बुद्धीच्या कक्षेत न येणारे ज्ञानही श्रद्धायुक्त अंतःकरण असल्यास प्राप्त होते असे म्हटले जाते. आयुष्यात श्रेष्ठतम गणलेले सम्यम् ज्ञान कसे प्राप्त होईल? त्यासाठी काय असणे आवश्यक आहे?
म्हणोनि तेचिं सम्यग ज्ञान।
कैसे नि होय स्वाधीन।
जालिया वृद्धियत्न।
घडेल केवि II
ज्ञानप्राप्ती व्हावी आणि ती टिकून राहावी यासाठी इतर गुणविशेषासोबत श्रद्धेची नितांत गरज आहे. श्रद्धा म्हणजे विश्वास. निश्चयात्मक विश्वास, सद्गुरूच्या, वेदांताच्या वचनावर विश्वास असणे म्हणजे श्रद्धा.
गुरूवेदांत वाक्येषु विश्वासः श्रद्धा ।। कारण ती वचने अनुभूत सत्यावर आधारलेली असतात. या वचनातळ होत नसली तरी कालांतराने, अनुभवांती, अभ्यासाच्या दृढतेने प्राप्त होते, गुरुवेदांत वचनावर विश्वास हे ज्ञानप्राप्तीचे महत्त्वाचे साधन आहे. विनोबाजींनी एक उदाहरण दिले आहे. आई आपल्या मुलाला सांगते, ‘बाळया आकाशात दिसणारा तो एक तजोगोल आहे त्याला चंद्र म्हणतात.’ मुलगा त्या वचनावर विश्वास ठेवतो. तो जर म्हणेल की हे खरे आहे, नाही, कोण जाणे. इतरांची मते घेतली पाहिजे तर ते मूल ज्ञान ग्रहण करू शकणार नाही. मुलगा आईच्या वचनावर विश्वास ठेवतो. तसा विश्वास म्हणजे श्रद्धा. आई जी गोष्ट सांगते आहे ते तिचे अनुभूत सत्य आहे. तसेच संत सत्पुरुषांची, ऋषीची वचने, वेदांत वचने यावर विश्वास असल्यास त्यातून ज्ञानप्राप्ती होते, बुद्धीच्या कक्षेत न येणारे विषय, अनेक गोष्टी श्रद्धेमुळे कळतात. छांदोग्य उपनिषदात श्वेतकेतूची कथा आहे. वडील आत्मतत्त्वाविषयी सर्वत्र व्यापलेल्या त्याच्या सूक्ष्मतेविषयी मार्गदर्शन करीत आहेत. ते त्याला सांगतात, समोरच्या वडाच्या झाडाचे फळ तोडून आण. तो तोडून आणतो. ते त्याला सांगतात, हे फळ फोडून बघ, तो फोडतो. त्यातील बारीक बी फोड, तो फोडतो. ते विचारतात तुला आत काय दिसले? तो म्हणतो यात काहीच नाही. त्यावर ते सांगतात, तुला जे काहीच दिसले नाही, त्यातच हा वठलेला प्रचंड वटवृक्ष साठवलेला आहे, ‘श्रद्धस्व सोम्यं यावर श्रद्धा ठेव. आत्मतत्त्वही तसेच व्यापक आणि सूक्ष्म आहे. आपणही अनेक गोष्टींवर श्रद्धा ठेवतो म्हणून कर्मप्रवृत्त होतो. प्रवासाला जाताना रेल्वे टाईम टेबलवर श्रद्धा ठेवून नेमके त्या वेळेवर गाडीसाठी जातो. त्यासाठी दिवसभर जाऊन बसत नाही.
श्रद्धाविहिनाला प्रवृत्ती नाही आणि प्रवृत्तीशिवाय साध्य प्राप्त होणार नाही.
– वा.गो. चोरघडे
संकलन : शेखर आगासकर
Leave a Reply