ज्योतिष ही श्रद्धा की अंधश्रद्धा या विषचाचं चर्वण करून करून चोथा झालाय अगदी. तरी पुन्हा पुन्हा नव्याने हा विषय चर्चिला जातोच. जो विषय चर्चेत असतो, त्या विषयाची लोकांना एकतर आवड असते किंवा नपड तरी असते. दोन्ही संदर्भात चर्चा ही होतेच. परंतू मी थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातून या विषयांवर बोलणार आहे.
लिहीण्याची सुरुवात करण्यापूर्वी मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छीतो, की मी उगाच टिका करायची म्हणून किंवा एखाद्या विषयाची बाजू घ्यायची म्हणून घेत नाही, तसंच कोणत्याही विषयावर मी उगाच बोलायचं म्हणूनही बोलत नाही, तो माझा स्वभाव नाही. ‘अभ्यासोनी प्रगटावे’ या संतवचनावार माझा विश्वास आहे. ज्या विषयाची बाजू घ्यायची किंवा ज्यावर टिका करायची, तर त्या विषयाचा मनाचं समाधान होईपर्यंत अभ्यास करून, मगच बाजू घ्यावी किंवा टीका करावी असं मला वाटतं.
ज्योतिषशास्त्राचंही तसंच आहे, मी सन १९८९ पासूनच मी या शास्त्राचा अभ्यासक आहे आणि या शास्त्राचा माझा अभ्यास अजुनही सुरुच आहे. याचा अर्थ ज्योतिषशास्त्रावर टिका करण्यास वा त्याची बाजू घेण्यास मी पात्र आहे असं मी समजतो. या शास्त्रावर टिका करणाऱ्यांपैकी शेकडा शंभर जणांचा या शास्त्राचा अभ्यास नसतो. दुसरे बोलतात म्हणून आपण बोलायचं आणि आपण पुरोगामी असल्याचं दाखवायचं, असा सर्व प्रकार आहे. मी मात्र जवळपास २६-२७ वर्ष अभ्यास करून मला जे आकलन झालं त्या आधारे मी पुढील गोष्टी आपल्यासमोर मांडणार आहे. या शास्त्रावरची ही टीकाही नाही किंवा बाजूही घेतलेली नाही.
प्रथम श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोघांतील नेमक्या फरकाबद्दल थोडं बोलू. या दोघांतील सीमारेषा अत्यंत पुसट आहे आणि ती सीमा कोणती, हे सांगणाऱ्या आणि ऐकणाऱ्यावर किंवा मानणाऱ्या आणि न मानणाऱ्यावर अवलंबून असते. एखाद्या देवळात जाऊन एखाद्याचं भलं झालं, तर त्या देवळातला तो देव त्या एखाद्याच्या अत्यंत श्रद्धेचा भाग बनतो, तर त्याची श्रद्धा ही दुसऱ्या एखाद्याच्या दृष्टीने ती अंधश्रद्धा असते. थोडक्यात श्रद्धा आणि अंधश्रद्धा या सबजेक्टीव्ह, वैयक्तिक अनुभवावरून ठरवायच्या टर्म्स आहेत असं म्हणतां येईल. आणखी एक उदाहरण देतो. हे उदाहरण अनेकांच्या भावना दुखावणारं असू शकेल याची मला कल्पना आहे, तरी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांतील फरक अगदी स्पष्ट समजावून सांगण्यासाठी ते उदाहरण नाईलाजाने देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ज्यांच्या भावना दुखावतील, त्यांची मी आधीच क्षमा मागतो.
आपला बाप कोण, आई दाखवते तो, हा आपल्या सर्वांच्याच श्रद्धेचा आणि विश्वासाचा भाग असतो. बहुसंख्यांच्या बाबतींत हे खरंही असतं. तरीही इथे पुरावा दाखवा म्हणून सांगितलं जात नाही. नीट विचार केला, तर ही एक प्रकारची अंधश्रद्धाच नव्हे काय? भावनेचा प्रश्न असल्यानं इथं कोणी पुरावा मागत नाही. पण तुरळक का होईना अशी उदाहरणं समाजात दिसतात, की एखाद्या मुलाचा बाप, ते मुल ज्याचं नांव बाप म्हणून लावते, तो असतोच असं नाही. परंतु त्या मुलाच्या दृष्टीने तोच त्याचा बाप असतो. ही त्या मुलाची श्रद्धा असते, तर खरं काय आहे त्याची माहिती असणाऱ्यांच्या दृष्टीने ती त्या मुलाची अंधश्रद्धा असते. श्रद्धा आणि अंधश्रद्धेची व्याख्या अशी व्यक्तीपरत्वे बदलत असते. म्हणून श्रद्धा नसलेल्यानी श्रद्धा असलेल्यावर टिका करताना सारासारविचारबुद्धीने करायला हवी. एखाद्या गोष्टीवरील श्रद्धेमुळे कुणाचं नुकसान होतं नसेल, तर उगाच अंधश्रद्धा, अंधश्रद्धा म्हणून बोंब मारण्यात काही हंशील नाही. ज्योतिष हा असाच भावनेचा आणि म्हणून श्रद्धेचा प्रश्न आहे, ती अंधश्रद्धा आहे म्हणून उगाच बोलण्यात काय हशील..!
आता ज्योतिषशास्त्राविषयी. ज्योतिषशास्त्रावर विश्वास असणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. किंबहुना ज्योतिषाचा आधार कधी ना कधी घेतला नाही, असा मनुष्य सापडणं दुर्मिळ. ज्यांना याचा अनुभव येतो, त्यांची यावर श्रद्धा बसते आणि ज्यांना येत नाही ते याला थोतांड म्हणतात. ज्योतिष हे असं औषध आहे, की जे भरल्या पोटावर कधीच खाल्लं जात नाही. हे रिकामी पोटीच घ्यायचं औषध आहे. तरी गंम्मत अशी, रिकामं पोट भरण्यासाठी ज्योतिष शास्त्राचं औषध घेतलेलेच, मग पोट भरलं, की ज्योतिष हे थोतांड आहे असं सांगत फिरतात. हे म्हणजे अन्नछत्रात जेवल्यावर जेवण अळणी होतं म्हणून नांवं ठेवण्यासारखं झालं.
आता रिकामी पोट म्हणजे काय, ते ही स्पष्ट करणे गरजेचं आहे. ज्या व्यक्तींना उद्या माझ्या ताटात काय पडणार आहे इथपासून, ते मुळात पडणार तरी आहे की नाही इथपर्यंतंची शाश्वतता नसते, ते म्हणजे रिकामी पोट. थोडक्यात अशाश्वत, अस्थिर किंवा अनस्टेबल आयुष्य जगणाऱ्यांसाठी ज्योतिष हे व्हिटामिनसारखं किंवा इंजेक्शनसारखं काम करतं. उद्या काय घडणार आहे, याचं कुतुहल माणसाला फार पुरातन काळापासून आहे. या कुतुहलाचा शोध हे शास्त्र घेतं. अज्ञाताचा शोध घेणं हा माणसाचा आवडतां खेळ आहे. या खेळातूनच आजची आपली प्रगती झाली आहे. ‘चंद्र हवा मजं’ असा हट्ट धरलेल्या प्रभु रामचंद्राला थाळीतल्या चंद्राच्या प्रतिबिंबावर समाधान मानावं लागलं होतं, तर आज त्याच्या चंद्रावर माणसांच्या वसाहती करण्याच्या गोष्टी चालल्यात. चंद्राची पाण्यातली प्रतिमा ते प्रत्यक्ष चंद्रावर पाऊल ठेवणं, हा मानवानं अज्ञाताच्या शोधातूनच गाठलेला टप्पा आहे. अर्थात यासाठी विज्ञानाचा आधार घेतला गेला. ज्योतिषशास्त्राचा तारतम्याने आणि विज्ञानाच्या श्रद्धेने आधार घेतला की अनेक बाबतीत चंद्राच्या शोधासारखेच उत्तम अनुभव येऊ शकतात. चंद्र पादाक्रांत करण्यासाठी विज्ञान कामाला येते, तर उद्या माझ्या नशिबात काय आहे हे शोधण्यासाठी ज्योतिष कामाला लागते. विज्ञान चंद्राचा पत्ता अचूक देतं, तर ज्योतिष नशिबातल्या भाकरीच्या चंद्राच्या प्राप्तीचा अंदाज देतं. विज्ञान हे सर्टन असतं, तर ज्योतिष हे अनसर्टनिटीचं शास्त्र असतं.
ज्यांच्या जीवनात स्थैर्य-विशेषकरून आर्थिक स्थैर्य- शांतता आहे असे लोक ज्योतिष शास्त्राला नांवं ठेवताना आढळतात. असे लोक सहसा पैसेवाले, हुद्देवाले असल्यानं, त्यांना ‘उद्या’ची फिकीर नसते. त्यांच्या मताचा समाजावर प्रभावही असतो. ते ज्योतिषशास्त्रावर टिका करतात म्हणून मग इतरही करतात. परंतु ज्यांच्या जीवनात वा व्यवसायात ‘अनसर्टनिटी’, उद्याची काळजी असते, अशा व्यक्ती मात्र ज्योतिषशास्त्राचा आधार घेताना दिसतात. यांत हातावर पोट असणारे, निम्न स्तरातलं आयुष्य जगणारे, जुगारी, राजकारणी, चित्रपट व्यावसायीक या सारख्या व्यक्ती येतात. राजकारण, चित्रपट या सारख्या व्यवसायांत हमखास यशाची खात्री कुणालाच देतां येत नाही व म्हणून ज्योतिषशास्त्र अशा व्यवसायांत असणाऱ्यांना मोठा मानसिक आधार ठरतं व त्यांना काम करण्यासाठी उद्युक्त करतं. हातावर पोट असणाऱ्यांचंही असंच अस्थैर्य त्यांना या शास्त्राचा आधार घेण्यास प्रवृत्त करतं. जुगाराचंही तसंच. बाकीचे जुगार सोडून द्या पण लग्न हा एक जुगार समजला जातो व तसा तो असतोही. म्हणून अगदी सुशिक्षित, उच्चशिक्षित लोकंही पत्रिका जमल्याशिवाय लग्नाला उभे राहात नाहीत. अगदी प्रेमविवाह करणारे कित्येक प्रेमवीर शेवटच्या क्षणाला पत्रिका बघण्याचा हट्ट धरतात. थोडक्यात उद्याच्या पोटात काय दडलंय, याचा वेध घेण्याचं काम ज्योतिष शास्त्र करतं. मनाला उभारी देण्याचं काम करणारं हे एकमेंव शास्त्र आहे. म्हणून मी या शास्त्राला व्हिटामिन्स किंवा इंजेक्शन असं म्हणतो.
ज्योतिषशास्त्र हे कल्पनेवर आधारीत शास्त्र आहे. कोणत्याही इतर शास्त्रापेक्षा हे जास्त वैयक्तिक आहे. कुंडलीतली बारा घरे, बारा राशी आणि बारा ग्रह यांच्या परम्युटेशन-काॅम्बिनेशनचा अर्थ लावून ज्योतिष सांगीतलं जातं. हा अर्थ समोरच्या व्यक्तीचं लिंग आणि वय पाहून सांगीतला जातो. इतर कोणत्याही शास्त्राप्रमाणे ज्योतिषशास्त्राचे बेसिक नियम आणि व्याख्या सारख्याच असल्या, तरी त्यांचं अॅप्लिकेशन मात्र लिंग-वयपरत्वे बदलत असतं. उदा. मंगळ आणि शुक्र या ग्रहांची युती जर एखाद्या कुंडलीत असेल, तर या दोन्ही ग्रहांचे गुणधर्म अधिक ते ज्या घरात आहेत त्या घरावरून पाहील्या जाणाऱ्या गोष्टी यांचं मिश्रण करून सांगीतलं जातं. मंगळ हा पुरुष तर शुक्र हा स्त्री ग्रह मानला गेला आहे. तसंच शुक्र जलतत्वाचा तर मगळ हा अग्नी तत्वाचा ग्रह. हे मिश्रण वर्णन करण्यासाठी कमालीची तरल कल्पनाशक्ती लागते. शुक्र हा अत्यंत रसिक, रोमान्स, शृंगारीक, भावनाप्रधान ग्रह समजला जातो तर मंगळ हा ग्रह गती, वेग, वासना, संताप तीव्रतेचा कारक समजतात. आता यांचं काॅम्बिनेशन कसं होईल, तर शुक्राच्या शृंगारीकतेला मंगळाच्या गतीची साथ मिळून, ती रसिकता केवळ वासनापूर्तीपर्यंतच मर्यादीत राहाते. रणांगणाचा राजा असलेला मंगळ, बेडरुमही रणांगणासारखीच वापरतो.
आता मंगळ-शुक्राचं हे किंवा असं फळ देताना समोरच्या व्यक्तीचं वय पाहावं लागतं. वर उल्लेखलेली फळं कुमार वयाच्या किंवा वयाची ६० ओलांडलेल्याला देऊन कसं चालेल? ही फळं तारुण्यावस्थेतील लोकांना देता येतील. स्त्रीयांना पुरषांसारखी फळ देता येत नाहीत, तर त्याना द्यायची फळं बऱ्यातदा पुरुषांच्या फळांच्या विपरीत असतात. इतर शास्त्रांपेक्षा ज्योतिषशास्त्र वेगळं ठरतं, ते इथंच. इतर शास्त्राचे नियम हे कोणत्याही परिस्थितीत बदलत नाहीत. ते सर्वांना समान लागू होतात.
ज्योतिषशास्त्रातले नियम तेच असले तरी ते लागू करताना मात्र लिंग आणि वयपरत्वे लागू करावे लागतात आणि म्हणून याची टवाळीच जास्त होताना दिसते. हे तारतम्य ज्योतिषाने बाळगायचं असतं, नाहीतर बदनाम शास्त्र होतं. ह्या शास्त्राचा आवाका अत्यंत मोठा आहे, मी इथं थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलाय. आपल्याला समजलं नाही, तर तो दोष माझा.
आता मी या शास्त्राला इंजेक्शन का म्हणतो ते सांगतो आणि लेखाचा समारोप करतो. हरलेल्या, खचलेल्या मनाला ‘आणखी थोडा प्रयत्न कर आणि थोडी कळ राढं, भविष्य उज्वल’ आहे असा धिर देणारं हे शास्त्र आहे. माणूस त्या आशेवर प्रयत्न करत दिवस काढतो व पुढे तो यशस्वी होतोही. हे यश अर्थातच प्रयत्न आणि इच्छाशक्तीचं फळ असतं आणि ही इच्छाशक्ती जागृत करायचं काम ज्योतिषशास्त्र करतं. इंजेक्शन हे जसं थकलेल्या आजारी शरीराला लगेच उभं करतं आणि एकदा का शरीर उभं राहीलं, की त्याचा काॅन्फिडन्स आपोआप वाढतो व नंतर ते आपलं काम सहज करू शकतं. मग ते जगतं नेहेमीच्या अन्नावर. तसंच ज्योतिषाचं आहे. खचलेल्या मनाला काॅन्फिडन्स देण्याचं काम ज्योतिष करतं आणि एकदा का तो आला की पुढचं काम सोप असतं. इंजेक्शन शरीर उभं करतं, तर ज्योतिष मन उभं करत. शरीर एकदा का उभं राहीलं की मग इंजेक्शनची गरज लागत नाही, तसंच एकदा का मनाने उभारी घेतली, की सारखा ज्योतिषाच्या आधाराची गरज नसते. तशी ती सारखी घेऊही नये. काही गोष्टी जशा घडतील तशा घडू द्याव्यात. पण नाही, माणसं चुकतात ती नेमकी इथंच, ती एका अनुभवावरून त्याच्या नादी लागतात आणि उठ-सुट ज्योतिषाकडे धावतात आणि मग लबाड ज्योतिषी त्यांचा गैरफायदा घेतात आणि मग या पवित्र व्यवसायाचा ‘धेदा’ होतो व नंतर हा लोकांच्या हेटाळणीचा भाग होतो.
ज्योतिषाचा आधार जरूर घ्यावा, पण त्याच्या आहारी जाऊ नये. इंजेक्शन कुठं कोण रोज घेतं?
— नितीन साळुंखे
9331811091
आपला बाप कोण, आई दाखवते तो, हा आपल्या सर्वांच्याच श्रद्धेचा आणि विश्वासाचा भाग असतो. बहुसंख्यांच्या बाबतींत हे खरंही असतं. तरीही इथे पुरावा दाखवा म्हणून सांगितलं जात नाही…… पण आता शास्त्राचा आधार घेऊन हे शक्य झाले आहे कि माझा बाप कोण हे सिद्ध होत …. विश्वास नसेल तर नक्की करायला वाव आहे जो इतर गोष्टींमध्ये नाही ….. त्यामुळे आई सांगते तो बाप ह्यावर विश्वास हा सोयीने ठेवला जातो तस देव आणि भूत ह्या बाबतीत होत नाही तो पर्यंत ती अंध श्रद्धा आहे अस म्हटलं तर राग का येतो अनेकांना ? त्यामुळे माझ्या मते दिलेलं उदाहरण तितक पटणार नाहीये ….