मॉलमध्ये गेल्यानंतर ट्रॉली ढकलत शॉपिंग करणं, हे आपल्यापैकी अनेकांना आवडतं. परंतु कोणे एके काळी या ट्रॉलींचा वापर करणं ग्राहकांना अपमान वाटत होता. चातुर्याने केलेलं प्रमोशन आणि बदल यांच्यामुळे ट्रॉली अर्थात शापिंग कार्ट आज कमालीच्या लोकप्रिय आहेत. अमेरिकेतील एका सुपरमार्केटच्या मालकाने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी तयार केलेली ही कार्ट आता सर्वसामान्यांच्या हाती जाऊन विसावली आहे.
अमेरिकेतील ओक्लोहोमा शहरात असलेल्या ‘ पिग्गली विग्गली ‘ या सुपरमार्केटचा मालक सिल्यान गोल्डमन आपल्या ग्राहकांच्या हितासाठी नेहमीच प्रयत्न करत असे. ग्राहकांना खरेदीचा पुरेपूर आनंद घेता यावा यासाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात तो नेहमीच पुढाकार घ्यायचा. ग्राहकांनी जास्त सामान घेतल्यानंतर ते सांभाळता येत नसल्याने एका क्षमतेपलीकडे ते खरेदीच करत नसल्याचं गोल्डमनच्या लक्षात आले. त्यासाठी काय उपाय करता येईल, याचा तो विचार करू लागला. बास्केट उपलब्ध करुन दिलं तरीही तीच समस्या कायम राहत असल्याचं त्याला माहिती होते.
एके रात्री तो ऑफिसमध्ये बसून याच विषयावर विचार करत होता. त्यावेळी त्याच्या सुपरमार्केटमधील मेकॅनिक क्रेड यंग त्याच्या केबिनमध्ये आला. त्याचक्षणी गोल्डमनला एक युक्ती सुचली. त्याने त्याच्या केबिनमधील लाकडी खुर्चीला बास्केट लावण्यास सांगितलं. त्यानंतर त्या खुर्चीच्या चारही पायांना चाकं लावण्यास सांगितलं. ही चालतीफिरती खुर्ची पाहून गोल्डमन खूश झाला. त्याने अशाप्रकारच्या काही खुर्च्या तयार करुन सुपरमार्केटमध्ये ठेवण्यास सांगितलं.
उत्साहाने दुसर्या दिवशी गोल्डमन आल्यानंतर त्यानं पाहिलं, तर एकही ग्राहक या खुर्च्या वापरत नसल्याचे त्याला दिसून आलं. आम्ही खरेदी केलेलं सामान अशा खुर्च्यावर ठेवून आम्ही फिरायचं का, असा प्रश्न ते विचारु लागले. गोल्डमनने मग वेगळा मार्ग अनुसरला. त्याने या खुर्च्या ओढण्यासाठी काही माणसं ठेवली. हळूहळू लोकांना ही सुविधा आवडू लागली. तोपर्यंत त्यात बरेच बदल होत गेले. ४ जून १९३७ साली गोल्डमनने सुरू केलेली ही फिरती खुर्ची नंतर शॉपिंग कार्ट म्हणून लोकप्रिय पावली.
आज संपूर्ण जगात या कार्टचा वापर केला जातो. आता तर लहान मुलांना त्यावर बसवण्याची सोयही करण्यात आली आहे.
कधी एके काळी खूळ म्हणून ज्याकडे पाहिलं जात होते, आता त्याकडे खरेदी करतानाची महत्त्वाची गोष्ट म्हणून पाहिलं जात आहे.
Leave a Reply