नवीन लेखन...

श्रद्धांजली…. महाराजांना !!

आज ३ एप्रिल ! हृदयाच्या एका कप्प्यात कायम विराजमान असणार्‍या आमच्या महाराजांची आज पुण्यतिथी ! (म्हणजे महाराजांच्या पुतळ्याला हार घालून , पेपरमध्ये आपला फोटो छापून आणण्याचे राजकारण्यांची पुण्य पदरात पाडून घेण्याची तिथी !)

३३७ वर्षे झाली या दु:खद घटनेला , पण का कुणास ठाऊक मन एकदम ३३७ वर्षांनी मागे जातं आणि कुठल्याश्या अनामिक भावनिक सेतूनं ते आसन्नमरण अवस्थेतल्या त्या श्रीमंत योगीश्वराच्या मनाशी एकरूप होऊन सांगू लागतं…..

आताशा आम्हाला हे असं का होतंय कळत नाही.किती काळ लोटला याचा अंदाजच लागत नाही.या देशीच्या दुर्बल माणसांवर होणारा अन्याय नाहिसा करण्यासाठी तलवार हाती घेतली तो क्षण ते आज घरचेच भेदी जिवावर उठल्यामुळे गुढघी सारख्या असाध्य रोगाने अंथरुणाला खिळून जगदीश्वराच्या चरणी माथाही टेकता न यावा इतकी शारीरीक दुर्बलता अंगी यावी असा हाक्षण ! या ३५ वर्षांत आम्ही ४ -४ यवनाधिपतींना नमवले वा नामोहरम केले , आमचे अनेक हिरे – सवंगडी गमवले ; हे , हे अवघे स्वराज्य कमावले पण घरातल्याच महाराणींची राज्याची क्षुधा काही शमली नाही !

बहलोल खानासारख्या कपटी , अफझलखानासारख्या धूर्त , कावेबाज व अमानुष ताकदीच्या खुनशी सरदारांस , जगात स्वतः खेरीज इतर कुणावरही विश्वास न बाळगणार्‍या सत्तापिपासू औरंगझेबास…..अश्या सार्‍यांना पाणी पाजणारी आमची जिगर आणि बुद्धिमत्ता पण आमच्या या गुढघी रोगासोबत नष्ट झाली असावी असं सोयराबाईना – या राज्याच्या महाराणींना वाटावे यापरीस या स्वराज्याचे दुर्दैव ते कोणते? हंबीररावांस दूर पाठवले , अण्णाजी दत्तोंसह सार्‍या मंत्रीगणांस काबूत ठेवून आम्हांस या रायगडी एकाकी ठेवले.शंभुराजेंना पाठवलेला खलिता , पुतळाबाईंना पाठवलेला निरोप सारे काही रवाना होऊनही आम्हास भेटावयांस कुणीही येत नाही याचा अर्थ न ओळखण्याएव्हढी आमची बुद्धी यांच्या या जनानी सौंदर्यात वाहून गेली असावी असे वाटणार्‍या यांच्या जनानी बुद्धीची कीव करावीशी वाटते ! दरवाज्यावर दस्तक देणार्‍या परकीय शत्रूकडे काणाडोळा करून आपसांतले हेवेदावे (ते पण वतनासाठी, राज्यासाठी) मांडणार्‍या या आमच्या मराठी रक्ताचं शुद्धीकरण करणं खूपच गरजेचं होऊन बसलंय ! या क्षणी अफूच्या गोळीमुळे शांत झोपणार्‍या राजारामांस गादीवर बसवण्याची अवदसा आठवावी इतकी आमची स्वराज्यसेवा वांझ का ठरावी? आमच्या एका शब्दाखातर जान निछावर करून टाकणार्‍या शंभूबाळांस परकीय यवनांकडे – दिलेरखानाकडे जाण्याची वेळ आणणार्‍या सोयराबाई आणि इतर मंत्रांच्या बुद्धीची झेप किती तोकडी आहे हे आम्हांस तेंव्हाच लक्षात आले.”आपणही स्वतंत्र राज्य उभारून आपला पराक्रम आपल्या आबांना दाखवू” या ईर्ष्येपायी दिलेरखानास जाऊन मिळणार्‍या आणि नंतर त्याचे कपट लक्षात येताच आमच्या सहाय्याने राज्यात परत येताच “आम्हांस साहेबी पायांची जोड आहे , आम्ही दूधभात खाऊन राहू” असे सांगणार्‍या शंभूराजांचा निष्कपट स्वभाव पण या स्वराज्यात हंबीरराव वगळता इतर कुणासही ओळखता आला नाही यावर आम्ही कसा विश्वास ठेवावा?शेवटी ‘ झोपलेल्याला जागं करता येतं , पण झोपेचं सोंग घेऊन जागंच असणार्‍याला आयुष्यभर जागं करता येत नाही’ हेच खरं !

दशरथाच्या मृत्यूनंतर रामायण घडवणारी मंथरा हिने राम राजा होऊ नये म्हणून कपट केले आणि आज स्वराज्यास राजाराम राजा मिळावा म्हणून सोयरा ने कपट केले .या मंथरा आणि सोयरा यांच्या नावातील हे शेवटचे अक्षर रा म्हणजेच राज्यलालसा नाही काय्?शंभूराजांस दिलेरखानाकडून परत आल्यावर आम्ही हेतूपुरस्सरच पन्हाळगडी ठेवलं होतं की त्या निरागस युवराजांचा या जनानी राजकारणामुळे अद्यापपर्यंत झाला तेव्हढा छळ बास झाला, वातावरण मार्गी लावून आणि सोयराला योग्य ती समज देवून मग शंभूराजेंना परत रायगडी आणू ! पण याही गोष्टीचे या सोयराने राजकारण केले आणि आमचा शंभूराजेंवर रोष आहे , त्यांचेमुळेच आम्हाला मनस्ताप झाला असून त्यामुळेच आम्ही अंथरूणाला खिळले आहोत असा प्रचारही सुरु केल्याचं आम्हांस ठाऊक आहे ! अरे लढाईला कुठे जाणार आहोत ह्याची पण गुप्तता बाळगणारे आम्ही छत्रपती , आम्हांस या गोष्टी कळणार नाहीत का? पण आम्हास आमच्या सामर्थ्यावर असलेला विश्वास वृथा ठरला.आमच्यावर केलेल्या अभ़क्ष्य भक्षणाच्या प्रयोगांमुळे हा देह अकालीच थकला.

रामाच्या दासाची , त्या बलवान हनुमंताची आज जयंती आणि समर्थ रामदासांच्या या शिष्योत्तमाचे शारीरीक दौर्बल्यामुळे आज प्रस्थान हा कसला रे योग स्वराज्याच्या ललाटी लिहिलास जगदीश्वरा? येणार्‍या काही वर्षातच सोयरासकट सार्‍या जगाला कळेल की शहाजीराजे आणि जिजाऊमांसाहेब यांनी लावलेली ही स्वराज्याची मशाल वेळप्रसंगी स्वतःच्या देहाचं इंधन करूनही धगधगती ठेवेल असं शंभूराजे नामक चालतं बोलतं मर्दानी सौंदर्य शिल्प निर्माण करण्याचं भाग्यही विधात्यानं या शिवाजीस दिलं होतं ! पण अफसोस , तेंव्हा आमच्या या बछड्याचं जिवाच्या कुर्वंड्या ओवाळून टाकून कौतुक करायला ना आम्ही या जगात असू ना आमच्या मागे मूर्तीमंत वात्सल्याचा पुतळा असणारी पुतळा असेल ! हो, आम्हास खात्री आहे , आमच्या मागे ती इथे रहाणारच नाही ! राहून राहून असं मनात येतं जगदीश्वरा :

स्वजनांची राज्यलालसा
मंत्र्यांचा पदांचा हव्यास
निर्मळ मनांचा कोंडमारा
आता अधिक पहावत नाही !

कपटी औरंग्याची चाहूल
दाराशी जाणवत्येय
आधी त्याचा बंदोबस्त करा!
सांगितल्याशिवाय रहावत नाही !

मृत्यू समोर दिसत असतांही
त्यांस मिठी घलणारा शिवा काशीद आठवतो…..
ये मृत्यो , ये आणि आम्हास घेऊन जा
या दुर्बल शरीरात यातम्यास आता रहावत नाही……..

भवानी माते, जगदीश्वरा आम्ही येतोय आमच्या सईबाईसाहेबांना भेटायला , पण आमच्या ओटीत लहानग्या २ वर्षांच्या चिमुरड्याला घालून जाणार्‍या त्यांच्या आणि आमच्या कलेज्याच्या तुकड्याला आमचं अखेरचं दर्शन तरी होईल की नाही या अनुत्तरीत प्रश्नासह या राज्याचा छत्रपती युवराजांच छत्र स्व्तःच काढून घेऊन निघालाय, सई आम्हांस क्षमा कर ! समर्थ , आम्ही येतो , जय जय रघुवीर समर्थ !

— उदय गंगाधर सप्रे(म)
ठाणे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..