नवीन लेखन...

ब्राह्मण मुख्यमंत्री असावा काय?

Should Maharashtra have a Brahmin Chief Minister?

मराठय़ांचे मूक मोर्चे निघू लागल्यापासून नेतृत्व बदलाची चर्चा सुरू झाली आहे. आता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच त्याला पुष्टी दिली आहे. मुख्यमंत्र्यांचे उत्तर खणखणीत आहे, ‘केवळ ब्राह्मण असल्याच्या कारणावरून मला दूर केले जाणार नाही. काही चुका झाल्या तरच बदल होईल; अन्यथा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ मी पूर्ण करेन.’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इतकेच बोलून थांबलेले नाहीत. ‘मंत्री नेमण्याचा आणि मंत्र्याला काढण्याचा अधिकार मुख्यमंत्र्याचा आहे,’ असे त्यांनी सुनावले आहे. मुख्यमंत्र्यांना विचारलेला प्रश्न भगवान गडावरचा होता. पंकजा मुंडे यांनी महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत आपल्यामुळे मंत्री झाल्याचे सांगितले. तर धनंजय मुंडेंना लाल दिवा आपल्यामुळेच मिळाल्याचा दावा केला होता. मुख्यमंत्र्यांचे उत्तर भगवान गडाच्या संदर्भात असले, तरी इशारा तिसर्‍या मंत्र्याला होता. पंकजा ताईंच्या उद्गारात अहंकार प्रकटला असला, तरी या घडीला त्या काही मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धक नाहीत. पब्लिसिटी, अॅडव्होकसी आणि लॉबिंगसाठी स्वत:ची यंत्रणा उभे केलेले एक ज्येष्ठ मंत्री गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. मीडियात त्यांच्या बातम्या आणण्यात त्यांचे पीआर डिपार्टमेंट यशस्वी होत असले, तरी अॅडव्होकसी आणि लॉबिंगचा कस दिल्लीत लागायचा आहे.

मोर्चांनंतर सुरू झालेली चर्चा भाजपाच्या अंतर्गत हालचालींना वेग देत असल्याचा सुगावा मुख्यमंत्र्यांना लागला असणार, म्हणून त्यांनी उघडपणे उत्तर दिलं. मुख्यमंत्री कोण असावे? हा सत्ताधारी पक्षाचा अधिकार आहे. मात्र मुख्यमंत्री कोण असावे आणि नसावे हे महाराष्ट्रात जातीवरून ठरणार काय? हा खरा प्रश्न आहे. मराठय़ांचे मोर्चे निघत आहेत आणि मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत, एवढय़ावरून हा प्रश्न उपस्थित होत असेल, तर मामला गंभीर आहे. तशी मागणी मोर्चांनी केलेली नाही. मोर्चांना बदनाम करण्यासाठी कुणी ती आग लावत असेल, तर ती गोष्ट आणखी गंभीर आहे.

ही ठिणगी टाकली कुणी? त्याला हवा दिली कुणी?

कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांचे वंशज संभाजी राजे यांना भाजपाने राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेवर नेमले. तेव्हा मोर्चे निघायचे होते. भाजपाची ती खेळी विलक्षण होती. प्रमोद महाजनांची आठवण करून देणारा तो डाव खुद्द मुख्यमंत्र्यांनी टाकला होता. त्यावर महाराष्ट्राचे नेते शरद पवार यांची दिलेली प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या राजकीय भूगर्भात अस्वस्थता निर्माण करून गेली. ‘पूर्वी छत्रपती पेशवे नेमायचे. पेशवे फडणवीसांना नेमायचे. आता फडणवीस थेट छत्रपती नेमायला लागले आहेत.’ पवार साहेबांची ही प्रतिक्रिया नुसती खोचक नव्हती. महाराष्ट्राच्या राजकीय गोलावरील टेक्टॉनिक प्लेट्स हलवण्याची ताकद त्या प्रतिक्रियेत होती. त्या प्रतिक्रियेने ठिणगी पडली. त्या ठिणगीला भाजपाच्या अंतर्गत राजकारणात हवा देण्याचे काम नंतर लगेचच सुरूही झाले. म्हणून त्याची दखल खुद्द फडणवीसांना घ्यावी लागली.

कोल्हापूरच्या संभाजी राजांच्या नेमणुकीवरून ती प्रतिक्रिया आली म्हणून आठवले. फाटक्या गादीसाठी का भांडता? असे यशवंतराव चव्हाणांनी कोल्हापूरच्या दत्तक विधानावरती म्हटले होते. यशवंतरावांचा हेतू प्रामाणिक होता; पण तरीही त्यांना त्याची किंमत मोजावी लागली. शरद पवारांना त्यांच्या ताज्या विधानाची किंमत मोजावी लागणार नाही. उलट किंमत मिळेल. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरानंतर विशेषत: मराठवाड्यात हरवलेला प्रभाव त्यांना पुन्हा अलीकडच्या घटनांनी मिळवता आला आहे. एका मोठय़ा समाजातल्या राजकीय विभागणीला रोखून पुन्हा एकदा एकसंध करण्याची संधी ते पाहात असतील.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद ब्राह्मणाकडे असावे की नसावे? आणीबाणीनंतर देशात जनता राजवट आली. महाराष्ट्रातही परिवर्तन घडू लागले होते. जनता पक्षाला संधी असूनही आणि सर्वांचे एकमत असूनही एस. एम. जोशी यांनी मुख्यमंत्री पद नाकारले. महाराष्ट्रात ब्राह्मण मुख्यमंत्री नको, असे डी कास्ट झालेले एस. एम. म्हणाले. पुढे शरद पवारांना त्यांनीच मुख्यमंत्री केले. सेनेची सत्ता आली, तेव्हा बाळासाहेब खेरांनंतर महाराष्ट्रात ब्राह्मण मुख्यमंत्री झाला. शरद पवार ज्यांना पंत किंवा श्रीमंत म्हणून हाक मारत ते मनोहर जोशी मुख्यमंत्री होण्यामध्ये त्यांचाच रोल महत्त्वाचा होता. पवारांनी तो केला नसता, तर सुधीर जोशी कदाचित मुख्यमंत्री झाले असते. त्यांना हुलकावणी मिळाली. मनोहर जोशींना जावे लागले आणि नारायण राणे आले ते निवडणुकीच्या तोंडावर ब्राह्मण मुख्यमंत्री नको, या प्रमोद महाजनांच्या भूमिकेमुळे.

अन् आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्या जातीची. ते स्वत: जात, पात मानत नाहीत. जाती सापेक्ष वागत नाहीत. तो संस्कार त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला आहे. भाजपामध्ये जी उदार, आधुनिक नेत्यांची फळी आहे, त्या गटातले ते आहेत. ही फळी भाजपात अल्पसंख्य आहे; पण अन्य भाजपा मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत हे ठामपणे सांगता येईल की, फडणवीस ‘खट्टर’वादी नाहीत. भाजपात जात पात पाहिली जात नाही, हे मात्र खरे नाही. जात हे वास्तव आहे आणि कोणताही राजकीय पक्ष त्या वास्तवापासून दूर जाऊ शकत नाही. मुख्यमंत्री कोणत्या जातीचा आहे, यापेक्षा तो कोणत्या बाजूचा आहे, हे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राने ब्राह्मण्याला कायम नकार दिला आहे, ब्राह्मणाला नाही. फुले-शाहू-आंबेडकर ते थेट यशवंतराव चव्हाण या सर्वांचा इतिहास तेच सत्य अधोरेखित करतो. महात्मा फुलेंच्या शाळेसाठी आपला वाडा देणारे नारायणराव भिडे, शाहू महाराजांची वेदोक्त प्रकरणात पाठराखण करणारे राजारामशास्त्री भागवत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समर्थनार्थ मनुस्मृती जाळणारे बापूसाहेब सहस्रबुद्धे आणि यशवंतरावांच्या बेरजेच्या राजकारणात त्यांना साथ देणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हा महाराष्ट्राचा इतिहास आहे.

– कपिल पाटील
(लेखक, मुंबईचे शिक्षक आमदार आहेत)
पूर्वप्रसिद्धी – दै. पुण्यनगरी २६ ऑक्टोबर २०१६

संकलित
संतोष ताठे
शिक्षक भारती परिवार महाराष्ट्र

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..