उर्वीसर्वजनेश्वरी जयकरी माताकृपासागरीवेणीनीलसमानकुन्तलधरी नित्यान्नदानेश्वरी ।
सर्वानन्दकरी सदा शुभकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥६॥
आई जगदंबेचा वैभवाचे आणखी काही पैलू कडून दाखवताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणत आहेत,
उर्वीसर्वजनेश्वरी- उर्वी अर्थात पृथ्वी, त्यावरील सर्वजन अर्थात सर्वप्रकारचे लोक त्यांची ईश्वरी म्हणजे स्वामिनी. त्याचप्रमाणे सर्व म्हणजे सर्वप्रकारचे जीव. त्यांची जनेश्वरी म्हणजे उत्पन्न करणारी देवता. सोप्या शब्दात पृथ्वीवरील सर्व जीवांची तथा लोकांची माता ती उर्वीसर्वजनेश्वरी.
जयकरी- उपासकांना त्यांच्या सुयोग्य, इच्छित कार्यात विजय प्रदान करणारी.
माताकृपासागरी- जसा सागराचा अंतपार लागत नाही तसाच तिच्या कृपेचा पारावार सापडत नाही , अशा अपार करुणामयी आई जगदंबेला माताकृपासागरी म्हणतात.
वेणीनीलसमानकुन्तलधरी- खूप काळ्या केसांना तेल लावले तर ते निळसर दिसतात. अशा निळसर, कुंतल म्हणजे केसांची समान अर्थात व्यवस्थित रचना करून तिने धारण केली आहे. त्यामुळे तिला वेणीनीलसमानकुन्तलधरी संबोधिले आहे.
नित्यान्नदानेश्वरी- मा अन्नपूर्णा समस्त जीवांना नित्य अन्नाचे दान करीत असते.
सर्वानन्दकरी – पोट भरल्यानंतर प्राप्त होणारा आनंद सर्वांना प्रदान करणारी. सर्व प्रकारचे आनंद प्राप्त करून देणारी.
सदा शुभकरी- साधकांचे, उपासकांचे सदैव कल्याण करणारी. मंगल करणारी.
काशीपुराधीश्वरी- काशीनगरीची सम्राज्ञी.
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी- सकल कृपेचे अधिष्ठान असणाऱ्या हे माते अन्नपूर्णे मला भक्ती,ज्ञान आणि वैराग्याची भिक्षा प्रदान कर.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply