या महिन्याचे पौर्णिमेच्या आजूबाजूला श्रवण नक्षत्र येत असल्याने या महिन्याला श्रावण असे म्हणतात. या महिन्यापासून वर्षाऋतू सुरू होतो. या महिन्यात दररोज कोणते ना कोणते व्रत सांगितले आहे. त्यामुळे या महिन्याला अत्यंत पवित्र मानले जाते. हा महिना चातुर्मासांत येत असल्याने सध्या अनेक लोक संपूर्ण चार महिने नियम पाळणे शक्य होत नसल्याने या महिन्यापुरते तरी नियम पाळतांना आढळतात. उत्तर भारतात या महिन्यांत झुलन यात्रा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, नंदोत्सव वगैरे प्रमुख उत्सव मानतात. तेथे पौर्णिमेचे दिवशी राधा व कृष्ण यांना हिंदोळ्यावर बसवून झोके देतात – हा उत्सव एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत साजरा करतात.
श्रीकृष्ण जन्माच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव साजरा करतात. नंदाला पुत्र झाला या समजुतीने हा उत्सव केला जातो. हा महिना निसर्गदृष्ट्या सुद्धा आल्हाददायक असतो. सर्वत्र हिरवेगार वातावरण असते. अनेक फुलांना बहर आलेला असतो व सुवासाने संपूर्ण वातावरण प्रसन्न झालेले असते. श्रावणमासी हर्ष मानसी… ही कविता सर्वांना ‘ माहीतच आहे. हे सर्व पाहायला, अनुभवायला घेण्यास शहरात न राहता खेडेगावांत, रानात जाणे आवश्यक आहे. हल्ली हे शहरातील लोकांना पहाण्यास मिळत नसल्याने वर्षा सहलींचे आयोजन केले जाते.
— विद्याधर करंदीकर
Leave a Reply