कृपापांगालोकं वितर तरसा साधुचरितेन ते युक्तोपेक्षा मयि शरणदीक्षामुपगते।
न चेदिष्टं दद्यादनुपदमहो कल्पलतिका
विशेष: सामान्यै: कथमितरवल्लीपरिकरै:।।१०।।
आचार्यश्री आई जगदंबे ला प्रार्थना करीत आहेत की, कृपापांगालोकं वितर तरसा साधुचरिते- हे साधुचरिते अर्थात अत्यंत सुयोग्य वर्तन करणाऱ्या आई जगदंबे ! तू तुझ्या कृपारूपी दृष्टिपाताला माझ्यावर तरसा अर्थात अत्यंत शीघ्रपणे वितर अर्थात प्रदान कर.
तिने अशी कृपा का प्रदान करावी? याची मीमांसा करताना आचार्यश्री स्वतःचा शरणागतीचा आधार करीत म्हणतात,
न ते युक्तोपेक्षा मयि शरणदीक्षामुपगते।
आई मी तुझा शरणागतीची दीक्षा घेतली आहे. आता माझी उपेक्षा करणे तुला युक्त म्हणजे योग्य नाही.
आई जगदंबेला कल्पलतिका म्हणत आहेत. शास्त्रात कल्पवृक्ष, कामधेनु चिंतामणी रत्न इ. अद्भुत फलदायी गोष्टींचे वर्णन केले असते. मनात जी कल्पना येईल ती पूर्ण करणाऱ्या वृक्षाला कल्पवृक्ष म्हणतात. आईच्या स्त्रीत्वाचा विचार करीत आचार्य कल्पवृक्षाचे स्त्रीरूप म्हणून कल्पवल्ली, कल्पवेल म्हणत आहेत. तिच्या अशा स्वरूपाचे वैभव
सांगत आचार्य श्री म्हणतात,
न चेदिष्टं दद्यादनुपदमहो कल्पलतिका ! जर अनुपद अर्थात प्रत्येक पावलावर कल्पलतिका इष्ट म्हणजे अपेक्षित गोष्ट देणार नाही. तर मग..
विशेष: सामान्यै: कथमितरवल्लीपरिकरै:- इतर सामान्य वेलींमध्ये आणि तिच्यामध्ये विशेष असा फरकच काय उरला?
सावली,पाने, फुले, फळे या गोष्टी तर सामान्य वेलही देते. या सर्व गोष्टींनीही एक प्रकारचा आनंद मिळतो.पण या सर्व लौकिक गोष्टी आहेत. आनंद ही लौकिक आहे. आई जगदंबा कल्पवल्ली आहे. तिची कृपा अलौकिक असते असेच आचार्य यातून सुचवत आहेत.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply