नानारत्नविचित्रभूषणकरी हेमाम्बराडम्बरीमुक्ताहारविलम्बमानविलसद्वक्षोजकुम्भान्तरी ।
काश्मीरागरुवासिताङ्गरुचिरे काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥२॥
नानारत्नविचित्रभूषणकरी- संस्कृतचे जे शब्द मराठीत वेगळ्याच अर्थाने वापरले जातात त्यातील एक शब्द म्हणजे विचित्र. मराठीत तो अजब , विक्षिप्त या अर्थाने वापरतात. मात्र संस्कृतमध्ये चित्र म्हणजे विविध रंगांनी आकर्षक. तर त्याला लावलेल्या विशेष या अर्थाच्या उपसर्गाने विचित्र म्हणजे विशेष आकर्षक. अत्यंत सुंदर.
आई अन्नपूर्णा अशा अनेक अत्यंत सुंदर रत्नांनी बनविलेली आभूषणे धारण करते म्हणून तिला नानारत्नविचित्रभूषणकरी असे म्हटले आहे.
हेमाम्बराडम्बरी- हेम म्हणजे सोने. अंबर म्हणजे वस्त्र. आडंबरी म्हणजे झाकलेली. सोनेरी जरकाम केलेले वस्त्र धारण केलेली.
मुक्ताहारविलम्बमानविलसद्वक्षोजकुम्भान्तरी- आई अन्नपूर्णेच्या विश्वक्षुधाशांतीकारक स्तनकुंभांच्या वर तथा मध्यभागात, मुक्ताहार अर्थात मोत्याच्या माळा रुळत असतात.
काश्मीरागरुवासिताङ्गरुचिरे- काश्मीरागरु म्हणजे काश्मीर प्रांतात सापडणारे आगरू नावाचे काळ्या रंगाचे विशेष चंदन. त्यासोबत काश्मिरातील केशर आणि हिमालयाच्या पायथ्याशी मिळणारी कस्तुरी. यांच्या उटीच्या सुवासाने अंग आकर्षक असणारी.
काशीपुराधीश्वरी- काशीनगरीची सम्राज्ञी.
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी – हे सकल कृपेचा आधार असणाऱ्या माते अन्नपूर्णे ! मला भक्ती ज्ञान आणि वैराग्याची भिक्षा दे.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply