माझ्या वडिलांनी सांगितलेली ही गोष्ट. त्यांच्या श्रद्धेची, माझ्या दृष्टीनं योगयोगाची. योग्य सल्लागार भेटण्याच्या योगाची. त्या
वेळी माझा नुकताच जन्म झालेला होता. वडील कोपरगाव तालुक्यातील राहाता या गावी पाटबंधारे खात्यात मोजणीदार म्हणून
दाखल झालेले होते. माझी थोरली बहीण आणि मी असे आम्ही दोघं
मुलं. आई-वडील खूश होते. दुष्काळी भागातील शेती सोडून
नोकरीसाठी बाहेर पडलेल्या तरुणाला सरकारी नोकरी लागावी, हे काही आश्चर्य नव्हतं; पण यातही माझ्या आई-वडिलांना
साईकृपेचा साक्षात्कार जाणवत होता. राहाता-शिर्डी यात अंतर फार तर पाच-सहा मैलांचं. शहराचा विचार केला तर
उपनगरासारखी स्थिती. नोकरी आणि तीही साईस्थानाजवळ. आनंदासाठी आणखी एक कारण. असेच एके दिवशी वडिलांना पत्र
आलं. सरकारी लखोटा होता तो. वडिलांची नोकरी कायम होण्याची ती सुरुवात होती. कारण त्या पत्रात वैद्यकीय चाचणी करून
घ्यावी आणि त्याचा अहवाल पाठवावा, असा आदेश होता. जवळचं रुग्णालय म्हणून शिर्डीच्या दवाखान्याचा संदर्भ होता. पूर्वी
सरकारी नोकरीतही हे सोपस्कार अनेक वेळा खूप विलंबाने पार पाडले जात. काही वर्षेही लोटत त्यासाठी; पण आता पत्र आलं
तर तपासणी करायला हवी. वडील शिर्डीला गेले.
तेथल्या वैद्यकीय अधिकार्याला पत्र दाखविलं, फॉर्म भरले आणि तपासणी झाली. सायंकाळी अहवाल मिळणार होता. तसा तो
मिळालाही; पण त्यावर ‘अनफिट’ असा शेरा होता. वडिलांना चष्मा होता. तपासणीत त्यांना ‘मायोपिया’ असल्याचा निष्कर्ष
होता. ‘अनफिट’ या शब्दानं वडिलांना घेरी यायची वेळ आली. काय करावं हे सुचेना. आता नोकरी जाणार, हे सांगायला कोणा
ज्योतिष्याची गरज राहिलेली नव्हती. अत्यंत विमनस्क अवस्थेत ते दवाखान्यासमोरच असलेल्या लेंडी बागेत एका बाकड्यावर
बसले.
त्या वेळी शिर्डी एवढी विस्तारली नव्हती अन् गर्दीचा तर प्रश्नच नव्हता. घरी जावं का? गेलो तर घरी काय सांगावं की
जाऊच नये? अशा प्रश्नांची गर्दी झाली. माणूस मुळापासून हादरला, की त्याला देव आठवतो, असं म्हणतात. त्या वेळी वडिलांना
साईबाबा आठवणं हे स्वाभाविक होतं. त्यांच्या मनात काय चाललं असेल ते तेच जाणोत; पण त्याच वेळी एक माणूस
त्यांच्याजवळ आला. बसला, काय, कुठले, काय काम काढलं? अशी चौकशी केली. आपल्याला हे वेगळं वाटेल; पण खेड्यात अशी
चौकशी ही एक साधारण बाब असते. वडिलांनाही त्या वेळी कोणीतरी बोलणारं हवं असावं, काय झालंय, किती मोठं संकट आलंय
हे कोणाला तरी सांगावं अशीच त्यांची मनःस्थिती असावी. त्यांनी त्या अनोळखी माणसाला झालेली कथा सांगितली. त्यानंही ती
ऐकून घेतली. तो म्हणाला, ‘‘घाबरू नको. उद्या सकाळी अकराला ये. डॉक्टर एकटेच असतात. त्यांना जी स्थिती आहे ती सगळी
सांग. तो माणून कनवाळू आहे. तो नक्कीच तुला मदत करील. फार काही विचारलं तर शिर्डीच्या पाटलानं पाठवलं असं सांग.’’
वडिलांना धीर आला असावा. ते स्थिरावले. तो उठला अन् निघून गेला. आता सूर्यास्त होत होता अन् सकाळपर्यंत वाट पाहायची
होती. वडील तिथंच झोपले. सकाळी उठल्यावर एकच प्रतीक्षा… अकरा केव्हा वाजतात याची. वेळ झाली. डॉक्टर आल्याचं सहज
दिसावं एवढ्या अंतरावर वडील होते. शिर्डीच्या पाटलांनी पाठवलंय अशी प्रस्तावना करीत त्यांनी डॉक्टरांना सारी हकिगत
सांगितली. त्यांच्या हकिगतीनं डॉक्टरांना पाझर फुटला किवा शिर्डीच्या पाटलाचा प्रभाव पडला. डॉक्टरांनी त्यांची फेरतपासणी
केली आणि चष्म्यासह फिट असा शेरा मारला. दर दहा वर्षांनी तपासणी करून घेण्याची शिफारस केली. वडील इतके भारावून
गेले होते, की त्यांनी त्या डॉक्टरांचे पाय धरले आणि काही वेळातच साईबाबांच्या समाधीवर डोकं ठेवलं. त्यानंतर ते गावात
शिर्डीच्या पाटलाचा तपास करीत फिरत होते; पण त्यांना तो पाटील काही भेटला नाही.
माझे वडील एखाद्या प्रसंगाचं वर्णन खूप तपशिलानं सांगायचे. हा प्रसंग तर त्यांनी अनेक वेळा सांगितलेला. पाटलाची भेट झाली.
तो माझ्याशी बोलला आणि गुप्त झाला असंही ते म्हणायचे. मी म्हणायचो, ‘‘अहो तुम्हाला मायोपिया. लांबचं दिसत नव्हतं. थोडं
अंतर गेल्यावर तुम्हाला दिसलं नसेल इतकंच.’’ पण त्यांचा त्यांच्या डोळ्यापेक्षा मनावर अधिक विश्वास असावा. हा प्रसंग ते
इतक्या श्रद्धेनं सांगायचे, की त्यांच्या दृष्टीनं तो चमत्कारच वाटावा.
माणसाच्या प्रयत्नांची पराकाष्ठा जिथं संपते तिथं चमत्कारांना प्रारंभ होत असावा; पण प्रयत्नांची पराकाष्ठा कोठे संपते, हे तरी
माणसाला कुठे माहीत असतं? दुसर्या दिवशी डॉक्टरांना भेटणं हा माझ्या दृष्टीनं त्यांच्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेचा भाग होता. तो
माणूस भेटणं हा योगायोग होता. त्याच्या दृष्टीनं ती साईकृपा होती.
ते काहीही असो. त्यानंतर निवृत्त होईतो माझ्या वडिलांनी इमानेइतबारे सेवा केली. डोळ्याचं अधूपण कष्टानं जाणवू दिलं नाही.
आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांना साईकृपा पुरली. मुलांची शिक्षणं आणि त्यांचं स्थिरस्थावर होणं त्यांनी पाहिलं. माझं माझ्याजवळ;
पण त्यांच्या श्रद्धेला साधक बनविण्याचा मला काय अधिकार?
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply