क्षत्रत्राणकरी महाऽभयकरी माता कृपासागरीसाक्षान्मोक्षकरी सदा शिवकरी विश्वेश्वरी श्रीधरी ।
दक्षाक्रन्दकरी निरामयकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी ॥ १०॥
क्षत्रत्राणकरी- क्षत्र शब्दाचा एक अर्थ आहे संकट. त्यापासून त्राण म्हणजे संरक्षण करणारी.
महाऽभयकरी- अभय अर्थात सर्व प्रकारच्या भीतीं पासून मुक्ती देणारी.
सामान्य जीवनात सगळ्यात मोठी भीती असते मृत्यूची. त्यालाच आपण त्राण म्हणजे संकट समजतो. आई जगदंबेच्या कृपेने ही मृत्यूची भीती नष्ट होते. एकदा ही भीती नष्ट झाली की माणूस खऱ्या अर्थाने अभय होतो.
माता- जसा एखादा बालक स्वतःला आपल्या आईच्या जवळ अत्यंत सुरक्षित समजतो. तसेच सर्व विश्व जिच्या चरणाजवळ सुरक्षित असते ती विश्वमाता.
कृपासागरी- अपार कृपेचा सागर असणारी.
साक्षान्मोक्षकरी- प्रत्यक्ष मोक्ष प्रदान करणारी. हा शब्द समजून घ्यायला हवा. मोक्ष ही देहपतनानंतर ची अवस्था. ती प्रत्यक्ष कशी असेल? देहातीत झाल्यावरचा जो आनंद तो मोक्ष. मात्र तोच आनंद ज्यावेळी या देहात प्राप्त होतो त्यावेळी तिला मुक्ती, जीवनमुक्ती असे म्हणतात. हा प्रत्यक्ष मोक्ष प्रदान करते तिला साक्षान्मोक्षकरी असे म्हणतात.
सदा शिवकरी – सदैव कल्याण करणारी. विश्वेश्वरी- संपूर्ण विश्वाची स्वामिनी. श्रीधरी- श्री म्हणजे वैभव. सकल वैभवाला धारण करणारी.
दक्षाक्रन्दकरी- दक्षाला कन्या वियोग दुःखात आक्रंदन करायला लावणारी. निरामयकरी- आमय म्हणजे रोग. सर्व प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक रोगांपासून मुक्ती देणारी.
काशीपुराधीश्वरी- काशीनगरीची सम्राज्ञी.
भिक्षां देहि कृपावलंबनकरी मातान्नपूर्णेश्वरी-सकल कृपेचा आधार असणाऱ्या हे माते अन्नपूर्णे मला भक्ती ज्ञान आणि वैराग्याची भिक्षा प्रदान कर.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply