कैलासाचलकन्दरालयकरी गौरी उमा शङ्करीकौमारी निगमार्थगोचरकरी ओङ्कारबीजाक्षरी ।
मोक्षद्वारकपाटपाटनकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥४॥
कैलासाचलकन्दरालयकरी- अचल म्हणजे पर्वत. तो कधीही चल म्हणजे हालचाल करत नाही. कैलासाचल म्हणजे कैलास नावाचा पर्वत. कंदर म्हणजे गुहा. आलय म्हणजे निवास. अर्थात कैलास पर्वतावरील गुहांमध्ये जी निवास करते तिला कैलासाचलकन्दरालयकरी असे म्हणतात.
गौरी- रंगाने गोरी असणारी.
उमा- कालिका पुराणांत उमा शब्दाचा एक सुंदर अर्थ दिला आहे. देवी पार्वती भगवान शंकराचे घोर तप करत असताना हिमालयाची पत्नी मैनावती आपल्या मुलीच्या त्रासाला पाहून तिला उ म्हणजे हे आणि मा म्हणजे नको. अर्थात एवढे कष्ट घेऊ नको असे म्हणाली. त्यावरून देवी पार्वतीचे नाव उमा असे पडले. वेगळ्या शब्दात ध्येय प्राप्त होईपर्यंत अविचल असणारी.
शङ्करी- शं म्हणजे कल्याण करणारी. शंकरांची सहधर्मचारिणी म्हणून तिला शांकरी असे पण म्हणतात.
कौमारी- कुमार अवस्थेत असलेली अर्थात अत्यंत पवित्र.
निगमार्थगोचरकरी- निगम म्हणजे वेद. त्यांचा अर्थ गोचर म्हणजे प्रकट करणारी. ओङ्कारबीजाक्षरी- ओंकार हेच जिचे बीजाक्षर आहे ती ओङ्कारबीजाक्षरी.
मोक्षद्वारकपाटपाटनकरी- मोक्षाच्या द्वाराचे कपाट अर्थात दाराचे पल्ले उघडून मोक्षाचा मार्ग मुक्त करणारी.
काशीपुराधीश्वरी- काशीनगरीची सम्राज्ञी.
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी- सकल कृपेचे अधिष्ठान असणाऱ्या हे माते अन्नपूर्णे मला भक्ती ज्ञान वैराग्य स्वरूपाची भिक्षा प्रदान कर.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply