वर्षभर शेतात आपल्यासाठी कष्ट करणाऱ्या बैलांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.
बैलपोळा हा श्रावण अमावस्या या तिथीला साजरा करण्यात येतो. बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. भारतासारख्या शेतीप्रधान देशात, व तेथील शेतकर्यांत या सणाला विशेष महत्त्व आहे.या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो; शेतात पीक/धान्य कापणीला आलेले असते; सगळीकडे हिरवळ असते; श्रावणातले सण संपत आलेले असतात; एकूण आनंदाचे वातावरण असते.
या दिवशी बैलांचा थाट असतो. त्यांना कामापासून आराम असतो. तुतारी (की पराणी?) (जिच्या टोकास, बैलांना टोचण्यासाठी टोकदार लोखंडी खिळा लावला असतो अशी बैलांना हाकण्यासाठी वापरण्यात येणारी काडी) वापरण्यात येत नाही. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण देण्यात येते.
पोळ्याला त्यांना नदीवर/ओढ्यात नेऊन धुण्यात येते. नंतर चारून घरी आणण्यात येते. या दिवशी बैलाच्या खांद्याला (मान जिथे शरीराला जोडली असते तो भाग) हळद व तुपाने (किंवा तेलाने) शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, मटाट्या गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात. बैलाची निगा राखणाऱ्या ‘बैलकरी’ घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.
या सणासाठी शेतकऱ्या मध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा या साठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात. गावाच्या सीमेजवळच्या शेतावर एक आंब्याच्या पानाचे मोठे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस पोळ्याची गीते म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, ‘मानवाईक’ म्हणजेच ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील/श्रीमंत जमीनदार तोरण तोडतो व पोळा ‘फुटतो’. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेतात व नंतर घरी नेऊन त्यांना ओवाळतात. बैल नेणार्यास ‘बोजारा’ देण्यात येतात.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply