अन्नपूर्णे सदापूर्णे शङ्करप्राणवल्लभे ।ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति ॥ ११॥
आई जगदंबा पार्वतीला अन्नपूर्णेच्या स्वरूपात भिक्षा मागताना भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज येथे काही वेगळ्याच भूमिका आपल्यासमोर ठेवत आहेत.
अन्नपूर्णे सदापूर्णे- या पहिल्याच उल्लेखात हे वेगळेपण लक्षात घेता येते. हे दोनही शब्द वेगवेगळे करून पाहिले तर तो भाव लक्षात येत नाही. अन्न देणारी, सदैव पूर्णता देणारी असे दोन सामान्य अर्थ होतील. पण एकत्रित पाहिले तरच वेगळा अर्थ कळू शकतो.
अन्न हा मानवी जीवनाचा आधार. त्यालाही ब्रह्म म्हटले. पण ते सामान्य अन्ना बाबत. ते अन्न चार-पाच दिवसावर टिकत नाही. सदैव टिकणारे ते खरे अन्न. ते तोंडाने घेता येत नाही. ते श्री गुरुमुखातून कर्णात पाझरते. त्या शास्त्रज्ञानाला, ब्रह्मज्ञानाला शाश्वत अन्न म्हणतात. ते प्रदान करणारी जी तिला साद आहे, “अन्नपूर्णे सदापूर्णे. ”
शङ्करप्राणवल्लभे- ती भगवान शंकरांची प्रिया आहे. ते शंकर आहेत तर ही शांकरी. कल्याणकारिणी.
ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं- ना देवी अन्नपूर्णा सामान्य आहे ना तिला मागितलेले अन्न. मागणी ज्ञानवैराग्याच्या सिद्धीसाठी आहे. त्याच भिक्षेची मागणी आहे. कोणाला? तर पार्वतीला. आत्तापर्यंत अन्नपूर्णा म्हणत होते. आताच पार्वती का? तर त्या शब्दातच खेळ आहे.
कधी काळी जी सती होती ती शंकरांना सोडून दक्षयज्ञात गेली. शेवटी जळाली. नष्ट झाली. का? तर शंकरांना सोडून गेली. त्यांच्या चरणाशी स्थिर राहिली नाही. मग नष्ट झाली.
दुसऱ्या जन्मात पार्वती झाली. पर्वत कन्या. अचला, अविचला झाली.
माझी वृत्ती ईशचरणी अशीच अविचल राहो हीच भिक्षा मागायची आहे. त्या सदैव आनंददायी, ज्ञानवैराग्य सिद्धिदायिनी भिक्षेसाठी पार्वतीला मागणे…
भिक्षां देहि च पार्वति !
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply