दृश्यादृश्यविभूतिवाहनकरी ब्रह्माण्डभाण्डोदरीलीलानाटकसूत्रभेदनकरी विज्ञानदीपाङ्कुरी ।
श्रीविश्वेशमनःप्रसादनकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥५॥
आई जगदंबेचे वैभव वेगवेगळ्या अंगाने प्रस्तुत करताना आचार्यश्री म्हणतात,
दृश्यादृश्यविभूतिवाहनकरी- दृश्य अर्थात दिसू शकणारे आणि अदृश्य अर्थात न दिसणारे. आपल्या आकलनाच्या ही पलीकडे असणारे. विभूती अर्थात वैभव. संपत्ती. आपल्या भक्तांना जी दृश्य आणि अदृश्य स्वरूपातील अद्वितीय वैभव प्रदान करते त्या आदिशक्तीला दृश्यादृश्यविभूतिवाहनकरी असे म्हणत असतात.
ब्रह्माण्डभाण्डोदरी- या संपूर्ण ब्रह्मांडांचा पसारा जिच्या उदरात राहतो, अर्थात जिच्या उदरातून जन्माला येतो त्या विश्वजननीला ब्रह्माण्डभाण्डोदरी असे म्हणतात.
लीलानाटकसूत्रभेदनकरी- या संपूर्ण जगाच्या संचालनासाठी जसा एखादा कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करणारा आपल्या हातातील दोऱ्यांचा वेगवेगळ्या उपयोग करतो. हालचाली करतो. भेद म्हणजे बदल करतो. त्यानुसार खालील बाहुल्यांना आपल्या तालावर नाचवतो. त्याप्रमाणे विश्वाचे संचालन करणारी.
विज्ञानदीपाङ्कुरी- विज्ञान अर्थात विशेष ज्ञान. ब्रह्मज्ञान. त्याचा दीपाचा अंकुर असणारी. अर्थात जिच्या आधारावरच ब्रह्मज्ञान उजळते अशी. समाधीदायक कुंडलिनी शक्ती स्वरूपिणी.
श्रीविश्वेशमनःप्रसादनकरी- भगवान श्री विश्वनाथांच्या मनाला अत्यंत आनंद प्रदान करणारी.
काशीपुराधीश्वरी- काशीनगरीची सम्राज्ञी.
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी- सकल कृपेचा आधार असणाऱ्या हे माते अन्नपूर्णे मला भक्ती, ज्ञान,वैराग्यरूपी भिक्षा प्रदान कर.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply