्येक कोन मध्ये थोडी थोडी मेहेंदी शिल्लक राहिलेली.
शेवटच्या कोन मध्ये जरा जास्तच.
उरल्या सुरल्या मेहेंदीने तो त्या मुलींच्या इवल्याश्या हातावर कलाकुसर करत होता.
“दुकान बंद झाल्यावर या!” असं त्यानेच कदाचित सांगितलं असेल.
कुठलेही पैसे न घेता तो मेहेंदी काढत होता हे तर स्पष्टच होतं.
पण तरीही त्या मुलींना नेहमीच्या इतर ग्राहकांप्रमाणेच वागणूक देत होता.
त्यांना खाली जमिनीवर बसवलं नव्हतं किंवा दुकानाबाहेर उभं वगैरेही केलं नव्हतं.
गादी असलेल्या छोट्या सोफा स्टूलावर इतरांप्रमाणेच मानाने बसवलं होतं.
अतिशय प्रसन्न मनाने आणि तन्मयतेने तो मेहेंदी काढत होता.
दिवसभराचा कामाचा थकवा आहे म्हणून कुठेही कटकट नाही.
उशीर झालाय म्हणून उगीच चार फराटे मारून उरकून टाकणं नाही.
आणि उपकार केल्याचे भाव तर अजिबातच नाहीत.
उलट, मेहेंदी काढता काढता मजा मस्करी करत त्यांना हसवत सुद्धा होता.
त्या निरागस लहानग्या सुद्धा तितक्याच उत्साहाने मेहेंदी काढून घेत होत्या.
गप्पा मारत होत्या. दंगामस्ती, कल्ला करत होत्या.
कमालीचं अप्रूप, झालेला आनंद आणि मिळालेलं समाधान असा त्रिवेणी संगम त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
याला त्या दोघांचही खूप कौतुक वाटलं.
एकीकडे तो मेहेंदी काढणारा…
त्याच्याकडे जे आहे त्यातून त्याला जितकं देणं शक्य आहे तितकं निःस्पृहपणे वाटून तो दुसऱ्याला आनंद देत होता.
शिवाय समोरच्यांना झालेला आनंद बघून स्वतःही तितकाच उल्हासित होत होता.
तर दुसरीकडे त्या चिमुकल्या…
आपली प्रतिकूल परिस्थिती असूनही जे आहे त्यात आनंद मानत होत्या.
त्यांच्या चेहऱ्यावर कसलीच तक्रार नव्हती.
आलेला क्षण अतिशय प्रसन्नतेने जगत होत्या.
ते सगळं चित्र पाहून त्याच्या मनातला आवाज कानात घुमू लागला.
“आपल्याला तशी कसली ददात नसूनही आपण गेले काही तास आपल्या नशिबावर आगपाखड करत होतो!”.
“आयुष्यात मनासारखा आनंद मिळत नाही अशी मुक्ताफळं उधळत होतो!”.
“अन् इथे हे सगळे कित्येक गोष्टींपासून वंचित असूनही अतिशय समाधानी आहेत!”.
“सगळ्याचा मनमुराद आनंद घेत आहेत!”.
त्याची सगळी चिडचिड एका क्षणात संपली.
एकदम मोकळं, हलकं वाटलं.
मनात अप्रत्यक्ष आलेल्या नकारात्मकतेवर त्या मेहेंदीने सकरात्मकतेचा रंग चढवला.
त्याच्यातही आता नवचैतन्य संचारलं.
प्रसन्न मुद्रेने आणि समाधानी अंतःकरणाने तो त्या गल्लीतून बाहेर पडला.
गोड शेवट झालेल्या सिनेमाची शेवटची फ्रेम मनात साठवून प्रेक्षक बाहेर पडतो ना?
अगदी तस्सच.
आता त्याच्या मनात एकंच विचार घुटमळत होता.
“आनंद तर सर्वदूर पसरलेला आहे!”.
“फक्त आपण शोधायला हवा!”.
“जसा त्या मेहेंदी काढणाऱ्याने शोधला!”.
“जसा त्या चिमूकल्यांना गवसला!”.
“आणि आता मलाही मिळाला!”..
“तसा सगळ्यांनाच सापडेल!”.
“शोधा म्हणजे सापडेल!!”.
“शोधा म्हणजे सापडेल!!”

– क्षितिज दाते , ठाणे

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 79 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..