अय: स्पर्शे लग्नं सपदि लभते हेम पदवीं
यथा रथ्यापाथ: शुचि भवति गंगौघमिलितम्।
तथा तत्तत्पापैरतिमलिनमन्तर्मम यदि
त्वयि प्रेम्णासक्तं कथमिव न जायेत विमलम्।।१२।।
आई जगदंबेच्या भक्तीमध्ये रत झाल्याचा परिणाम किती रमणीय असतो हे सांगताना आचार्यश्री, परीसस्पर्श तथा गंगा स्पर्शाचे उदाहरण देत म्हणतात,
अय: स्पर्शे लग्नं सपदि लभते हेमपदवीं- अयस् म्हणजे लोखंडाला जेव्हा क्षणभराकरता देखील परिसाचा स्पर्श होतो त्यावेळी सपदी म्हणजे तत्काल ते लोखंड सोने या पदवीला प्राप्त होते. अर्थात त्याचे सोन्यात रूपांतर होते. त्याची लोखंड रुपातील अल्पमूल्यता, हिणकसता पूर्णपणे लोप पावते. ते अनमोल होऊन जाते. त्याचप्रमाणे,
यथा रथ्यापाथ: शुचि भवति गंगौघमिलितम्- जसे रथ्यापाथ अर्थात रस्त्यावरून वाहणारे पाणी कितीही अस्वच्छ गोष्टींना स्पर्श करीत वाहिले. त्या सगळ्यांना सोबत घेऊन वाहत राहिले तरी गंगौघाला, गंगेच्या प्रवाहाला मिळताच शुद्ध होऊन जाते.
तथा म्हणजे त्याप्रमाणे, तत्तत्पापैरतिमलिनमन्तर्मम- त्या त्या वेळी केलेल्या त्या त्या पापांनी माझे मन अत्यंत मलीन झालेले असले तरी,
त्वयि प्रेम्णासक्तं- हे आई जगदंबे आता ते मन तुझ्या प्रेमात आसक्त झाले असल्यावर,
कथमिव न जायेत विमलम्? आता ते शुद्ध कसे होणार नाही?
अर्थात परिसस्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे, गंगा स्पर्शाने गटारालाही ही पावित्र्य यावे तसे तुझ्या स्मरणाने माझे पापी मन शुद्ध होत आहे. माझ्या जीवनाचे सोने होत आहे. माझ्या मनाला गंगा जलाचे पावित्र्य येत आहे असे आचार्यश्री म्हणत आहेत.
खरेतर त्यांच्या मनाला पापाचा स्पर्शही नाही. पण या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या उद्धाराचा मार्ग ते सांगत आहेत.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply